नामदार गोखले-चरित्र 124
अशा लोकांबरोबर त्यांच्या तोलाचा असा कारस्थानी नाना फडणीसच लागतो. आणि टिळकच या गुणांत अग्रेसर होते. गोपाळराव साम्राज्यातील मुत्सद्दी झाले तरी त्यांची प्रतिभा येथे स्वतंत्रपणे चमकू शकली नाही. कारण ते केवळ मिळते घ्यावयाचे; येवडे तरी द्या असे म्हणावयाचे. तेव्हा जरी या सरळपणाची जरुरी योग्य त्या प्रमाणात असली तरी तो राजकारणात अनेकदा दुर्गुणच ठरतो. गोखल्यांच्या बाबतीत तसेच झाले. गोखल्यांचे अंतकरण मृदू असे. घरात कोणी आजारी वगैरे पडले तर त्यांचा जीव खालीवर व्हावयाचा. त्यांच्या अंत:करणाला दुस-याने केलेली टीका फार झोंबे. 'Forgive I must but forget I cannot.' असे ते म्हणत. आपलेच दात आणि आपलेच ओठ तेव्हा रागावून काय करावयाचे? परंतु व्रण बुजत नसत. समाजाच्या रमणगाड्यात व राजकारणाच्या रंगणात रात्रंदिवस असणा-या माणसानेच या बाबती कठोर असले पाहिजे. टिळक जात्याच कठोर. त्यांस टीकेचे काही भय नसे. दुसरा आपल्यावर कितीही प्रखर टीका करो, तेही उलट टीका करून त्यास सळो की पळो करीत. त्यांच्या मनावर या टीकेचा टोचणारा परिणाम होत नसे. त्यामुळ क्षमा करणे, विसरण हे प्रश्नच त्यांच्यापुढे नसे. 'तो अजून मी केलेली टीका विसरला नाही?' असे टिळक मोठ्या आश्चर्याने म्हणावयाचे. ते याबाबतीत इतरांस आपणासारखे समजत. निदान कार्यकर्ते लोक तरी असेच पाहिजे, असे त्यांस वाटे. परंतु गोखले मऊ मनाचे, हळूवार हृदयाचे होते. त्यांचं अंत:करण फार कोमल होते; त्यांस घाव सहन होत नसे. यामुळे पुष्कळदा ते खचत. या गोष्टीने त्यांच्या मनावर फार परिणाम होऊन शरीरासही हा परिणाम जाणवला असला पाहिजे आणि त्यांचा मृत्यू दहापाच वर्षे अलीकडे ओढवला असेल. महाजनी लिहितात, 'गोखल्यांचे हृदय अत्यंत कोमल होते याचा प्रत्यय मला नेहमी येई. एका इंग्रजी तत्त्ववेत्त्याच्या म्हणण्याप्रमाणे जेथे संवेदना तीव्र तेथे या दु:खमय संसारात असुख जास्तच वाटयास यावयाचे.' गोखल्यांच्या हळुवार मनामुळे कोणत्याही प्रकारची कठोरता त्यांस सहन होत नसे. अर्थात मनात दु:ख होऊन त्यांस खिन्नता येई. परंतु ते ती दाबवण्याचा प्रयत्न करीत आणि यामुळे त्यांच्या मनावर व शरीरावर ताण बसे. याबाबतीत आगरकर, मेथा हे कठोर होते. ते डगमगत नसत. ठोशास ठोसा ते लगावीत. खिन्न होऊन जात नसत. कौटुंबिक बाबतीत हाच मनाचा कोमलपणा त्यांच्यात होता. महाजनी लिहितात, 'मनाचा मऊपणा आगारकरात क्वचित प्रसंगीच- आप्तसुहृदांच्या सहवासात मात्र अगोचर होत असे. ज्याने जनतेच्या वेड्या समजुतीवर कोरडे ओढण्याचे व्रत पत्करिले त्यास लोकांच्या पोटात शिरून सहृदयतेने काटा थोडाच काढता येणार? परंतु गोखल्यांची गोष्ट निराळी होती. डेक्कन सोसायटीस मिळताना बावाचे मन कसे दुखवू असे त्यांस झाले.' वाच्छा म्हणतात की, 'इंग्लंडमध्ये आम्ही दोघे एकत्र बसून पुष्कळ घरगुती गोष्टी बोलत असू. मधूनमधून आमच्या डोळ्यांत अश्रूबिंदूही चमकत.' या गोष्टीवरून गोपाळरावांचे मन दिसून येईल. तेही होताहोईतो दुस-याचे मन दुखवीत नसत. 'Treat others as you want to be treated by them,’ हे त्यांस पक्के माहीत होते. या त्यांच्या मनाच्या कोवळिकेचा पुढे फार उत्कर्ष झाला. पशुपक्ष्यांसही होत असलेली यातना त्यांस पाहावत नसे. एकदा गाडीचे चाक लागून एक कुत्रा दुखावला तर ताबडतोब आपला शिपाई पाठवून त्या कुत्र्यास त्यांनी दवाखान्यात पाठविले. अशी त्यांच्यात दया होती. त्यांचा पोषाख मोठा ठाकाठिकीचा असे. १८९७ आणि १९०५ च्या वेळेस इंग्लंडात ते पुष्कळदा तांबडे पागोटे घालीत. परंतु १९१३-१४ च्या सुमारास ते इंग्लंडमध्ये बहुतेक युरोपियनांप्रमाणेच वागत. सरोजिनीबाईंस याचे आश्चर्य वाटले. ते मोठे मिळूनमिसळून वागणारे होते. इंग्लंडमध्ये कधी गाण्यास, कधी नाटकास ते आपल्या मित्रांबरोबर जात. त्याप्रमाणेच निरनिराळे खेळ खेळण्याचाही त्यांस नाद असे. प्रत्येक बाबतीत आपण कुशल असावे असे त्यांस लहानपणापासून वाटे.