Get it on Google Play
Download on the App Store

४. फजिती

गणिताचा पेपर होता. प्रश्नपत्रिका नुकतीच त्याच्या हातात पडली होती. ती प्रश्नपत्रिका बघुन त्याला घाम फुटु लागला. त्याने ज्या प्रश्नांचा चांगला अभ्यास केला होता. ते प्रश्न त्याला कोठेही दिसत नव्हते. प्रश्नपत्रिकेतील तीन-चार प्रश्न सोडले तर एकही प्रश्न त्याला सोडवता येण्यासारखा नव्हता. तरीही तो सारखी-सारखी त्याच प्रश्नांवरुन नजर फिरवत होता. पण शेवटी उत्तर तेच... तो ह्या पेपरमध्ये पास होऊ शकत नव्हता.

त्याने त्याच्या पुढच्या बाकावर बसलेल्या त्याच्या मित्राला गुपचुप हात लावून त्याला त्याचा पेपर दाखवण्यास खुणवले. पुढे बसलेला त्याचा मित्र आपल्या परीने त्याला आपला पेपर दाखवू लागला. परंतू  त्यांच्या समोरच दोन शिक्षक उभे असल्याने त्याची मित्राचा पेपरमध्ये बघण्याची हिंमत होत नव्हती. त्याच्या भित्रेपणाला कंटाळून आधी त्याला पेपर दाखवण्यासाठी थोडा वाकडा होऊन बसणारा त्याचा मित्र आपला पेपर आपल्या समोर ठेऊन व्यवस्थित बसला आणि उत्तरपत्रिकेत नाक खुपसुन आपला पेपर लिहू लागला. मग शेवटी हताश होऊन त्याने पुन्हा आपले लक्ष आपल्या प्रश्नपत्रिकेवर केंद्रीत केले.

अशा परिस्थितीत आता कोणाचेही सहाय्य लाभणार नाही हे जाणुन त्याने आपल्या सवयीप्रमाणे समासात प्रश्न क्रं. एक असे लिहिले. आणि त्या प्रश्नाचा तो विचार करू लागला. पण तो  प्रश्न तर त्याला कितीही विचार केला तरी सोडवता येणारा नव्हता. म्हणून त्या प्रश्नासाठी पानभर जागा सोडून त्याने दुसऱ्या प्रश्नाला हात घातला. निदान प्रश्न क्रं. दोन तरी आपण सोडवू शकतो असे त्याला वाटत होते. म्हणुन तो त्या प्रश्नाचे स्वरुप समजुन घेण्याचा प्रयत्न करु लागला. त्या प्रश्नाला समजुन घेण्याकरिता बराच वेळ घालवल्यावर हा प्रश्नही आपण सोडवू शकणार नाही या गोष्टीचा त्याला साक्षात्कार झाला.

आता त्याने प्रश्न क्रमांक तीन वर आपले लक्ष केंद्रीत केले. तो त्याला पूर्णपणे सोडवता येण्यासारखा नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर त्याने त्यातील एक उपप्रश्न कसा-बसा सोडवला. तरी त्या प्रश्नाचे त्याने लिहिलेले उत्तर कितपत बरोबर होते हे त्याला देखील माहित नव्हते. तरी त्याच्या चेहऱ्यावर आता एक प्रश्न सोडवल्याचे समाधान झळकू लागले होते. प्रश्न क्रमांक पाच त्याच्या आवाक्याबाहेरचा आहे हे त्याने आधीच जाणले होते. त्यामुळे त्याने त्या प्रश्नावर वेळ वाया घालवणे सोडून सरळ प्रश्न क्रं. सहावर आपले लक्ष केंद्रित केले. तो प्रश्न त्याने आधी प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानावर 'रफ' म्हणुन सोडवून बघितला. त्यानंतर ज्यावेळी त्याला त्या प्रश्नाचे आपण काढलेले उत्तर बरोबर वाटले, त्यावेळी त्याने पुन्हा त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या उत्तरपत्रिकेत उतरवले.

