Get it on Google Play
Download on the App Store

श्री शिवराय 6

गरीबांचे संघटन
“मी गढीवाल्यांच्या गढ्या नष्ट करण्यासाठी आलो आहे” हे शिवरायांचे शब्द वा-यावर सर्वत्र गेले. महाराष्ट्रातील सारी गरीब जनता एक होऊ लागली. शिवरायांनी सर्वांना जवळ केले. ब्राह्मण, प्रभू, मराठे, अठरापगड जातींतील तेजस्वी, निश्चयी, त्यागी माणसे जमू लागली. मराठा म्हणजे आडनावी मराठा नव्हे; महाराष्ट्र ज्याला आपला वाटतो, महाराष्ट्र ज्याला मातृभूमी वाटते, महाराष्ट्रात दारूण दैन्य, दु:ख नसावे असे ज्यांना वाटते, ते मराठे. महाराष्ट्रातील मुसलमान ते जर महाराष्ट्रात गुण्यागोविंद्याने राहतील तर तेही मराठेच. या व्यापक अर्थाने शिवाजी महाराज मराठा शब्द समजत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात,  रमारात मुसलमानही होते. अफजुलखानाला भेटायला जाताना जे आठ वीर शिवरायांबरोबर होते त्यात एक मुसलमानही होता; आणि अफजुलखानाबरोबर त्याच्या  रक्षणार्थ हिंदू होते.

शिवराय केवळ मुसलमानांच्या विरूद्ध नव्हते. ते अन्यायाविरूद्ध होते. जनतेचा संसार धुळीस मिळवणा-यांविरूद्ध होते. छत्रपतींनी अफजुलखान सफा केले तसे चंद्ररावही सफा केले. ते जनतेचे कैवारी होते. पातशाहीच्या पाशातून, सरदार-जहागीरदार यांच्या पाशातून मुक्त करायला हा महापुरूष आला होता.

बहुजन समाजातील नेते
ज्याप्रमाणे आजचे पुंजीपती, आजचे संस्थानिक, जहागीरदार, जमीनदार हे सरकारकडे वळतात, त्याचप्रमाणे शिवरायांच्या वेळेचेही गोष्ट. पेन्शनरांची मुले, सरकारजमा लोकांची तेजस्वी मुले ज्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या लढ्यात येत, तसेच त्या वेळेसही झाले. बाप विजापूरकरांचा अंमलदार, तर मुलगा शिवरायांच्या सैन्यात, असे प्रकार होते. शिवरायांना ते ९६ कुळांतील बडे लोक, ते अहंकारी क्षत्रिय मिळाले नाहीत. कोण मिळाले? शिवछत्रपतींचे सेनापती कोण? जनतेतीलच नेते. नरवीर तानाजी, येसाजी, बाजी पासलकर, नेताजी हे बहुजन समाजात जन्मलेले. सूर्यवंश, चंद्रवंश अशा आख्यायिका सांगणारे ते नव्हते. शिवाजी महाराजांनी जनतेत क्रांती केली. शिवाजी महाराजांना ही क्रांती करणे का शक्य झाले? आजूबाजूला किती पातशाह्या. वरती प्रचंड मोगल साम्राज्य. खाली विजापूरचे राज्य. पूर्वेकडे गोवळकोंड्याचे राज्य. पश्चिमेकडे शिद्दी. चारी बाजूंस मातब्बर शत्रू असता, या पुरूषाने क्रांती कशी केली? मुख्य बळ कोणते?

जनता जनार्दनाची विराट शक्ती पाठीशी
जनता म्हणजे जनार्दन. हा जनार्दन छत्रपतींनी आपल्याकडे वळविला. या दरिद्री नारायणाची उपासना त्यांनी मांडली. ज्याला क्रांती करायची असेल, दुष्टांची सत्ता नष्ट करायची असेल त्याने जनतेचे प्रश्न हाती घेतले पाहिजेत. शिवाजी महाराजांसमोर ही दरिद्री जनता होती. “प्रजेच्या गवताच्या काडीसही कोणी स्पर्श करू नये; पोटच्या पोरांप्रमाणे जनतेने वाढविलेली झाडे, त्यांना शिवू नये.” असे हुकूम शिवरायांनी दिले. नाही तर जनतेने आंब्याची झाडे लावावी, गढीवाल्यांनी आंबे न्यावे. हे प्रकार बंद करण्यासाठी शिवराय उभे राहिले. म्हणून सारी जनता त्यांच्याभोवती उभी राहिली. हा अवतारी पुरूष असे जनता मानू लागली. ‘अवतार’ या शब्दाचा अर्थच मुळी असा की, जो अहंकाराने उंच पदी न बसता खाली जनतेत येतो; तिच्या सुखदु:खाशी एकरूप होतो. ते शिवराय जनतेच्या सुखदु:खाशी एकरूप झाले होते. म्हणून जनता जनार्दनाची विराट शक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहिली.