Get it on Google Play
Download on the App Store

ईजिप्तवरील मोहीम

स. १७९५ पासून फ्रान्समध्यं पांच डायरेक्टर सर्व सत्ताधारी बनले होते. त्यांच्या अरेरावीमुळें लोकमत विरूद्बनून एक मॉडरेटपक्ष निर्माण झाला, व त्यानें आपल्या मतांचा बार्थिलेमी नांवाचा इसम पांचवा डायरेक्टर निवडला. त्याच्या बाजूला कार्नो मिळून डायरेक्टरांत दुफळी झाली. तेव्हां बारसपक्षानें नेपोलियनला वश करून त्यानें पाठविलेल्या जनरल आगेरोच्या मदतीनें मॉडरेटपक्षाचा पराभव केला. स. १७९७ च्या डिसेंबरांत तो पॅरिसला परतल्यावर डिरेक्टर होण्यास, लायक आहे असें कित्येकांनीं सुचविलें; पण त्यानें तें नाकारलें. डायरेक्टरांनीं डोईजड होऊं लागलेल्या नेपोलियनला इंग्लंडवर स्वारी करण्याची कामगिरी सांगितली व त्याकरितां फ्रान्सच्या उत्तर किना-यावर चाललेल्या आरमारी तयारीची, नेपोलियन पहाणी करून आला व ती फार अपुरी असल्याचें मत देऊन जर्मनीचा उत्तर किनारा किंवा ईजिप्त वगैरे पौरस्त्य देश जिंकून ब्रिटिश व्यापार बंद पाडण्याची योजना त्यानें सुचविली. नेपोलियन दूर देशी गेलेला बरा, असं डायरेक्टरांस वाट असल्यामुळें त्यांनां ईजिप्तच्या मोहिमेस रूकार दिला. ईजिप्तच्या मोहिमेचा बेत नेपोलियनच्या मनांत फार दिवस घोळत होता. ईजिप्त जिंकला कीं आशि सहज जिंकतां येईल व हिंदुस्थानावर चाल करून टिप्पू व मराठे यांच्या मदतीनें इंग्रजांनां घालवून लावतां येईल आणि अलेक्झांडर दि ग्रेटलाहि साधलें नाहीं तें सर्व हिंदुस्थान जिंकून हस्तगत करण्याचें श्रेय मिळेल असलें मनोराज्य नेपोलियननें उभारिलें होतें. डायरेक्टारांचा हुकुम मिळतांच त्यानें जय्यत तयारी केली. तेरा मोठीं, चवदा मध्यम व बरींचशीं लहान लढाऊ जहाजें आणि सामान भरलेलीं ३०० जहाजें, शिवाय ईजिप्तमधील पुराणवस्तुसंशोधनाकरितां चांगले शास्त्रज्ञ, कलाभिज्ञ, इंजिनियर वगैरे विद्वान इसम, यंत्रसामुग्री व छापण्याचें सामान बरोबर घेऊन तो १९ मे १७९८ रोजीं टूलोन बंदरांतून निघाला. भूमध्यसमुद्रांत ब्रिटीश आरमाराचा अडथळा होऊं नये म्हणून त्यानें इंग्लंडवरच्या मोहिमेची हूल उठविली होती. नेपोलियननें वाटेंत माल्टा हस्तगत करून २ जुलै रोजीं आलेक्झंड्रिया शहर घेतलें. पुढें मनोर्‍यानजीकच्या (पिरॅमिड) लढाईंत अरबांचा पूर्ण पराभव करून लवकर कायरो शहर हस्तगत केलें व तेथें नवी राज्यव्यवस्था सुरू केली. अरब व इंग्रज ह्यांनीं पुन्हां लढाईची तयारी केली. तेव्हां एकर येथें पराभव झाल्यामुळें व विशेषत: फ्रान्समध्यें अव्यवस्था माजल्यामुळें नेपोलियन ९ आक्टोबर १७९९ रोजीं फ्रान्सला परत आला. सुवेझ कालवा व इतर शेतकीचे कालवे तयार करण्याचे बेत तसेच राहिले. मात्र या मोहिमेमुळें आरमारी सामर्थ्य असलेल्या पाश्चात्त्य राष्ट्राला ईजिप्तवर सहज सत्ता बसवितां येईलसें ठरलें. माल्टा बेट इंग्रजांनीं घेतलें व हिंदुस्थानांत ब्रटिश सरकारनें नेपोलियनच्या भीतीनें टिप्पूचा पूर्ण नाश केला. ईजिप्तमध्यें रोझेटास्टोन हस्तगत होऊन ईजिप्शियन लिपीचें वाचन सुबोध झालें व पुराणवस्तुशोधांत इतर भर पडली.