बुद्धचरित्र (भाग दुसरा) 35
[११]
देवदत्त
शाक्यांचे राज्य महाजनसत्ताक होतें. निरनिराळ्या गांवच्या महाजन लोकांना राजे असें म्हणत असत. अशा प्रकारचे सरासरी सातशें राजे शाक्यांच्या राज्यांत होते. ते आपसांमध्ये एक अध्यक्ष निवडीत असत, व त्याला महाराजा असें म्हणत. या महाराजाच्या हातीं अंतर्गत व्यवस्थेसंबंधानें काहीं अधिकार असत; परंतु परराष्ट्रांशी लढाई करणें किंवा तह करणें हें काम महाजनमंडळ बहुमताने करीत असे. शाक्यराजाच्या सभागृहाला `संथागार' असें म्हणत असत. याच धर्तीवर चाललेलीं आणखीहि कांही राज्यें बुद्धकाली मध्यदेशांत होती.
एका वेळीं शाक्यांचें अध्यक्षस्थान भद्दिय नांवाच्या तरुण शाक्याला मिळालें होतें. त्या वेळीं शाक्यराजांच्या कुळांतील बर्याच तरुणांनी बुद्धाच्या भिक्षुसंघांत प्रवेश केला; परंतु महानाम शाक्याच्या कुळांतील कोणीच भिक्षु झाला नव्हता. तेव्हां तो आपला धाकटा भाऊ अनुरुद्ध याला म्हणाला "सिद्धार्थानें बुद्ध होऊन सद्धर्माची पताका जिकडे तिकडे फडकाविली आहे, व त्यायोगें शाक्यकुलाची मोठीच कीर्ति झाली आहे. आजला इतर देशांतील थोर कुळांतील लोक भिक्षु होऊन शाक्यपुत्रीय श्रमण म्हणवून घेण्यांत धन्यता मानीत आहेत; पण आमच्याच शाक्यांपैकी कांही थोडी मंडळी तथागताच्या धर्माची उपेक्षा करीत आहे, हें आम्हांला उचित नाहीं. आतां आमच्या कुळांत आम्ही दोघेच कायते भिक्षु होण्याला योग्य आहों. जर प्रपंचाचा भार तूं आपल्या शिरावर घ्यावयाला तयार असशील, तर मी भिक्षु होऊन बौद्धधर्माचा प्रसार करीन. "
अनुरुद्धाला प्रपंचाच्या भानगडी काय होत्या, हें मुळींच माहीत नव्हतें. लहानपणींच वडील वारल्यामुळें आईनें त्याचे फार लाड केले, आणि त्याला व्यावहारिक शिक्षण जसें मिळावयाला पाहिजे होतें, तसे मिळालें नाहीं. त्यानें आपल्या वडील भावाला प्रपंचाच्या भानगडी काय आहेत, असा प्रश्न केल्यावर महानामानें त्याला सर्व सविस्तर माहिती सांगितली, व तो म्हणाला “शीत आणि उष्ण, ऊन आणि वारा यांची परवा न करितां गृहस्थानें आपल्या कामांत दक्ष असलें पाहिजे. जो गृहस्थ विषयसुखाच्या नादीं लागून आपल्या गृहकृत्याची उपेक्षा करील, त्यावर दारिद्र्यपंकांत लोळण्याची पाळी आल्यावांचून रहाणार नाहीं.”
अनुरुद्ध म्हणाला “माझ्यानें या भानगडी व्हावयाच्या नाहींत. लहानपणापासून मी कधींहि शेतांत गेलों नाहीं. तेव्हां शेत पेरतात कसें आणि तें कापतात कसें, हेदेखील मला माहीत नाही. घोड्यावर बसणें, शिकार खेळणें किंवा तिरंदाजी करणें ही कामें सोडून इतर कामांत मीं कधींहि मन घातले नाहीं, व यापुढें माझ्यानें घरगुती कामें होतील असें मला वाटत नाही. असलीं कामें करण्यापेक्षां भिक्षु होणेंच मला अधिक इष्ट वाटतें.”
अनुरुद्धाचा भिक्षु होण्याचा बेत- नव्हे निश्चय- ठरला. पण त्याला त्याच्या आईची परवानगी मिळेना. अनुरुद्धानें जेव्हा अतिशय हट्ट धरला. तेव्हां ती त्याला म्हणाली, “सध्यांचा आमचा महाराजा भद्दिय हा तुझा बालमित्र आहे. जर तो तुझ्याबरोबर भिक्षु होण्याला तयार असेल, तर मी तुला परवानगी देते.”
भद्दिय एवढा मोठा अधिकार सोडून भिक्षु होणार नाही अशी अनुरुद्धाच्या आईला खात्री वाटत होती. म्हणून तिनें आपल्या मुलाची समजूत घालण्यासाठीं ही युक्ति योजिली.
अनुरुद्ध भद्दियाजवळ जाऊन म्हणाला “मित्रा, बुद्धाच्या भिक्षुसंघांत प्रवेश करण्याची मला उत्कंठा लागली आहे. पण माझ्या आईची मला परवानगी मिळत नाहीं. तूं जर माझ्याबरोबर भिक्षु होशील, तरच माझी आई मला परवानगी द्यावयाला तयार आहे.”
भद्दिय म्हणाला “अनुरुद्धा! तूं आणखी सात वर्षे थांब. या अवधींत मला ज्या कांहीं आमच्या राज्यात सुधारणा करणें इष्ट वाटत आहे, त्या करून मी मोकळा होतो. मग आपण दोघेहि भिक्षु होऊं.”
परंतु अनुरुद्धाला सात दिवस देखील सात वर्षांसारखे वाटत होते, इतका तो भिक्षु होण्यासाठी उत्सुक झाला होता. त्याच्या अत्यंत आग्रहामुळें एका आठवड्याच्या आंत राज्यकारभार दुसर्यावर सोंपवून भिक्षु होण्याला भद्दिय कबूल झाला. एका आठवड्यानंतर राज्यकारभार आपल्या बंधूंवर सोंपवून तो कोणाला नकळत अनुरुद्धाबरोबर बुद्धाच्या भेटीला जाण्यास तयार झाला.
त्या वेळीं बुद्धगुरू अनुप्रिया नावाच्या मल्लाच्या गांवीं रहात होता. भद्दिय आपल्या सेनेसहवर्तमान उद्यानांत गेला असतां सेनेला तेथेंच ठेवून अनुरुद्धाबरोबर अनुप्रियेला जाण्याचा त्यानें बेत केला. आनंद, भृगु, किंबिल, देवदत्त आणि उपालि न्हावी, हे पाचजण भद्दियाबरोबर जावयाला तयार झाले. काही अंतरावर गेल्यावर त्या शाक्यकुमारांनी आपले अलंकार एका उत्तरीय वस्त्रांत बांधून उपालीच्या स्वाधीन केले आणि ते त्याला म्हणालें “उपालि, आतां यापुढें तूं आमच्याबरोबर येऊं नकोस. हे अलंकार विकून सुखानें आपली उपजीविका कर.”