Get it on Google Play
Download on the App Store

अंधानुकरण


आरोग्याशी संबंधित पाश्चात्त्यांनी दिलेला सल्ला म्हणजे हे पदार्थ वैज्ञानिकदृष्टय़ा प्रकृतीकरता उत्तमच असले पाहिजेत, ही धारणा भारतीयांमध्ये सहजी रुजते. आणि पाश्चात्त्य लोक त्यांचे सेवन करतात म्हणजे ते आरोग्याला योग्यच अशी समजूत आपल्याकडच्या तथाकथित उच्चभ्रू व नवश्रीमंत उच्च मध्यमवर्गाची झालेली आहे. (त्यांचं अंधानुकरण करणाऱ्या कनिष्ठ वर्गाला तर त्याची शहानिशा करण्याचीही गरज भासत नाही.) मग विषय ऑलिव्ह तेलाचा असो, ओट्सचा असो किंवा किवी-सफरचंदांचा! या उच्चभ्रू वर्गाकडून अमेरिकन व युरोपियनांच्या या खाद्यपदार्थाचे असे काही गुणगान गायले जाते, की हळूहळू मध्यमवर्ग व कनिष्ठ वर्गालासुद्धा वाटू लागते, की हे पदार्थ खाल्ले नाहीत तर आपल्या आरोग्याचे काही खरे नाही.तथापि या समजुतीमध्ये कितपत तथ्य आहे, हे समजून घेणे अगत्याचे आहे.यातील बहुतांश खाद्यपदार्थ भारतीयांच्या गळी उतरवण्यासाठी सर्वप्रथम कोलेस्टेरॉलचा बागुलबुवा निर्माण करण्यात आला. आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याच्या कामी भारतीय अन्नपदार्थापेक्षा आमचेच (पाश्चात्त्य) अन्नपदार्थ कसे अधिक उपयुक्त आहेत, हे जाहिरातबाजीच्या भडिमाराने त्यांना पटवले गेले. कोलेस्टेरॉलचा भयगंडया मुळातच डळमळीत असलेल्या संकल्पनेच्या आधारावर या पदार्थाचा प्रचार केलेला असल्याने ते तसे व तितके प्रत्यक्षात उपयुक्त आहेत की नाहीत, हे तपासणे इष्ट होय.