Get it on Google Play
Download on the App Store

भयसापळा, मोहसापळा: डॉ. विकास आमटे

संकलित


अत्यंत सुंदर विवेचन आहे.


पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते. खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो.

याला भयसापळा असे म्हणता येईल.


जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे. "हा आधार गेला तर,' अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्‍यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही..!


माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे. एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्‍यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्‍यात हात घालते. मडक्‍याचे तोंड हे अगदी नेमक्‍या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनाने अडकते व शरीराने मडक्‍यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.


आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा! थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच मुक्तिदायक नाही काय?


पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं,

हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.


भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.


-- डॉ. विकास आमटे..