Get it on Google Play
Download on the App Store

८. माणूसपण...

कॉलेजमध्ये आल्यापासुन आतापर्यंत कॉलेजच्या भरपूर परिक्षा त्याने  दिल्या होत्या. पण आज त्याचा, बोर्डाच्या परिक्षेचा पहिलाच पेपर असल्यामुळे त्याला थोडेसे दडपण आले होते. पहिला पेपर म्हणून तो, वेळेच्या दोन तास आधीच घरा बाहेर पडला होता. परिक्षेला जाताना नको त्या संकटांचा सामना करावा लागू नये म्हणून तो आज चक्क रेल्वेचे तिकीट काढुन प्रवास करत होतो. ट्रेनमध्ये सकाळी कामावर जाणाऱ्या माणसांची बरीच गर्दी होती.  त्याला ज्या स्थानकावर उतरायचे होते ते फक्त  वीस मिनिटांच्या अंतरावर असल्याने तो ट्रेनमध्ये जागा शोधून बसण्याची धडपड न करता, ट्रेनच्या दरवाजा जवळ उभा राहुन प्रवास करत होता.

दोन स्थानकांचे अंतर पार केल्यानंतर ट्रेन अचानकपणे एके ठिकाणी थांबली. त्यावेळी ट्रेनचे मागचे दोन डब्बे फलाटाजवळील रुळावर तर बाकीचे डब्बे त्यापुढील रुळावर होते. कुठल्याशा तांत्रिक कारणामुळे ट्रेन थांबली असावी असाच सुरुवातीला सर्व  प्रवाशांचा समज झाला होता. पण बराच वेळ निघुन गेल्यावरही ट्रेन जागेवरुन हलली नाही. तेव्हा, 'अशी मध्येच अचानकपणे ट्रेन का थांबली असावी' ह्या  विषयावर प्रवाशांमध्ये उलटसुलट चर्चा होऊ लागली. तर काही माणसे ट्रेनच्या दरवाजातून  माना डोकावून ट्रेनच्या मागच्या व पुढच्या डब्यांकडे पाहू लागले. तेव्हा कुठे त्यांना, कोणीतरी  व्यक्ती ट्रेनमधून खाली पडून जखमी झाल्याचे कळले.

परीक्षेसाठी जाणारा मुलगा ट्रेनच्या तिसऱ्या डब्यामध्ये होता. तो असलेल्या डब्याच्या पाठीमागचे दोन डब्बे फलाटावर असल्यामुळे त्यातील प्रवासी फलाटावर उतरुन घडलेला प्रकार जवळून पाहू शकत होते.परंतु त्या दोन डब्यांच्या पुढील डब्यातील प्रवाशांना मात्र घडलेला प्रकार नीट पहाता येण्यासारखा नव्हता. तरीही लोकांच्या उलट सुलट चर्चा  ऐकून त्या मुलालाही ट्रेनच्या दरवाजातून बाहेर डोकावून घडलेला प्रकार पाहण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने ट्रेनच्या बाहेर डोकावून बघितले तोच त्याला समोरुन, एका जखमी माणसाला त्याच्या हाता-पायाला धरुन त्याला उचलुन घेऊन चालणारी दोन माणसे  दिसली. फलाटालगत ट्रेनचे दोन डब्बे ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी त्यांनी त्या जखमी व्यक्तीला नेऊन फलाटावरील जमीनीवर ठेवले.

त्या जखमी व्यक्तीच्या अवस्थेवरुन त्याला लवकरात लवकर डॉक्टरांकडे नेऊन त्यावर योग्य उपचार करण्याची गरज होती; ही गोष्ट त्याला पहाणाऱ्या  सर्वांच्याच लक्षात येण्यासारखी होती. सुरुवातीला, कोणीतरी घडलेल्या प्रकाराची सुचना रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवली असेल असा सर्वजण अंदाज बांंधत होते. परंतू, त्या जखमी व्यक्तीला फलाटावर ठेवण्याच्या घटनेला जवळपास पाच मिनिटांपेक्षाही अधिक वेळ झाला, तेव्हा या प्रकरणाची सुचना रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचली असावी की नाही? याबद्दल काहींच्या मनात शंका निर्माण झाली. अद्याप रेल्वेचा कोणीही कर्मचारी, किंवा पोलिस तिथे पोहोचला नव्हता. रेल्वे प्रशासनाकडून त्या व्यक्क्तीचे काय करायचे? हा निर्णय घेतला गेल्याशिवाय ट्रेन पुढे जाणार नव्हती. ही गोष्ट आत्तापर्यंत सर्वांच्याच लक्षात आली होती.

इतका वेळ झाला तरी ट्रेन काही सुरु व्हायचे नाव घेत नाही म्हणुन ट्रेनच्या डब्यामधुन नाराजीचे सुर ऐकु येत होते. तर काही ठिकाणी हा प्रकार कसा घडला असावा? या गोष्टीची चर्चा सुरु होती. बऱ्याच वेळेपासून तो मुलगा अधुन-मधुन ट्रेेनच्या डब्यातुन बाहेर डोकावून फलाटावर असलेल्या जखमी व्यक्तीकडे बघत होता. अपघात झालेला व्यक्ती ट्रेनच्या अगदी दरवाजात उभा राहून प्रवास करत असावा आणि ट्रेनमधील माणसांच्या प्रचंड गर्दीचा त्याच्यावर दबाव येऊन तो ट्रेनमधून खाली पडला असावा असा ट्रेनमधील लोकांचा अंदाज होता. कदाचित लोकांचा हा अंदाज खरा सुद्धा असु शकत होता कारण आत्तापर्यंत या आधीसुद्धा अशाप्रकारच्या कित्येक घटना घडून गेल्याची उदाहरणे त्याच्या समोर होती.

