मृत्यूवर विजय 3
‘आणखी पुढे’ हाच त्याचा मंत्र. पायाखालच्या तलवारी वर हवेतच आहेत, असे त्याला भासते व त्यांच्यावरून तो नाचत जातो. पायाखालचे निखारे गुलाबच आहेत असे समजून पुढे जातो. तो आजूबाजूचे सारे विसरतो. तो देहातीत होतो, जीवन्मुक्त होतो.
श्रीरामकृष्णांबद्दल विवेकानंद म्हणत, “त्यांना दुबळेपणा माहीत नव्हता. परंतु रामकृष्ण म्हणून कोणी व्यक्ती आहे हेही ते विसरूनच गेले होते.” मातृपूजा करणाराला हे असले अलोट धैर्य, हा अतुल व अदम्य उत्साह प्राप्त होत असतो. ज्याने अनंतात बुडी मारली, त्याला कोणाचे भय ? त्याला जगात सारेच सज्जन व सारेच सोयरे. त्याला जगात सारेच मंगल व सारेच गोड.
“मधुनक्तमुतोषसि। मधुमत्पार्थिव रज:-” सारे त्याला गोडच गोड.
उषा मला गोड, निशाही गोड.
अंधार त्याला जितका प्रिय, तितकाच प्रकाशही प्रिय. आकाशातील तारे त्याला जितके सुंदर, तितकीच पृथ्वीवरील धूळही त्याला सुंदर ! अशाला कशाची भीती ? त्या मृत्यूलाही तो मारून जातो. तो मृत्यूचा घोट करतो व त्याला आपल्या पोटात ठेवून देतो.
यस्यच्छाया अमृतं यस्य मृत्यु: ।
अशी त्याची स्थिती होते. जीवन व मरण दोघांनी व्यापून तो उरतो. त्याला सुख व दु:ख विभिन्न दिसतच नाहीत. मायेचा पडदा टरकावून तो फेकून देतो व त्या पडद्यापलीकडील अनंताचे, सच्चिदानंदाच्या मूर्तीचे दर्शन घेतो. तो कवी जार्ज इलियट म्हणतो,
“संत हे मग जगासाठी जळतात व प्रकाश देतात.” दुसर्यांच्या विकासासाठी स्वत: जळत राहण्यातच सूर्याप्रमाणे त्यांना धन्यता वाटते. पदार्थ जळणे व पेटणे म्हणजेच त्याचे जीवन. विलासात त्यांचा जीवन गुदमरतो; कष्टांच्या आगडोंबातच त्यांना शांत व शीतळ लाभते. तेथेच त्यांना मोकळेपणाने श्वासोच्छ्वास करता येतो.
संतो तपसा भूमिं धारयन्ति ।
आपल्या तपाने व जळण्याने ते पथ्वीचे धारण करितात. हे शब्द खरे आहेत. कारण खरी शक्ती अशीच असत. त्या विश्वमातेचे पुत्र असेच असतात व असावयाचे.