Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १५

.... प्रोफेसर आणि अॅंड्र्यूला त्या गुप्त चेंबर मध्ये कैद करून अभिजीत कॅप्टन गिनयू कडे परत आला. कॅप्टन गिनयूने त्याच हसून स्वागत केलं.



कॅप्टन गिनयू: ये अभिजीत ये, शाबास फार चांगले काम केलेस तु. तु माझा एक फार हुशार गुलाम आहेस.



"पण कॅप्टन त्या दोघांना कैद करून तुम्हाला नेमकं काय साधायचे आहे. नाही म्हणजे आम्हाला जर आज्ञा दिली असती तर आम्ही केव्हाच त्यांचं काम तमाम करून टाकले असते." कॅप्टन गिनयूच्या एका अंगरक्षकाने विचारलं.



कॅप्टन गिनयू: नाही यामू, इतक्या लवकर नाही. मी त्यांना मारेल. पण वेळ आल्यावर. मला माहीत आहे कि तो अॅंड्र्यू सन २१५० मधून मला रोखण्यासाठी आणि या पृथ्वीला वाचवण्यासाठी आला आहे. पण त्याला अजुन कल्पना नाही कि कॅप्टन गिनयू काय चीज आहे ते. मी सर्वात आधी त्याच्या डोळ्यांसमोर या पृथ्वीचा विनाश करेल आणि मग त्याला मारेल. काय मजा येईल नाही.



"पण कॅप्टन त्यांना जर ते डेड सी स्क्रॉल्स सापडल तर? तर ते द सीक्रेट चेंबर ऑफ ओसायरीस मध्ये पोहोचण्यात सफल होतील आणि तसं झालं तर ते आपला प्लॅन फेल करू शकतात." दुसऱ्या अंगरक्षकाने आपली शंका उपस्थित केली.



कॅप्टन गिनयू: ते एवढं सोपं नाही, स्पोपोविच. तो एकटा आपली ती गोष्ट नष्ट करू शकत नाही. ह्या अभिजीतला तर आपण आपला गुलाम बनवल आहे. आता फक्त आपल्याला त्या म्हाताऱ्याला ठिकाणावर लावायचय. हे दोघे जण आपल्या रस्त्यातून बाजूला झाले कि  तो अॅंड्र्यू एकटा पडेल. मग तो आपलं काहीच बिघडवू शकणार नाही. समजलं.



स्पोपोविच: येस कॅप्टन, तुम्ही खरंच कमाल आहात.



                      *******************



                                इकडे त्या गुप्त चेंबर मध्ये  प्रोफेसर चिंताग्रस्त अवस्थेत बसले होते. अॅंड्र्यू इकडून तिकडे फेऱ्या मारत होता.



प्रोफेसर: तुला या सगळ्याची कल्पना होती, हो ना?



अॅंड्र्यू: हो आणि नाही.



प्रोफेसर: काय बोलतोयस? हो कि नाही?



अॅंड्र्यू: प्रोफेसर, माझा अंदाज होता कि तो कॅप्टन गिनयू अभिजीतला कैद करेल. पण तो त्याच्या मेंदूवर ताबा मिळवेल याचा मी अजिबात विचार केला नव्हता. 



प्रोफेसर: पण मग आता काय करायचं? आपल्याला कसंही करून इथून बाहेर पडावं लागेल. अरे तुझी ती भिंती कापायची करवत कुठे गेली, ज्याने आपण त्या तुरूंगातून बाहेर पडलो होतो. ती काढ ना.



अॅंड्र्यू: त्याचा काही फायदा नाही, प्रोफेसर. ती करवत फक्त लाईमस्टोनच्या भिंतींवरच काम करते.



प्रोफेसर: म्हणजे इथून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही.



अॅंड्र्यू: आहे. पण आपण जर त्या गोष्टीचा वापर केला तर आपलं सत्य सगळ्यां समोर उघड पडेल. पण आता वाटतंय कि त्याशिवाय दुसरा मार्ग नाही.



असं म्हणून अॅंड्र्यूने आपल्या 3 डायमेन्शनल पॉकेट मधून एक बॉक्स काढला. तो बॉक्स त्याने हळूच जमिनीवर ठेवून त्याच झाकण उघडले. त्या बॉक्स मध्ये ४-५ गोळे होते. अॅंड्र्यूने त्यातून एक गोळा उचलला. आणि म्हणाला,



"प्रोफेसर, त्या कोपऱ्यात जाऊन उभं रहा."



