गीता हृदय 32
अध्याय ११ वा
दहावा अध्याय आपणांस सर्वत्र ईश्वर पहा असें सांगून राहिला आहे. परंतु अर्जुनानें प्रश्न विचारला “ देवा, सर्वत्र तूंच दिसलास तर तें रूप कसें रे दिसेल ? मला कल्पनाहि करतां येत नाही. हें सारें स्थिरचर व्यापून तूं भरून राहिला आहेस, असें तें विराटू दर्शन मला घडव. माझे मनोरथ पूर्ण कर.” आणि प्रभुनें तें विश्वरूपदर्शन दिलें आहे. तो विश्वंभर सर्वत्र भरून राहिलेला अर्जुनाला दिसला. तें अनंत तेजोमय असें रूप पाहून अर्जुन घाबरला. तो म्हणाला “आंवर आंवर, हें तुझें विश्वरूप आंवर. मला नाही हें पाहवत. माझे डोळे दिपतात. तुझे साजिरें गोजिरें रूपच मला पुरे.”
मनुष्याला आजुबाजुला असलेला दोन हातांचा परमेश्वर पटत नाही. परंतु अनंत हातांचा हा विराटू परमेश्वर तो पचत नाही. अर्जुन शहाणा होता. शेवटी दोन हातांचा परमेश्वर त्याला पटला. त्याच्या रतावर चार हातांचा श्रीकृष्ण होता. परंतु दोन हातांचाहि त्याला आवडता. मानव देहांत असणारा परमेश्वर आपणांस पुरेसा आहे. मानवाची सेवा करूं या. या मनुष्यरूपी नारायणाची उपासना करूं या. त्याला सुखी करूं या.
या अध्यांयात एकच सूर भरून राहिला आहे. भक्तांना अत्यंत आवडणारा असा हा अध्याय आहे. लोकमान्यांचे गीतारहस्य प्रसिद्ध झालें तेव्हा महर्षि अण्णासाहेब पटवर्धन म्हणाले “त्या अकराव्या अध्यायाविषयी बाळानें काय बरें लिहिलें आहे ? तेवढें वाचावेसें वाटतें.” असा हा अकरावा अध्याय जणुं स्तोत्ररूप आहे. अनंताचें ते भव्य स्तोत्र आहे. ज्ञानेश्वरीत फारच मधुर ओंव्या आहेत. अर्जुन म्हणतो “देवा, नमस्कार नमस्कार. मागें नमस्कार, पुढे नमस्कार.” पुन्हां पुन्हां जणुं नमो नमो म्हणत तो राहिला. जेथे पहावें तेथे प्रभुरूप. अर्जुन केवळ हात जोडून विनम्रभावानें उभा राहिला. अशा ह्या स्तोत्ररूप अध्यायाचें सार एकच आहे. आणि ते म्हणजे परमेश्वर सारें करूंन राहिला आहे. आपणांस कशाचाहि अहंकार नको. मीच जणुं सारें करणारा असा गर्व कोणीहि करूं नये. तें हास्यापद आहे. आपण विश्वशक्तीच्या हातातील बाहुली आहोंत. ती विश्वशक्ति आपणांस नाचवीत असते. मिल्टन या इंग्रज कवीने एके ठिकाणी म्हटलें आहे “मी आंधळा झालों म्हणून का देवाचे काम अडणार आहे? असा अहंकार मला नको. त्या परमेश्वराचें काम करायास हजारों तयार आहेत.” गोष्ट सत्य आहे. आपण केवल निमित्त आहोंत.
जगांतील परिस्थिति, जगांतील अनेक प्रवाह, अनेक शक्ती, विश्वांतील अनंत गती या आपणांस भ्रमवीत आहेत. आपल्या मनांत असतें तसें थोडेंच होतें ? जगांतील निरनिराळ्या इच्छांचे, प्रयत्नांचे, शक्तींचे परस्परांवर आघात प्रत्याघात होत कांहीतरी एक फलित निष्पन्न होत असतें. आपण आपल्यावरी धडपडत रहावें. परंतु मनांत कष्टी होऊं नये. कर्ता करविता शेवटी तो विश्वंभर आहे. त्याच्या विश्वात्मक गतींने व शक्तीनें जो काही आकार येईल तो खरा. त्याला जसें रूप पाहिजे असेल तसेंच शेवटी येईल.
आपण नम्रपणें निमित्तमात्र होऊन कर्तव्य करीत रहावें. प्रभुच्या हातांतील आपण साधने बनूं या. परंतु ईश्वराच्या हातांतील साधन होणें ही सोपी गोष्ट नाही. त्या परम थोर प्रभूनें आपणांस वापरावें यासाठी आपण आपलें जीवन निर्मळ करून ठेवूं या. आपलें जीवन सतेज करून ठेवूं या. जीवनाला नीट धार लावून ठेवूं या. एकाद्या मोठ्या माणसानें आपणाजवळ चाकू मागितला तर त्याला नीट धार आहे की नाही तें आपण पाहतों. बोथट चाकू मामलेदाराच्या हातांत द्यायला कारकुनास लाज वाटेल. कोणाचा तरी चांगला चाकू घेऊन तो नेऊन देईल. त्याप्रमाणें प्रभुनें जर आपलें जीवन मागितलें, तर तें निर्मळ व सतेज असेल तरच आपण त्याच्यासमोर तें नेऊं शकूं.