आता तो प्रश्न क्रमांक सात मधील उपप्रश्न वाचु लागला. परंतू तो प्रश्न त्याने आजवर तरी कधी पहिल्याचे त्याला आठवत नव्हते. म्हणुन त्याने आपले लक्ष त्या खालील दुसऱ्या उपप्रश्नावर केंद्रीत केले. दुर्दैवाने तो प्रश्न सुद्धा त्याला सोडवता येण्यासारखा नव्हता. असे करता-करता पूर्ण प्रश्नपत्रिकेमधील प्रत्येक प्रश्न त्याने आपल्या डोळ्याखालुन घातले आणि सारखे-सारखे वाचुनही पाहिले. परंतु त्याने सोडवलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त त्याला कोणताही प्रश्न सोडवता येण्यासारखा नव्हता. काही केले तरी ह्या पेपरमध्ये आपण स्वत:हुन पास होऊ शकत नाही हे त्याला माहित होते. म्हणुन त्याने पुन्हा पुढे बसलेल्या त्याच्या मित्राला हात लाऊन त्याला पेपर दाखवण्यासाठी खुणावले. त्या मित्राने दयेखातर आपला पेपर त्याला बघता येईल असा धरला. 'काहीही झाले तरी आपल्याला  परीक्षेत पास व्हायचे आहे' या विचाराने त्याला मित्राच्या उत्तरपत्रिकेमध्ये जे काही दिसत होतं ते तो आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये आहे तसं उतरवू लागला. हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेल्या एका शिक्षकाने पाहिला होता. त्याने ह्या दोघांना रंगेहात पकडल्यामुळे त्या दोन्ही मुलांचे काहीही ऐकुन न घेता त्याने त्यांच्या उत्तरपत्रिका त्यांच्याकडून काढुन घेतल्या. तेव्हा ''तुला दाखवले हिच चुक झाली, नीट बघता पण येत नाही का? तु काहीही कर पण मला माझा पेपर त्या शिक्षकाकडून घेऊन दे.'' अशाप्रकारे त्याचा मित्र त्याची कानउघडणी करत होता. त्या शिक्षकाने त्यांच्याकडून उत्तरपत्रिका घेऊन जवळपास पाच मिनीटे झाली. तरी शरमेखातर त्या दोघांपैकी कोणीही त्या शिक्षकाकडून आपल्या उत्तर पत्रिका मागत नव्हते. 'तु मागतोय की नाय' त्याचा मित्र त्याला भिती दाखवत होता. त्यावर, 'त्यांना जवळ येऊ दे मग मागतो' असे आश्वासन तो त्याला देत होता.
तितक्यातच ही दोन मुले कुठे आहेत ते माहीत  नसल्याचा आव आणत 'अरे नालायकांनो तुम्ही अजुन इथेच आहात? जा घरी जाऊन पुढच्या पेपरचा अभ्यास करा' अशाप्रकारचे उद्गार त्या शिक्षकाच्या तोंडून  निघाले. हे दोघे आपल्याकडून उत्तरपत्रिका का मागत नाहीयेत? हे जाणुन घेण्याकरिताच त्या शिक्षकाला अशाप्रकारचा पुढाकार घ्यावा लागला होता. शिक्षकाच्या प्रश्नाचे काय उत्तर द्यायचे हे चांगलेच लक्षात आल्याने त्याने माफी मागीतल्यावर 'पुन्हा असे घडले तर बघा' असे बजाऊन शिक्षकाने त्या मुलांच्या उत्तरपत्रिका त्यांच्या हातात दिल्या. तसे ते दोघेही मुकपणे आपापल्या जागी शांत बसुन पुन्हा आपापल्या प्रश्न पत्रिकेमध्ये बघु लागले.

घडलेल्या प्रकारामुळे ते दोघे मस्करीचा विषय तर बनलेच होते. त्याचबरोबर त्याच्या दयाळु मित्राला शिक्षकांचे कडवे बोलही ऐकुन घ्यावे लागले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या सर्व प्रकारामुळे त्याच्या मित्राचा पाच-दहा मिनीटांचा वेळही वाया गेला होता. त्यामुळे तो आपल्याला पुन्हा काही साहाय्य करेल याची आशा आता पूर्णपणे मेली होती. परंतू त्याने आपल्याला निदान एका तरी प्रश्नाचे उत्तर दाखवल्याचे त्याला समाधान वाटले होते. त्यामुळे 'हाच खरा आपला मित्र!' अशाप्रकारच्या विचारांमुळे त्याच्या मनात कृतज्ञतेचे भाव जागृत झाले होते. तसेही त्याला त्या प्रश्नपत्रिकेमधील दोन-चार प्रश्न वगळता काहीच येत नसल्यामुळे त्याला शिक्षकाने त्याची उत्तरपत्रिका घेतल्याचेही वाईट वाटले नसले, तरी  थोडीशी लाज मात्र वाटली होती.

आता प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका त्याच्याजवळ असुनही त्यात त्याला काही पाहता येण्यासारखे उरले नसल्याने तो इकडे-तिकडे बघत आपला वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होता. सर्व मुले शांतपणे आपापला पेपर लिहित होती. हे पाहुन त्याला थोडे आश्चर्य वाटले आणि भितीही. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांपेक्षा 'फक्त आपल्यालाच पेपर अवघड वाटतो की काय?' हा प्रश्न त्याला अधिक अस्वस्थ करत होता. पेपरची वेळ संपायला अर्धा तास शिल्लक होता. त्यामुळे 'काही येवो किंवा न येवो उत्तरपत्रिका कोरी सोडायची नाही' या उद्देशाने तो त्याला जमेल तसे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवू लागला.

शेवटची घंटा वाजली. सर्वांच्या उत्तरपत्रिका जमा केल्या जाऊ लागल्या. हळू-हळू सर्व जण वर्गाच्या बाहेर पडू लागले. सर्वजण बाहेर आल्यावर त्या पेपरबद्दल चर्चा करत होते. त्याचे मित्रही आपापल्या वर्गातून बाहेर आले. तो बाहेर त्या सर्वांची वाट बघत बसला होता. त्याचे मित्र त्याच्या जवळ आल्यावर त्यांची चर्चा सुरु झाली. कोणी किती प्रश्न सोडवले, किती सोडले, कोणत्या प्रश्नाचे उत्तर काय? अशाप्रकारे बरीच उलट-सुलट चर्चा त्यांच्यात होत होती.अचानक 'प्रश्न क्रमांक नऊ चे उत्तर कसे लिहिले' असा प्रश्न कोणीतरी विचारला, तसे त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त सहाच प्रश्न असल्यामुळे त्याला तो प्रश्न ऐकताच हसू आले होते. पण ''हा.... त्याचे उत्तर ना....'' असे म्हणुन त्या प्रश्नाचे उत्तर कोणीतरी स्पष्ट केले. तेव्हा त्याने त्याच्या मित्राच्या हातातील प्रश्नपत्रिका आपल्या हातात घेतली. जशी त्याने तीची पाने बघीतली तसा तो वेडा पिसा झाला. आता काय करावे? हे त्याला सुचेनासे झाले. प्रश्न क्रमांक नऊ ज्या पानावर होता ते प्रश्नपत्रिकेचे पानच त्याला मिळाले नव्हते. त्या पानावर प्रश्न क्रमांक आठ, नऊ आणि दहा असे तीन प्रश्न होते. ज्या प्रश्नांचा त्याने परीक्षेसाठी चांगला अभ्यास केला होता तेच हे प्रश्न...