प्रोफेसर अॅंड्र्यूच्या सांगण्याप्रमाणे प्रोफेसर दूरच्या कोपऱ्यात जाऊन उभे राहिले. अॅंड्र्यूने त्या गोळ्याच्या खालच्या बाजूला असलेल बटन दाबले. अचानक तो गोळा चमकायला लागला. अॅंड्र्यूने चपळाईने तो गोळा त्या चेंबरच्या दरवाज्या जवळ ठेवला आणि प्रोफेसरांजवळ जाऊन उभा राहिला. काही क्षणांची शांतता. आणि अचानक कानठळ्या बसवणारा आवाज झाला. त्या चेंबरच्या दरवाज्याचे आणि दरवाज्याच्या आजुबाजुच्या भिंतींचे अक्षरशः चिथडे उडाले होते. 



अॅंड्र्यू: ट्वेंटी सेकंड सेंच्युरीतील सगळ्यात ताकदवान बॉम्ब आहे. याची रेंज फार कमी असली तरी त्याचा परिणाम फार भयंकर असतो. चला.



असं म्हणून अॅंड्र्यू आणि प्रोफेसर चेंबरच्या बाहेर आले. अचानक त्यांना काही लोकांच्या पावलांचा आवाज आला. काही क्षणांतच दोघांनाही पिरामिडच्या पहारेकऱ्यांनी चारी बाजूंनी घेरले. वजीर होरेमहेब तिथे येऊन पोहोचला. त्याने त्या चेंबरची हालत बघितली. आणि आपल्या पहारेकऱ्यांना म्हणाला,



"बघता काय? पकडा त्या दोघांना."



ते पहारेकरी त्या दोघांना पकडण्यासाठी पुढे सरसावले. इतक्यात अॅंड्र्यू म्हणाला,



"थांबा. वजीर होरेमहेब, आमची तुमच्याशी कोणतीही शत्रुता नाही. आणि आम्ही तुम्हाला इथे इजा करायलाही आलेलो नाही. आम्हाला फक्त कॅप्टन गिनयू कडे घेऊन चला. ते ओळखतात आम्हाला."



कॅप्टन गिनयूच नाव ऐकताच वजीर होरेमहेबच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. काही वेळ त्याने अॅंड्र्यूच्या चेहऱ्याचे निरीक्षण केले आणि अचानक मागे वळून "माझ्या मागे या." असं म्हणून पुढे निघाला. अॅंड्र्यू आणि प्रोफेसर त्याच्या मागे निघाले.



                                          काही वेळ चालल्यावर ते एका चेंबर जवळ पोहोचले. तिथे कॅप्टन गिनयूचे दोन्ही अंगरक्षक यामू आणि स्पोपोविच उभे होते.



यामू: वजीर होरेमहेब, तुम्ही इथे? काय झालं?



वजीर होरेमहेब: या दोघांना कॅप्टन गिनयूंना भेटायचं आहे.



स्पोपोविच: ठिक आहे. तुम्ही जा. या दोघांच काय करायचं ते आम्ही बघतो.



वजीर होरेमहेब आपल्या पहारेकऱ्यांसह तिथून निघून गेला.



यामू:  आत या.  कॅप्टन गिनयू तुमची वाट पाहत आहेत.



यामू आणि स्पोपोविचच्या मागे ते दोघेही चेंबर मध्ये शिरले. कॅप्टन गिनयू आपल्या सिंहासनावर बसला होता. अभिजीत त्याच्या बाजूला उभा होता. कॅप्टन गिनयूने हसत त्यांचं स्वागत केलं,



"ये, अॅंड्र्यू ये, तुझीच वाट पाहत होतो मी. अरे व्वा, प्रोफेसर सुध्दा आहेत का छान, छान. यामू आणि स्पोपोविच, आपल्या पाहुण्यांच चांगलं आदरातिथ्य करा. त्यांना काही कमी नको पडायला."



अॅंड्र्यू: बस झालं तुझ नाटक गिनयू, मला माहीत आहे तु अभिजीतच माईंड कंट्रोल केलं आहेस. तुझ भल यातच आहे कि तु लवकरात लवकर त्याला स्वतंत्र कर. नाहीतर...



कॅप्टन गिनयू: अरे हो हो, इतका संताप चांगला नसतो. अभिजीत आता माझा गुलाम आहे. बरं झालं. तु मला इथेच भेटलास ते. आता तु इथून जिवंत परत जाऊ शकणार नाही. यामू, स्पोपोविच पकडा त्या दोघांना.



