Get it on Google Play
Download on the App Store

गुढी शब्दाची उकल

तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखित 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर "गुढ्या घालुनी वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९ (?)" असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी, झोपडी, अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे.

हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे ग चा क (अथवा क चा ग) होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते तरीही राहण्याची जागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची) संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेन्सस ऑफ इंडिया - गाव नावांची यादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते.