Get it on Google Play
Download on the App Store

देशबंधू दास 7

चौफेर निराशा

बडे बडे वकील त्यांच्याकडे तुच्छ दृष्टीने पाहत. त्यांना फारसे काम मिळेना. ते कलकत्ता सोडून इतर जिल्ह्यांच्या ठिकाणीही थोडे फार काम मिळाले तर जात. जे काही थोडे फार काम मिळे, त्यात ते संपूर्णपणे लक्ष घालीत. परंतु एकंदरीत यावेळेस चोहोंबाजूस अंधार होता. श्रीमंतीत वाढलेली आई. ती आता घरचे सारे काम करी. चित्तरंजनांजवळ कधी कधी ट्रॅमच्या तिकिटासही पैसे नसत. ते पायी कोर्टात जात. या अशा निराशेत त्यांच्या हृदयातील परमेश्वर काही दिवस दूर झाला. हृदयात खूप खळबळ होती. अपार भावना उसळत होत्या. त्यांना कोठे प्रकट करणार?

काव्यनिर्मिती


या भावना काव्यात प्रकट होऊ लागल्या आणि त्यांच्या भावगीतांचा पहिला संग्रह प्रसिध्द झाला. त्याचे नाव 'मालंच.' या पुष्पहारात सुंदर भावनोत्कट गीते आहेत. ईश्वरावरची श्रध्दा व अश्रध्दा दोहोंचे दर्शन यात आहे.

'ते पाहा सुंदर स्वप्न. तो पाहा प्रभू. तो हळूहळू येत आहे. तालबध्द पावले टाकीत, फुले फुलवित येत आहे. आनंद फेकीत येत आहे. स्मितांची वृष्टी करीत येत आहे. पृथ्वीवरचे सौंदर्य त्याचेच. या वसंत ॠतूंतील सौंदर्य त्याचेच.'

असे चित्तरंजन सृष्टीतील सौंदर्य पाहून म्हणतात. सर्वत्र प्रभूची मूर्ती, त्याचे सौंदर्य पाहतात. परंतु हा भाव टिकत नाही. ते मग म्हणतात, 'देव, देव; कोठे आहे देश? त्याला सत्य समजून मी पूजा केली. परंतु कोठे आहे तो? ईश्वर, ईश्वर म्हणून मी हाका मारल्या. परंतु देवाच्या नावाने हाका मारून रडणे वेडेपणा आहे. हा ईश्वर सर्वत्र वणवा पेटवून राहिला आहे. आमची सर्व सुखशांती मातीत मिळवीत आहे. आमच्या निराधारतेचे दुःख पदोपदी वाढवीत आहे.'

दुसर्‍या  एका गीतात म्हणतात, 'अरे धर्ममार्तंडा, तू मात्र उच्च व बाकीचे तुच्छ का रे?' कुठल्या शून्यातून हा तुझा देव तू निर्माण केलास? कशाला ही त्याची गाणी तू गात आहेस, कशाला ही आरती? तुझे भाऊ तिकंडे दुःखाने रडत आहेत. तेथे तू का नाही जात? एक देवता निर्मून आकाशाकडे तोंड करून पूजा करीत बसला आहेस? त्या देवळातच तुझे जीवनपुष्प फुकट जाईल, सुकून जाईल.'
या मालंचात अशी सुंदर गीते आहेत. यथे देव नसला तरी मानवाविषयीची अपार सहानुभूती आहे. पतितांबद्दल प्रेम आहे. दुःखितांविषयी करुणा आहे. दुसर्‍या चे दुःख दूर करण्यासाठी ते स्वतःचे दुःख विसरू पाहतात.

ते एका गीतात म्हणतात, 'दुसर्‍यांच्या दुःखाची आग तू विझविली पाहिजेस. तू स्वतःचे दुःख विसर. त्यावर हास्याचा, आनंदाचा पडदा घाल; तू स्वतःच्या वासना नष्ट करून स्वतःचे जीवन - सर्वस्व दुसर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी देऊन टाक. या जगात जन्मून आपल्या डोळयांतील प्रेमळ किरणांनी एखाद्याच्याही जीवनाची कळी जर तुला फुलविता आली नाही; एखाद्याचीही वेदना जर तुला शांत करता आली नाही, तर तुझ्या जीवनाचा काय उपयोग? जे जीवन केवळ स्वतःसाठी असते, ते व्यर्थ असते; जे जीवन विश्वासाठी असते ते कृतार्थ होते.'

या कवितेत देशबंधूंचे सारे तत्त्वज्ञान आहे. त्यांनी जगालाच सारे दिले. स्वतःला पुढे शून्य केले.

देशबंधू दास

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
देशबंधू दास 1 देशबंधू दास 2 देशबंधू दास 3 देशबंधू दास 4 देशबंधू दास 5 देशबंधू दास 6 देशबंधू दास 7 देशबंधू दास 8 देशबंधू दास 9 देशबंधू दास 10 देशबंधू दास 11 देशबंधू दास 12 देशबंधू दास 13 देशबंधू दास 14 देशबंधू दास 15 देशबंधू दास 16 देशबंधू दास 17 देशबंधू दास 18 देशबंधू दास 19 देशबंधू दास 20 देशबंधू दास 21 देशबंधू दास 22 देशबंधू दास 23 देशबंधू दास 24 देशबंधू दास 25 देशबंधू दास 26 देशबंधू दास 27 देशबंधू दास 28 देशबंधू दास 29 देशबंधू दास 30 देशबंधू दास 31 देशबंधू दास 32 देशबंधू दास 33 देशबंधू दास 34 देशबंधू दास 35 देशबंधू दास 36 देशबंधू दास 37 देशबंधू दास 38 देशबंधू दास 39 देशबंधू दास 40 देशबंधू दास 41