Get it on Google Play
Download on the App Store

महाभारतातील शकुंतला भाग १

महाभारतात, मूळ कौरव-पांडवांच्या वैरकथेच्या जोडीला इतर अनेक लहानमोठी उपकथानके आहेत. यांतील काही कथानके स्वतंत्र महाकाव्ये शोभावीत एवढी विस्तृत आहेत. शकुंतला दुष्यंत यांची कथा ही एक प्रमुख उपकथा आहे. या कथेतील काव्यगुणांनी महाकवींना भुलवले व महाकाव्ये व नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले. कालिदासाच्या शाकुंतल नाटकाने जगातील थोरथोर रसिकांकडून मानाचे मुजरे मिळवले व जर्मन महाकवि गटे ते डोक्यावर घेऊन नाचला हे सर्वश्रुत आहे. महाकवीनी काव्ये-नाटके लिहिताना मूळ महाभारतातील कथेमध्ये काही फेरफार करण्याचे स्वातंत्र्य घेतलेले दिसून येते. महाकाव्ये-नाटके थोरच पण मला काही वेळा मूळ महाभारतातील व्यक्तिचित्रण जास्तच रुचते. यामध्ये मी शकुंतलेच्या कथेचा समावेश करीन. शकुंतलेची मूळ महाभारतातील कथा आपण पाहूं या.
शकुंतला-दुष्यंत-भरत याची कथा आपणाला बरीचशी परिचित आहे. संस्कृत नाटकांच्या प्रथेप्रमाणे नायकाला अवगुण शोभा देत नाही म्हणून कालिदासाने दुष्यंत व शकुंतला यांच्या चित्रणात भरपूर स्वातंत्र्य घेतले आहे. त्यासाठी मुळात नसलेली दुर्वासाच्या शापाची कथा कल्पनेने रचिली आहे! इतरही महत्वाचे फरक आहेत.
शकुंतला ही मेनका व विश्वामित्र यांची कन्या हे आपणास ठाऊक आहे. मेनका ही अप्सरा व विश्वामित्र हा क्षत्रिय राजा व मागाहून ऋषिपदाला पोचलेला. मेनकेला विश्वावसु नावाच्या गंधर्व राजापासून एक कन्या झाली तिचे नाव प्रमद्वरा. मेनकेने जन्मत:च तिला स्थूलकेश नावाच्या ऋषीच्या आश्रमाजवळ नदीकाठी टाकून दिले व मग तिला त्या ऋषीने वाढवली. मात्र ती शकुंतलेच्या आधीची नव्हे. दोघींच्या कथेतील साम्य सहज लक्षात येईल.
विश्वामित्र व मेनकेची कथा शकुंतलेने प्रथम भेटीत दुष्यंताला सांगितली. विश्वामित्र मेनकेच्या मोहात पडल्यावर तो व मेनका दीर्घकाळ सुखोपभोगात रममाण झाली. हे विश्वामित्राचे क्षणिक पतन म्हणता येणार नाही. काही काळासाठी विश्वामित्राने तप:श्चर्या बाजूला ठेवली होती! (रामायणातहि विश्वामित्रकथा आहे. तेथे विश्वामित्र व मेनका यांनी दहा वर्षे एकत्र काढली असे म्हटले आहे. तसेच मेनका स्वत:च पुष्करतीर्थात स्नानाला आली होती तेव्हा विश्वामित्राने तिला पाहिले. तिला इंद्राने विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी पाठवले होते असे रामायण म्हणत नाही पण महाभारत म्हणते!) शकुंतलेच्या जन्मानंतर मेनका तिला टाकून निघून गेली हे खरेच पण विश्वामित्रानेहि तेच केले. बहुधा जन्म होईपर्यंतहि तो थांबला नसेल! शकुंतला कण्वाच्या आश्रमात लहानाची मोठी झाली. राजा दुष्यंत शिकारीसाठी ससैन्य व सेवक मंत्री यांसह वनात आला होता व त्यावेळी तो कण्वाच्या आश्रमात आला व कण्व उपस्थित नसताना त्याची शकुंतलेशी गाठ पडली. त्यावेळी काय झाले याचे महाभारतातील वर्णन पुढील भागात पाहू.