Get it on Google Play
Download on the App Store

अघटित घटना 5

'हे पाहा, तुमचे दात फार सुंदर आहेत. ते द्याल का काढून? कसे मोत्यांसारखे आहेत. एका सिनेमा कंपनीला ते पाहिजे आहेत. तुम्हाला मोबदला मिळेल. योग्य ती किंमत मिळेल. पाहा विचार करून.' तो म्हणाला.

'माझं हसणं पाहून पूर्वी लोक मोहित होत असत. माझे हे शुभ्र दात जगाला दिसावेत म्हणून मी पूर्वी मुद्दाम हसत असे. ते दात काढून देऊ? काय हरकत आहे? आता कोणाला हसून दाखवायचं आहे? आता माझ्या सार्‍या जीवनाचंच हसू येतं आहे! देईन, माझे दात काढून देईन. परंतु एखादा डॉक्टर इथंच आणाल का? घरच्या घरी काढून घ्या दात,' ती म्हणाली.

दुसर्‍या दिवशी डॉक्टर आले. लिलीच्या आईचे ते सुंदर दात एकामागून एक काढण्यात आले. ते दात विकण्यात आले. लिलीच्या आईला पैसे मिळाले. ते लिलीला पाठविण्यात आले; परंतु पुन्हा पैशांची मागणी आली तर! आता का डोळे काढून द्यावयाचे! लिलीची आई या विचारात असे.

लिलीची आई घरातून बाहेर पडत नसे. तिला लाज वाटे. तिचे सुंदर केस नष्ट झाले होते. तोंडाचे आता बोळके झाले होते. ती विद्रुप दिसे. लोक तिला हसत. पोरे तिच्या पाठीस लागत. कोणी दगड मारी, कोणी वेडावी. मग लिलीची आईही दु:खाने संतापे. तीही शिव्या देऊ लागे. तीही हातात दगड घेऊन मारू लागे. लोक म्हणत, हिला वेड लागले.

लिलीच्या आईला त्या कारखान्याच्या मालकाची फार चीड येई. त्त्या कारखान्यातून काढून टाकण्यात आले नसते तर अशी परिस्थिती येती ना. केस कापावे लागते ना. दात काढून टाकावे लागते ना. लोक म्हणतात, तो कारखानदार उदार आहे. तो गोरगरिबांच्या उपयोगी पडतो. कसला उदार नि कसले काय? माझी तर अत्यंत वाईट दशा त्याने केली आहे. दुष्ट आहे मेला, असे लिलीची आई मनात म्हणे. त्या उदार महात्म्याची कोणी स्तुती करू लागला, तर लिलीची आई बोटे मोडीत कपाळाला आठया पाडी. पापी चांडाळ आहे मेला, असे म्हणे. ती स्तुती तिला सहन होत नसे.

एके दिवशी एक विशेष प्रकार घडला. तो उदार पुरुष फिरायला गेला होता. त्या बाजूच्या रस्त्याला मोठा उतार होता. एक गाडी त्या बाजूने येत होती. बैल वाटते नवीन होते. ते बैल उधळले. भडकले. ते गाडी भलतीकडे नेऊ लागले. अरे, तिकडे तर खळगा आहे. भयंकर खळगा. बैल खळग्यात टाकणार का उडी! अरे, ते पाहा चाक! गेले. जवळ जवळ खाली चालले. फूट अर्धा फूट अंतर! जरा आणखी चाक बाजूला गेले की गाडी खळग्यात जाणार! काय करावे! चालले, - चाक चालले! एका क्षणाचा अवकाश!

दु:खी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
साधू 1 साधू 2 साधू 3 साधू 4 साधू 5 साधू 6 साधू 7 साधू 8 साधू 9 साधू 10 अभगिनी व तिची लहान मुलगी 1 अभगिनी व तिची लहान मुलगी 2 अभगिनी व तिची लहान मुलगी 3 अभगिनी व तिची लहान मुलगी 4 अभगिनी व तिची लहान मुलगी 5 अभगिनी व तिची लहान मुलगी 6 अभगिनी व तिची लहान मुलगी 7 अभगिनी व तिची लहान मुलगी 8 अभगिनी व तिची लहान मुलगी 9 अभगिनी व तिची लहान मुलगी 10 अघटित घटना 1 अघटित घटना 2 अघटित घटना 3 अघटित घटना 4 अघटित घटना 5 अघटित घटना 6 अघटित घटना 7 अघटित घटना 8 अघटित घटना 9 अघटित घटना 10 अघटित घटना 11 अघटित घटना 12 अघटित घटना 13 अटक 1 अटक 2 अटक 3 समुद्रात 1 समुद्रात 2 लिलीची भेट 1 लिलीची भेट 2 लिलीची भेट 3 लिलीची भेट 4 लिलीची भेट 5 लिलीची भेट 6 लिलीची भेट 7 लिलीची भेट 8 तो तरुण 1 तो तरुण 2 तो तरुण 3 तो तरुण 4 भूत बंगला 1 भूत बंगला 2 भूत बंगला 3 भूत बंगला 4 भूत बंगला 5 भूत बंगला 6 भूत बंगला 7 भूत बंगला 8 भूत बंगला 9 भूत बंगला 10 प्रेमाचा अंकुर 1 प्रेमाचा अंकुर 2 प्रेमाचा अंकुर 3 प्रेमाचा अंकुर 4 प्रेमाचा अंकुर 5 क्रांतीची ज्वाला भडकली 1 क्रांतीची ज्वाला भडकली 2 क्रांतीची ज्वाला भडकली 3 क्रांतीची ज्वाला भडकली 4 क्रांतीची ज्वाला भडकली 5 क्रांतीची ज्वाला भडकली 6 अंमलदाराचा शेवट 1 अंमलदाराचा शेवट 2 लिलीचे लग्न 1 लिलीचे लग्न 2 शेवट 1 शेवट 2 शेवट 3 शेवट 4