पंढरपूर 11
“गरिबांचे कोर्टात काही टिकत नाही. तो पैसेवाला. तो सहीसलामत सुटेल. मीच वाईट चालीची ठरायची. भाऊ म्हणाले, “नको बभ्रा.” भाऊही पैशाने शांत झाले होते. मालकाने त्यांना गप्प बसवले होते. माझ्यासाठी सारी व्यवस्था झाली. गुपचूप येथे पाठविण्यात आले. उद्या मी जाईन.”
अनेक स्त्रियांचे अनेक अनुभव, निरनिराळया जातींच्या स्त्रिया. परंतु ज्यांच्यात पुनर्विवाह तितका रूढ नाही अशाच जातींतील स्त्रिया तेथे अधिक होत्या. ब्राम्हण होत्या. मारवाडीही होत्या. सर्वांची एकच कथा. एकच अनुभव. “तुझी बाई काय हकीगत?” असे सरलेला त्या विचारीत. तो प्रश्न ऐकून सरला उठून जाई. तिला खूप दु:ख होई.
एके दिवशी पहाटे सरला प्रसूत झाली. उदयच्या बाळाचा उदय झाला. सारे नीट झाले.खाटेवर सरला होती. जवळच पाळण्यात बाळ होते ती मध्येच उठे. त्याला पाजी. बाळ कसे आहे ते बघे. डोळे अजून नीट उघडत नव्हते. बाळाला सोडून जावे लागणार म्हणून तिला वाईट वाटत होते. ती रात्री जागत बसे. बाळाला मांडीवर घेऊन बसे. “बाळ, आईबाप असून तू त्यांना पारखा होणार? माझ्यासारखा तूही अभागी ! तुझी आई तुला सोडून जाणार. बाळ, आईला नावे नको ठेवूस, मी अगतिक आहे ! माझा उपाय नाही बाळ ! शक्य होताच तुला नेईन.” असे म्हणून ती त्याला हृदयाशी धरी.
बाळ रडू लागले, की ती त्याला हलवी. एके दिवशी ते लहान अर्भक ओक्साबोक्सी रडत होते. काही केल्या राहीना.
“उगी, उगी. नको रे रडू. तू का तुझ्या आईसाठी रडत आहेस? मी दोन दिशी जाणार म्हणून का रडत आहेस? आता कोठले आईचे दूध मिळणार म्हणून का रडत आहेस? तुला जगन्माता दूध पाजील. ती तुला हालवील. ती तुला खेळवील. रडू नको, उगी.”
काय करावे तिला समजेना. शेवटी तिलाही रडू आले. मांडीवर बाळ रडत होते, आणि तीही रडत होती. परंतु शेवटी ते मूल थकले, झोपले. तिने त्याच्याकडे पाहिले.
“झोप. आईच्या मांडीवर झोप. दोन दिवस ही मांडी आहे. मग नाही हो सोन्या ! मी गेल्यावर रडू नको. तुला मारतील, आदळतील, रागाने कुस्करतील. हट्ट नको करीत जाऊ. मिळेल दूध ते गुटगुट पीत जा. समजलास ना? मी तुला परत नेईन. खरेच नेईन. आईजवळ येशील हो परत.” असे ती म्हणत होती.
दहा दिवस झाले.
“तुम्हाला आता गेले पाहिजे.” व्यवस्थापक म्हणाले.
राहू दे ना आणखी थोडे दिवस.”
“तसा नियम नाही. संस्थेला परवडत नाही.”
“माझ्या हातातील बांगडया संस्थेला देणगी घ्या. माझी ही मोत्यांची कुडी घ्या. तुम्ही आश्रय दिलात, त्याची परतफेड यांनी होणार नाही. ते तुमचे उपकार फिटणार नाहीत, परंतु मला आणखी पंधरा दिवस राहू दे. बाळाचे डोळे नीट उघडू देत. आईला तो नीट पाहून ठेवील. घ्या ह्या बांगडया, ही कुडी. मी लिहून देते. आणि जाताना मला थोडे पैसे द्या. पंधरा-वीस रूपये द्या, नाही नका म्हणू.”