सोन्यामारुति 92
वसंता : तिकडे विव्हळणें ऐकूं येत आहे. दवाखाना म्हणजे रडारड.
वेदपुरुष : सार्या भरतखंडांतच राडारड आहे. रेडिओच्या गाण्यांतून ती किती बुडवूं म्हणालेत तरी ती रडारड गगनांत गेल्याशिवाय राहत नाहीं.
वसंता : हे का सारे डॉक्टर आहेत ? प्रत्येकजण त्या रोग्याची नाडी पहात आहे ; प्रत्येकजण त्याला जीभ दाखव सांगत आहे ; प्रत्येकजण त्याचे डोळे ताणीत आहे, छाती ठोकीत आहे, पोट चेपीत आहे, पाठीवर नीज, श्वास घे, श्वास सोड, पाय वर घे-प्रत्येकजण फार्स करीत आहे. हें काय आहे ?
वेदपुरुष : ही ज्ञानोपासना आहे! हे सारे उद्यांच्या भरतभूमीचे अश्रु पुसणारे भावी डॉक्टर! हे उद्यां कॉलरा डयूटीवर, मलेरिया डयूटीवर खेडयापाडयांत जातील व हजारों गरीब शेतकर्यांचा दुवा घेतील. भारतमातेचे हे सेवक तयार होत आहेत.
वसंता : हे अशा गरीब रोग्यांवरच हल्ले करीत असतील ?
वेदपुरुष : श्रीमंताची कोण एवढी काळजी घेणार ? येथें तरी गरिबाची काळजी घेणारे ईश्वराच्या कृपेनें पुष्कळ आहेत!
वसंता : बिचारा रोगी ही तालीम करूनच अर्धमेला होत असेल.
वेदपुरुष : त्या मुलांची चर्चा तर ऐक.
एक : बदलून दिलें पाहिजे औषध.
दुसरा : त्या इंजेक्शनचा प्रयोग करून पहावा.
तिसरा : आणि काहीं भलतेंच झालें तर ?
दुसरा : आपल्याला फाडायला मिळेल. कानाच्या सर्व शिरा नीट समजून घेऊं. याचे कान जरा लांब आहेत!
तिसरा : ते पहा डॉक्टर आले.
डॉक्टर : गुड मॉर्निंग! तपासलांत का याला ?
दुसरा : लघवी तपासायची राहिलीच.
डॉक्टर : कसें काय वाटतें रे ?
रोगी : आग होते अंगाची.