गोड निबंध - २ 48
असे म्हणून त्यानें हॅनकडे तीक्ष्ण दृष्टीनें पाहिलें. सर्व शेतक-यांकडे, मजुरांकडे पाहिलें. त्यांनी त्यांच्या डोळ्यास डोळा भिडविला. ते दिपले नाहींत. इतक्यांत कोप-यांतून कोणी म्हटलें, ' आमचें गमवावयास आमच्या जवळ आहे काय? आमच्याजवळ फक्त कर्जे आहेत, तीं कोणी लुटून नेईल तर आम्ही कर्जमुक्त होऊं. जमिनदारानें कोप-याकडें पाहिलें. परन्तु त्याला कोण बोललें तें कळलें नाहीं. परन्तु निर्भयमूर्ति हॅन समोर होता. त्यानें जमिनदाराच्या मुलाकडे पाहिलें व सांगितलें. ज्या वाघानें अनेकांचे रक्त चाखलें तोहि शेवटी मरेल.''
जमिनदाराच्या मुलाचे हात पिस्तुलाकडे गेले. परन्तु तो पुन्हां थांबला. एक आणा काढून त्यानें तेथें फेकला. चहा न पितां तो रागानें थरथरत निघून गेला.
त्या दिवशीं रात्रीं हॅनला त्याच्या झोपडींत जमीनदाराच्या शिपायांनी पकडलें. हॅन्ने धडपड केली. परन्तु त्यांनी त्याला ओढीत नेलें. त्या किल्ल्यांत, त्या गढींत त्याला नेण्यांत आले. तेथून तो पुन्हा जिवंत बाहेर आला नाहीं. जमिनदाराच्या घरांत जाऊन अदृश्य होणारा हा त्या गांवांतील सातवा किसान होता.
या गोष्टीला ३ दिवस झाले. चौथ्या दिवशी रात्रीं दुस-या एका दूरच्या खेडयांतील जमीनदार त्या गांवी पळून आले. लाल दरोडेखोर आले, पळा, पळा असें ते सांगू लागले. जमिनदार व त्याची मुलेंबाळें या आलेल्या लोकांबरोबर पळून जाऊं लागली. सरकारी पलटणी कापल्या गेल्या. दोन जमिनदार व एक सावकार गोळी घालून ठार मारले गेलें. अशा बातम्या होत्या. ' ती लाल सेना मरणास भीत नाहीं. ते भयंकर लोक आहेत. ' पळून आलेले जमीनदार सांगत होते.
जमिनदारांचा तांडा निघाला. गुलामांच्या पाठीवर मोलवान् मालाच्या पेटया दिल्या गेल्या. शिपाई त्यांना हाकलूं लागले. जमीनदारानें पोबारा केला आणि ती विजयी लाल सेना आली. टेंकडीवर बिगुलें वाजलीं. गांवांतील स्त्रीपुरुष सामोरे गेले. लाल सेनेनें किल्ला ताब्यांत घेतला. हॅनला शोधू लागले. परन्तु हॅन्च्या शरीरांतील मांसाचा कोथळा तेथें पडला होता. हॅन्चे डोळे फोडले होते, कान तोडले होते; जीभ कापली होती. तेथें बांबूचें तरवारीच्या धारेसारखें केलेलें फटके मारणारें आसूड पडलें होतें. त्याच्याबरचें रक्त वाळून तें काळें पडलें होतें. हुतात्म्याचें तें छिन्नभिन्न शरीर बाहेर नेण्यांत आलें. प्रचंड सभा भरली. लालबावटयांत त्या शूराचा तो देह गुंडाळून ठेवण्यांत आला. त्याचा सत्कार करण्यांत आला. त्या गांवाचें नांव हॅन ठेवण्यांत आलें.
किसान कामगार अशीं बलिदानें लाखोंनी जेथें देतात, तेथें आज उद्यां त्यांचे राज्य स्थापलें जाईल. हिंदुस्थानांतील किसान कामगारांनी धडा घ्यावा. आपसांतील भांडणें मिटवून किसान तेवढा एक, कामगार तेवढा एक, अशी घोषणा करावी. बावळटपणा सोडून द्यावा. खेडयांतील स्वार्थी पक्षोपपक्ष नाहींसे करावे. खेडयातून किसानांची सत्ता स्थापन करावी. त्यांच्या निश्चयाला कोण मारील श्रमतो त्याचा हक्क, त्याचा पहिला हक्क, असा कायदा निर्माण झालाच पाहिजे. ज्यांच्या घामांतून धनधान्य निर्माण होतें, त्याला आधीं हक्क, त्याला पोटभर खायला, अंगभर ल्यायला, असे कायदे झालेच पाहिजेत. असें होईल तेव्हांच खरा धर्म येईल. तोंवर सारा अधर्म राहील.
--वर्ष २, अंक १९.