फलाटावर पडलेला तो जखमी व्यक्ती तिथे जराही आवाज न करता शांतपणे, फक्त पडून होता. भर वेगात धावणाऱ्या ट्रेनमधून पडल्याने त्याला बराच मार लागला असून त्याच्या शरीरातून बरेच रक्त बाहेर गेल्याने त्याची शुद्ध हरपलेली होती. आत्तापर्यंत  फलाटावरील ट्रेनच्या दोन डब्यांमधील काही लोक फलाटावर उतरुन त्याच्या अवती-भोवती जमा झाली होती. परंतु त्यांच्यापैकी कोणालाही त्याला हात लावण्याचीही हिंमत होत नव्हती. ज्या दोन प्रवाशांनी त्याला फलाटापर्यंत उचलून आणले होते ते सुद्धा आता त्याच्यापासुन थोडे लाबंच उभे राहून रेल्वे प्रशासनाची किंवा इतर कोणाची मदत मिळते का? ते पाहत होते.

ट्रेन थांबल्यापासुन म्हणजेच तो व्यक्ती ट्रेनमधून पडलेल्या घटनेला जवळपास पंधरा मिनिटे झाल्यावर रेल्वेचे दोन कर्मचारी हातात स्ट्रेचर घेऊन  तिथे पोहोचले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्याला त्या स्ट्रेचरवर टाकून ते फलाटाखाली उतरले. आता जखमी व्यक्तीला कुठे घेऊन जाणार हे पाहण्यासाठी ट्रेनमधील माणसे ट्रेनच्या बाहेर डोकावू लागली. त्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला त्याच ट्रेनमधील अपंगांसाठी असलेल्या डब्यात ठेवले आणि ते सुद्धा त्यातच चढले. त्यानंतर जवळपास दोन मिनिटांनी ट्रेन सुरु झाली. त्याबरोबरच त्या मुलाच्या डोक्यात एक नवीन विचारचक्र  सुरु झाले. आता पुढे त्या जखमी व्यक्तीचं काय होईल? रेल्वे प्रशासनाच्या रटाळ यंत्रणेमुळे त्याला तिथून नेण्यासाठी आधीच खूप उशीर झाला होता. तसेच या पुढे तरी त्याला योग्य उपचार मिळतील याबाबत शंका होतीच!

त्याच्या डोळ्यासमोर सगळे काही घडत होते. त्या जखमी व्यक्त्तीचा जीव वाचविण्याकरिता कोणीतरी पुढाकार घेऊन त्याला सहाय्य पुरविणे आवश्यक होते. त्याला देखील त्याच्या अवस्थेबद्दल मनातून बरेच काही वाटत होते. पण तो करु तरी काय शकणार होता? परिक्षेसाठी जाणाऱ्या त्या मुलाला मनातून त्या जखमी व्यक्तीची अवस्था पाहुन त्याबद्द्ल कितीही दु:ख वाटले, तरी तो फक्त त्याचा विचार करण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नव्हता. दररोज आपल्या डोळ्यासमोर अशा कितीतरी घटना घडत असतात ज्यांचा आपल्याशी काहीही संबध नसतो, बघायला गेलो तर त्या घटनांचा आपल्या जीवनावर काही परिणाम पडणारा  नसतो. कितीही झाले तरी ज्याला त्याला आपापली कामे आणि आपापले असंख्य व्याप असतात. त्यात इतरांचे दुखणे आपल्या अंगावर घेण्याकरिता वेळ कोणाकडे आहे? याच मानसिकतेने जगातील बहुसंख्य लोक जगत असतात. परंतू तो त्यांच्यापैकी एक नव्हता. मनाशी कसलातरी  निर्धार  करुन, पुढील स्थानकावर ट्रेन थांबताच तो ट्रेनच्या त्या डब्यातुन बाहेर पडला आणि थेट त्या जखमी व्यक्तीला ज्या डब्यात ठेवण्यात आले होते त्या डब्यात चढला. आपल्या डोळ्यासमोर एखाद्या व्यक्तीचा जीव जात असताना आपण त्याचा जीव वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न न करता फक्त बघत बसावे हे नक्कीच त्याला मान्य नसावे. आपली परिक्षा आपला पेपर... हे विचार बाजुला ठेऊन तो कोणाचातरी जीव वाचवण्याकरीता त्याच्या मदतीला धाऊन गेला होता. पुढे त्या जखमी व्यक्तीचे काय झाले? तो जगला? की.... हे माहित नाही. परंतू आपला स्वार्थ बाजूला ठेऊन, आपले सर्व व्याप विसरुन प्रसंगी परिणामांची पर्वा न करता कोणाच्याही मदतीला धाऊन जाणे यालाच खरा 'माणूस' म्हटले पाहिजे हे त्या मुलाने आपल्या कृतीतून दाखवून दिले होते.