भाषाविषयक कामगिरी 2
नाम सर्वनामांच्या विभक्ति साधनिकेंत विकल्पानें सांपडणा-या रुपांचा ऐतिहासिक अर्थ काय असावा हें पाश्चात्यांसही गूढ होतें. पाश्चात्यांस शब्दांच्या मूळ रुपाशी जातां आलें नाही. अहम्, त्वम्, इत्यादि सर्वनामें भाषेची आद्य प्रतीकें असावीत असा तर्क मोक्षमुलरनें केला, पण त्यांची उपपत्ति व पूर्व स्वरूपें त्यांस देतां आली नाहीत.' राजवाडे यांनी संस्कृत भाषेचा उलगडा या निबंधांत या सर्व गोष्टीचा विचार केला आहे. संस्कृत भाषेचा उलगडा हा निबंध खरें पाहिलें तर फारच गहन आहे.राजवाडे भाषेसंबंधी हे सिध्दांत मनांत रचित होते. त्याच सुमारास दामले यांचे मराठी भाषेचे शास्त्रीय व्याकरण हा बडा ९०० पानांचा ग्रंथ बाहेर पडला. त्या ग्रंथांचे परीक्षण म्हणून राजवाडयांनी हे आपले भाषेसंबंधीचे कांही सिध्दांत प्रसिध्द केले. त्यांचें परीक्षण करून त्यांची शहानिशा करणें हें हे काम महाराष्ट्रांत चिंतामणराव वैद्याशिवाय कोणासही झालें नाही.
जुनी ज्ञानेश्वरीची प्रत सांपडल्यानंतर राजवाडे यांस अभूतपूर्व आनंद झाला. या ज्ञानेश्वरीस १०० पानांची त्यांनी प्रस्तावना जोडली आहे. पुढें ज्ञानेश्वरीचें व्याकरण हा महत्वाचा ग्रंथ त्यांनी केला. मराठीतील पहिलें ऐतिहासिक असें व्याकरण हेंच होय. ज्ञानेश्वरीच्या व्याकरणानें विद्वानांत फार खळबळ उडाली. लोकमान्यांनी केसरीत अग्रलेख लिहून व वैद्यांची परीक्षणात्मक लेखमाला प्रसिध्द करून या ग्रंथाचा गौरव केला. चिंतामणराव वैद्य यांनी या ग्रंथांचे नीट परीक्षण केलें. पाणिनि, पतंजलि, भर्तृहरी, वामन यांची परंपरा राजवाडे यांनी बुडूं दिली नाही. ग्रंथ शुध्द व शास्त्रीय स्वरूपाचा आहे. ज्ञानेश्वरीचें व्याकरण रचल्यानंतर ते दुस-या महत्वाच्या कामास लागले. तें म्हणजे मराठी भाषेचा धातुपाठ हें होय. जवळजवळ ३० हजार धातु त्यांनी गोळा केले व त्यांची प्रक्रिया, व्युत्पत्ति वगैरे उलगडण्याचा त्यांनी जंगी खटाटोप केला. या धातुकोशाची हजार पानें होऊन त्यास ५०० पानांची भलीमोठी विद्वत्ताप्रचुर प्रस्तावना पण जोडण्यांत येणार होती. या धातूंचा पहिला कच्चा खर्डा १९२० मध्येंच त्यांनी तयार केला होता व सारखी उत्तरोत्तर त्यांत भर पडत होती व सुधारणा करणें चालू होतें. परंतु आतां या सर्व गोष्टी तशाच राहिल्या. त्यांच्या हातून हे काम झालें असतें तर मराठीस केवढा अपूर्व लाभ झाला असता ! इतर सर्व भाषांकडे या एकाच अभिनव गोष्टीनें, तुच्छतेनें पाहण्यास मराठीस सामर्थ्य आलें असतें-परंतु दैवदुर्विलास महाराष्ट्राचा. दुसरें काय ?
भाषेचा व भाषेंतील शब्दांचा अभ्यास त्यांस फार आवडे. अलीकडे ५। १० वर्षे कागदी साधनांचा त्यांनी नाद सोडून दिला होता व नैसक्तिक साधनांचाच, या भाषाविषयक साधनसामुग्रीचाच इतिहासाच्या कामी ते उपयोग करुन घेऊं लागले होते. वेदपूर्व कालापासून तों तहत सद्य:कालापर्यंतची सर्व संस्कृत प्राकृत भाषांची स्वरूपें ते पहात चालले व शब्दांची कुळकथा, इतिहास ते जमवीत चालले. प्राचीन शब्द साधनांची फोड करून त्यांतील अनेक सुप्त ज्ञान संग्रह ते बाहेर काढीत होते. शेंकडो हजारों शब्दांच्या व्युत्पत्तया ते बसवीत चालले व हें शब्दांतील इतिहास बाहेर काढण्याचें काम त्यांस मनापासून आवडूं लागलें. या कामांत त्यांस जुन्या ज्ञानेश्वरीचें फार महत्व वाटे. ज्ञानेश्वरीत अनेक रुपें-शब्दांची परंपरा कशी आलेली आहेत, क्रियापदांची संपत्ति व शब्दसंपत्ति ज्ञानेश्वरीत कशी विपुल आहे हें दाखविण्यास त्यांना आवेश चढे. सांगू लागले म्हणजे भराभरा ज्ञानेश्वरीतील ओव्या व शब्द त्यांच्या जिव्हाग्री नाचूं लागत. व्युत्पत्तिशास्त्र त्यांचा हातचा मळ होऊन बसलें. हजारों हजार शब्दांच्या व्युत्पत्त्या त्यांनी निरनिराळया भा. इ. सं. मंडळाच्या इतिवृत्तांतून व अन्यत्र प्रसिध्द केल्या आहेत. हें सर्व एकत्र छापणें अगत्याचें आहे. मग त्या सर्व व्युत्पत्यांचा परामर्ष घेणारा कोणी प्रतिमल्ल निर्माण कधी होईल तो होवो.