तीन मुले 35
‘भरलेले पोट असले म्हणजे अशी बोलणी सुचतात. उपाशी पोटाला कोठल्या आशा? मंगा, विचार कर.’
‘बाबा, माझा विचार वज्रलेप आहे.’
‘तू का पित्याची इच्छा मोडणार?’
‘ही इच्छा मी मोडणार.’
‘पित्याचे घर सोडणार?’
‘ही इच्छा माझ्यावर लादली जाणार असेल तर हे घर मी सोडणार.’
‘कोठे राहशील?’
‘पृथ्वी मोठी आहे, कोठेही राहीन. आकाशाचे पांघरुण आहे. धरित्रीची मांडी आहे. प्यायला नद्यानाल्यांचे पाणी आहे. खायला झाडामाडांचा पाला आहे. मधुरी व मंगा एकच असली, म्हणजे मातीचे कण त्यांना माणिकमोती वाटतील. सारी सृष्टी त्यांना दिसेल, सारी दु:खे त्यांना गोड वाटतील.’
‘मंगा, माझा करारी स्वभाव तुम्हां सर्वांस माहीत आहे.’
‘आणि मीही तुमचाच मुलगा.’
‘तू घरातून निघून जा.’
‘जातो बाबा, आत्ता या क्षणीच जाऊ?’
‘जा, या क्षणीच जा.’
आणि खरेच मंग उठला. त्याची आई रडू लागली.
‘जाऊ दे काटर्याला. त्याचे तोंडही मी पाहणार नाही. जा. नीघ.’
मंगा घराच्या बाहेर पडला. बाहेर अंधार होता. परंतु मंगाच्या मनात मधुरीच्या प्रेमाचा दिवा झळकत होता. कोठे जाणार मंगा? त्याचे प्रेम नेईल तिकडे. जा, मंगा जा; प्रेमाशी लग्न लाव.’
मंगा पुन्हा घरी येईल असे बापाला वाटत होते. परंतु मंगा घरी आला नाही. बाप त्याला इकडे तिकडे पहात होता. परंतु त्याला तो दिसला नाही. तो व्यापारीही निराश होऊन गेला. काय ही वेडी पोरे, असे म्हणत तो गेला. घरी चालत आलेल्या संपत्तीला लाथाडणा-या मुलाची त्याला कीव वाटली. हळूहळू बापही मंगाला विसरला. आपला एक मुलगा जणू मेला असे समजून तो वागू लागला.