कला म्हणजे काय? 97
आजच्या काळात जी चांगली ख-या ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे असणारी कला आहे, ती कदाचित तिच्यातील अपूर्णतेमुळे लोकांना पटकन समजत नसेल, किंवा कदाचित लोकही तिच्याकडे लक्ष देत नसतील; परंतु ती कला अशी असली पाहिजे की, तिच्यातील भावनांचा अनुभव सर्वांच्या अंतरंगास येईल. ही कला विशिष्ट वर्गाची असता कामा नये; विशिष्ट राष्ट्राची असता कामा नये; विशिष्ट जनसमूहाची असता कामा नये; विशिष्ट धर्मपंथाची असता कामा नये. केवळ व्यापा-यांची, केवळ सरदारांची, केवळ भिक्षुकांची अशी ती असू नये. विशिष्ट वर्ग, विशिष्ट जाती, विशिष्ट धर्म, यांनाच फक्त भावना देणारी ती असता कामा नये. ज्या भावना सर्वांना समजतील अशाच भावना तिने दिल्या पाहिजेत. आजच्या आपल्या काळात अशा कलेलाच सत्कला हे नाव देणे योग्य होईल. इतर बाकीच्या सर्व कलेपासून हिला निवडून काढून उत्तेजन दिले पाहिजे.
आमची ख्रिस्तधर्मीय कला विशाल असली पाहिजे. 'हे विश्वचि माझे घर' असे तिचे ध्येय हवे. तिने सर्व मानवांना जोडले पहिजे. मनुष्याला दोन प्रकारच्या भावना एकत्र आणू शकतात. एक प्रकार म्हणजे आपण सारी ईश्वराची लेकरे आहोत व म्हणून भाऊभाऊ आहोत, या प्रकारच्या भावना; दुसरा प्रकार म्हणजे सामान्य जीवनांतील सरळ भावना-ज्या भावनांचा मनुष्यमात्रास अनुभव येतो-अशा गंमतीच्या, विनोदाच्या, करूणेच्या, उत्साहाच्या, आनंदाच्या, शांतीच्या, सुखदु:खाच्या, वात्सल्याच्या, भक्ताच्या, मैत्रीच्या या भावना. या दोन प्रकारच्या भावनांनी आपण एकत्र जोडले जातो. या दोन प्रकारच्या भावनाच आजच्या कलेला चांगला व योग्य असा विषय देऊ शकतील.
या दोन त-हेच्या भावना दिसावयास निरनिराळया दिसल्या, तरी त्यांचा परिणाम एकच आहे. ख्रिस्तीधर्माने जागृत होणा-या बंधुभाव, सत्यनिष्ठा, ईश्वरशरणागति, त्याग, प्रेम, आदर, पावित्र्य इत्यादी भावना व दुस-या अत्यंत साध्या भावना-उदाहरणार्थ एखादे गंमतीचे गाणे किंवा गंमतीची गोष्ट ऐकून जी भावना सर्वांच्या अनुभवास येते; किंवा एखाद्या हृदयस्पर्शी करूण गोष्टीने उत्पन्न होणारी भावना, किंवा एखाद्या भव्य वनांतील देखावा पाहून किंवा सुंदर इमारत पाहून उत्पन्न होणारी भावना; एखादी लहानशी बाहुली, एखादे घरगुती प्रसंगाचे चित्र वगैरेंनी उत्पन्न होणा-या भावना; या दोन्ही प्रकारच्या भावनांनी एकच परिणाम होतो व तो म्हणजे मनुष्यांचे परस्परांशी प्रेममय ऐक्य.
कधी कधी लोक एकत्र जरी रहात असले, तरी ते एकमेकांशी मिळून गेलेले असतातच असे नाही. ते परस्परांचे वैरी नसतात. तरीही ते एकमेकांबद्दल उदासीन, 'मला काय त्यांचे' ह्या वृत्तीचे, अलग असे राहणारे व वागणारे असतात. त्या सर्वांच्या भावना व वृत्ती एकच नसतात. परंतु त्या सर्वांना एकत्र करून कोणी गोष्ट सांगावी, एखादे नाटक दाखवावे, एखादे सुंदर हृद्य चित्र दाखवावे, सर्वांना एखादे लेणे नेऊन दाखवावे, किंवा सर्वांत जर कोणती उत्कृष्ट गोष्ट असेल, तर त्यांना संगीत ऐकवावे. ती धन्य गायनी कला ऐकवावी. एका क्षणांत ते सारे भिन्नभिन्न वृत्तीचे व स्वभावाचे लोक, जणू विद्युचमकीप्रमाणे एकत्र आणले जातात. सर्वांची एकतानता होते. एकाच भूमिकेवर, एकाच उंचीवर सारे उभे असतात. एकाच लाटेवर सारे नाचत असतात. एकदम परस्परऐक्य व प्रेम यांचा त्यांना अनुभव येतो. त्यांची पूर्वीची उदासीन व पृथक वृत्ती ते विसरून जातात. आपणांस जे वाटत आहे, तेच दुस-यांनाही वाटत आहे हे पाहून प्रत्येकाला कृतार्थता वाटते. आपण व हजर असलेले इतर सारे यांच्यातच हे हृदयैक्य स्थापिलेले नसते तर ते त्यांच्या पलीकडेही जाते. जे जे आज जिवंत आहेत तेही या भावनेशी एकरूप होतील. जे मागे तेही असेच या भावनेशी एकरूप झाले असतील व पुढे होणारही. हा धन्यतम अनुभव घेतील अशी भव्य कल्पना मनात येऊन आपले व्यक्तित्त्व भूत, वर्तमान व भविष्यकाळातील सर्व मानवांना भेटते. आपण या देहापुरतेच न राहता जणू विश्वाकार होतो. अशा प्रकारे कला आपणांस अमरत्वाचा अनुभव-दिव्य अनुभव देते. ती आपणांस सर्वांना भेटविते. असा हा थोर व अपूर्व परिणाम ईश्वरीप्रेम व बंधुप्रेम यांच्या भावना देणारी धर्ममय कलाच घडवून आणते असे नाही, तर जी कला अत्यंत साध्या, सरळ व सुंदर अशा रोजच्या संसारांतील सर्वांच्या परिचयाच्या, सर्वांना अनुभवता येतील अशा भावना देते, तीही कला असेच परमैक्य घडवून आणते.