कॅप्टन गिनयूची आज्ञा मिळताच त्याचे दोन्ही अंगरक्षक पुढे सरसावले, तसे अॅंड्र्यूने चपळाईने आपल्या पॉकेट मध्ये हात टाकून एक बंदूक बाहेर काढली. 



अॅंड्र्यू: खबरदार, जर कोणी एक पाऊलही पुढे टाकले तर.



अॅंड्र्यूच्या हातातील ती बंदूक बघून यामू आणि स्पोपोविच जागीच थबकले. 



कॅप्टन गिनयू: अरे व्वा, मला माहीत नव्हतं कि तुझ्या कडे सुध्दा लेजर गन असेल म्हणून.



अॅंड्र्यू: तुला काय वाटल तुझ्या सारख्या शैतानाशी लढायला मी रिकाम्या हाताने येईल?



कॅप्टन गिनयू: हं, थोडक्यात मानवांकडेही बुध्दी नावाचा प्रकार आहे म्हणायचा.



असं म्हणून कॅप्टन गिनयूने हळूच आपला हात त्या विचित्र हेल्मेट  कडे केला, ज्याने अभिजीतच माईंड कंट्रोल केलं होतं. पण अॅंड्र्यू सावध होता. त्याने लेजर गन हेल्मेट कडे करून तिचा चाप दाबला. तत्क्षणी त्या बंदुकीतून एक लेजर निघाली आणि हेल्मेटला छेदून गेली. त्या हेल्मेटला एक मोठ छिद्र पडले आणि ते हेल्मेट निकामी झाले. ते हेल्मेट निकामी झाल्याबरोबर इकडे अभिजीत चक्कर येऊन  पडला. प्रोफेसरांनी अभिजीतला सावरल. तो बेशुद्ध झाला होता. अॅंड्र्यूच्या या अचानक हल्ल्याने कॅप्टन गिनयू सुध्दा गांगरून गेला होता. पण त्याने लगेच स्वत:ला सावरलं.



  अॅंड्र्यू: आता समजलं. तु याच माईंड कंट्रोल हेल्मेटने अभिजीतला गुलाम बनवलं होतस. पण आता ते हेल्मेट नष्ट झालं आहे. 



आपल्या बॉस वर झालेल्या या हल्ल्याने संतापलेल्या यामूने अॅंड्र्यू वर झेप घेतली. पण अॅड्र्यूने पुन्हा चपळता दाखवत लेजर गनचा चाप दाबला. त्यातून निघालेल्या लेजरने यामूच्या छातीचा वेध घेतला. त्याच्या छातीतून लेजर आरपार झालं आणि यामू जमिनीवर  कोसळला. 



"नाही यामू." स्पोपोविच किंचाळत यामूच्या शरीरा जवळ आला. तो केव्हाच मेला होता. त्याने संतापाने अॅंड्र्यू कडे बघितलं आणि उद्गारला, 



"तु माझ्या भावाला मारलस. हे तु चांगलं नाही केलंस आता तु माझ्या हाताने मरशील."



असं म्हणून तो अॅंड्र्यू कडे झेपावणार इतक्यात कॅप्टन गिनयूने त्याला थांबवले आणि एक सुचक इशारा केला. स्पोपोविचला तो इशारा समजला आणि त्याने मान हलवली आणि स्पोपोविच वरून अॅड्र्यूच लक्ष विचलित करण्यासाठी कॅप्टन गिनयू त्याला म्हणाला,



"मानावं लागेल अॅंड्र्यू, आपण जेव्हा मागच्या वेळेस भेटलो होतो, तेव्हा पासून तु फार चांगला योध्दा बनला आहेस. माझ्या बाजूला ये. त्यात तुझाच फायदा आहे."



अॅंड्र्यू: अरे जा, तुझ्या या आमिषाचा माझ्यावर काही फरक पडणार नाही. मी जिवंत असेपर्यंत तु पृथ्वीला धक्का सुध्दा लावू शकत नाही.



अचानक अॅंड्र्यूला कोणाच्या तरी कण्हण्याचा आवाज आला. त्याने वळून पाहिले, स्पोपोविचने प्रोफेसरांना आपल्या मजबूत बाहूपाशात जखडले होते. त्याची पकड इतकी घट्ट होती कि प्रोफेसरांना हलता सुध्दा येत नव्हते. 



अॅंड्र्यू: प्रोफेसर.



