पत्री 113
दिव्य मी स्वर्ग निर्मीन
ध्येय देईन
दिव्य मी स्वर्ग निर्मीन
सचिंत सगळे दिसती लोक
जिकडे तिकडे भरला शोक
करुन तयांवर अमृतसेक
तया उठवीन।। दिव्य....।।
मेल्यापरि हे दिसती बंधू
उरला न दिसे जीवनबिंदु
निर्मुन मी संजीवनसिंधु
तया जिववीन।। दिव्य....।।
गुलामवृत्ती जिकडे तिकडे
दुबळी वृत्ती जिकडे तिकडे
चैतन्याचे भरभरुन घडे
तया पाजीन।। दिव्य....।।
स्वातंत्र्याची लाविन ज्योत
स्फूर्तीचा मी निर्मिन स्त्रोत
तेजाचा मी सोडिन झोत
दैन्य दवडीन।। दिव्य....।।
भेदभाव मी जाळिन सारे
ऐक्याचे मी सोडिन वारे
दिव्यबळाच्या जयजयकारे
राष्ट्र उठवीन।। दिव्य....।।
करिन त्यागा ते उद्युक्त
निर्भयतेचे शिकविन मंत्र
नि:शस्त्राचे देइन शस्त्र
पंथ दावीन।। दिव्य....।।
आळस दवडून सेवा देइन
विलास दवडून विकास देइन
खेदा दवडून बोध देइन
भाग्य देईन।। दिव्य....।।
कळकळ शिकविन तळमळ शिकविन
सदगुण संघटना मी वितरिन
सत्याचा सत्त्वाचा शोभन
ध्वज उभवीन।। दिव्य....।।
रुढी जाळुन विचार देइन
हृदयमतीला निर्मळ करिन
श्रद्धा सद्धर्माला देइन
मोक्ष देईन।। दिव्य....।।
मंगल उज्वल ते देइन
पावन निर्मळ ते देइन
सुंदर सत्य शिवा देइन
देव देईन।। दिव्य....।।
-धुळे तुरुंग, मे १९३२
देशासाठी मरु!
देश आमुचा वैभवशाली वाली सकलहि जगताचा
तद्ध्यानामधि रंगुन जाऊ गाऊ त्याला निज वाचा
पराक्रमाने निजमातेला मिरवू सा-या जगतात
कीर्तिध्वज विश्वात उभारु निजतेजाने दुर्दांत
वीरापरि तरि उठा झणी
दिगंत जिंकू चला क्षणी
निजमातेला स्मरुनि मनी
मुकुंदपादांबुज वंदुनिया प्राणांवर हाणू लाथ
कोण करी जगी विरोध आता करु सर्वांचा नि:पात।।
धन्य मावळे पावन झाले देशासाठी निज-मरणे
जगणे भूषण आम्हां कायसे भीति कशाला मनि धरणे
दों दिवसांची तनु तर साची वाचवुनी तरि काय मिळे
देशासाठी उदार होऊ मृत्यु कुणाला जगी टळे
हसू यमाचा फास जरी
हसू जगाचा जाच जरी
हसू सदोदित निजांतरी
धैर्य हासत तेजे तळपत निजमातेचा सन्महिमा
त्रिभुवनि अवघ्या पसरु दावू मातेचा वैभवगरिमा।।
-अमळनेर, १९२७