Get it on Google Play
Download on the App Store

मराठी भाषा

मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.[१] मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. याउलट मराठी आणि काही अन्य भारतीय भाषांच्यावर संस्कार होऊन संस्कृत भाषा बनली असेही काही विद्वान मानतात. मराठी भाषा ही इसवी सनाच्या आधीही होती असे सिद्ध करण्याचा प्रयत्‍न प्रा. हरी नरके करीत आहेत.

मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते.[२] त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते.[३]

भारतात, मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- बडोदा, सुरत, दक्षिण गुजरात व अहमदावाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी- धारवाड, गुलबर्गा, बिदर, उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), हैदराबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तमिळनाडू), वगैरे. देशातील ३६ राज्ये आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषकांची वस्ती आहे.

मराठीत आजवर एक लाख पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांतली हजारभर तरी जागतिक साहित्यांत स्थान मिळवू शकतील अशी आहेत. मराठीत दरवर्षी दोन हजार नवीन पुस्तके प्रकाशित होतात, व सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात, आणि छोटीमोठी अडीचशे साहित्य संमेलने भरतात. नामवंत्खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल, तसेच पाठ्यपुस्तके धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे २५० कोटी रुपयांपरेयंत आहे.सरकारी संस्था ’बालभारती’दरवर्षी सुमारे ९ कोटी पुस्तके छापते. भारतातील सर्वाधिक खपाचे मासिक ’लोकराज्य’ हे, आणि देशातले सर्वाधिक खपाचे चौथ्या क्रमांकाचे वर्तमानपत्र ’लोकमत’ हे आहे, असे म्हणतात. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.

शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत, चरित्र कोश, तत्त्वज्ञानकोश, वाङ्मय कोश, विश्वकोश, समाजविज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृती कोश, ज्ञानकोश, असे शेकडो प्रकारचे कोश मराठीत आहेत. या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो, असे म्हटले जाते.