अॅंड्र्यूच लक्ष विचलित झालंय हे पाहताच कॅप्टन गिनयूने बाजुला पडलेल हेल्मेट उचलून अॅंड्र्यूच्या हातावर मारून फेकल. त्या फटक्यामुळे अॅंड्र्यूच्या हातातील लेजर गन खाली पडली. कॅप्टन गिनयूने झडप घालून ती लेजर गन आपल्या ताब्यात घेतली आणि अॅंड्र्यू वर रोखली‌.



कॅप्टन गिनयू: हे बघ अॅंड्र्यू, मी तुला एक संधी दिली होती. पण तुझ्याच डोक्यात भुसा भरलेला आहे तर त्याला मी काय करणार. तेव्हा आता मरण्यास तयार रहा. नाही, नाही. थांब. तुला इतका सोपा मृत्यू दिला तर काही मजा येणार नाही. त्याआधी मी तुझ्या डोळ्यांसमोर ही पृथ्वी, हे ब्रम्हांड नष्ट करेल आणि मग तुला मारेल. काय मजा येईल नाही? पण आता....



असं म्हणून त्याने ती लेजर गन प्रोफेसरांवर ताणली आणि स्पोपोविचला एक इशारा केला. त्याने प्रोफेसरांवरची पकड सोडली आणि बाजूला झाला.



"प्रोफेसर, बाजूला व्हा." अॅंड्र्यू ओरडला. पण प्रोफेसर आधीच त्या मजबूत पकडी मुळे अर्धमेले झाले होते. अॅंड्र्यूचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही. कॅप्टन गिनयूने लेजर गनचा चाप दाबला. सगळं काही एका क्षणात घडलं. अॅंड्र्यूने चपळाईने हालचाल करून प्रोफेसरांना दूर लोटल, मात्र तो स्वत: ला वाचवू शकला नाही. त्या लेजर गनने अॅंड्र्यूच्या छातीचा वेध घेतला होता. ती लेजर त्याच्या छातीच्या आरपार झाली होती. तो जखमी अवस्थेत खाली कोसळला. 



कॅप्टन गिनयू: स्पोपोविच, या म्हाताऱ्याला उचल. 



असं म्हणून त्याने ती लेजर गन तिथेच फेकली आणि चेंबर मधून बाहेर पडला. त्याच्यामागे स्पोपोविच प्रोफेसरांना घेऊन निघाला. ते दोघेही तिथून गेल्यानंतर इकडे लगेच अभिजीत शुध्दीवर आला. ते हेल्मेट निकामी झाल्याने तो पुर्ववत झाला होता. काही क्षण त्याला काहीच समजत नव्हते. अचानक त्याला सगळं आठवलं. त्याने आजुबाजुला दृष्टी टाकली. तिथे त्याला फक्त एक लेजर गन, यामूच प्रेत आणि जखमी अवस्थेत पडलेला अॅंड्र्यू दिसला. अभिजीत अॅंड्र्यू जवळ येऊन पोहोचला. त्याच्या छातीत एक मोठ छिद्र होत.



अभिजीत: अॅंड्र्यू, हे... हे कसं झालं? कोणी केल?



अॅंड्र्यू: क... कॅप्टन गिनयू, त.... त्यानेच केलंय हे... हे सगळं. त.... तो प्रोफेसरांना घेऊन ग... गेला. म... मला नाही वाटत कि... कि मी आता जास्त वेळ जगेल. 



अभिजीत: नाही, मी तुला काही होऊ देणार नाही. काहीतरी मार्ग असेल.



अॅंड्र्यू: नाही. क... काही मार्ग नाही. ले.... लेजर गनच्या घावापासून को..... कोणीही वाचु शकत नाही. अभिजीत, आता क... कॅप्टन गिनयूला तुलाच रोखावे लागेल. या प... पृथ्वीच भविष्य आता तुझ्या हातात आहे...



इतकं बोलून अॅंड्र्यूने प्राण सोडला. अभिजीत सुन्न झाला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याने बाजूला पडलेली लेजर गन उचलली.



अभिजीत: अॅंड्र्यू, मी वचन देतो. तुझ अर्धवट काम मी पूर्ण करेल. कॅप्टन गिनयू तुझे वाईट दिवस आता सुरू होतील.  तुझ साम्राज्य मुळापासून उखडून फेकेल मी. उध्वस्त करून टाकेल मी तुला.



इतकं बोलून अभिजीत चेंबर मधून बाहेर पडला....



                                                 क्रमशः