राधाकाकी
साधारण 1983-84 चा काळ ! मी 6वी-7वीत असेन तेव्हा. आमचं गाव खेडचं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या. आम्ही मुलं-मुलं जमून वाड्यात खेळत बसलो होतो.दूपारचं रणरणतं ऊन असल्यामुळे बाहेर जायची सोयचं नव्हती. वाडा चौसापी असल्यामुळे माझे मीञ हमखास माझ्याकडे दुपारी खेळायला यायचे. आम्ही खेळत बसलो होतो, एवढ्यात एक किँकाळी ऐकू आली. काय झालं म्हणून सगळे धडपडून उठलो. घरात वामकुक्षी घेणारी मोठी माणसे, माझी ताई, आई, बाबा धावतच बाहेर आले आणि दरवाज्यातून बाहेर धावले,आम्हीही त्यांच्या पाठीमागे गेलो. शेजारच्या राधाकाकीच्या घरातून खूप धूर येत होता,जणू काही घरचं पेटलय असच वाटत होतं, आजुबाजुच्या लोकांनी काही क्षणात दरवाजा फोडला आणि धुराच्या, आगीच्या लोटाबरोबर बाहेर पडल्या त्या राधाकाकी. किँचाळत ओरडत त्या आंधळ्यासारख्या इकडे- तिकडे पळत होत्या. पडत होत्या, उठत होत्या. त्यांना आगीने पुर्ण वढून टाकलं होत. ते दृश्य बघुन आईने आम्हाला घरात ढकलल आणी बाहेरुन कडी लावली. मग मी माळवदावर जावून पाहु लागलो, लोकांनी बादलीने पाणी आणुन राधाकाकीच्या अंगावर ओतले. आग तर विझली पण काकी धाडकन जमीनीवर बेशुद्ध पडल्या.
तीला दवाखान्यात नेण्यात आले, 2 तासानी बातमी आली की राधाकाकी गेल्या. संध्याकाळी त्यांना घरी आणले व सर्व सोपस्कार पुर्ण करुन त्यांना स्मशानात नेले.त्या दिवशी सर्व गाव आमच्या वाड्यासमोर लोटलं होतं. राधाबाई थोडीसी वेडसर पण कामाला वाघ असलेली बाई होती. वेड्याच्या भरात तीने पेटवुन घेतल होत म्हणे. तिचा नवरा कामाला आणि मुलं रानात गेली होती, त्या वेळेस तिने पेटवून घेतलं होतं. दोन दिवस असेच शांत गेले, चौथ्या दिवशी कोळीकाकानी ( राधाकाकीचा नवरा ) आईला आवाज दिला,'मालकीणबाई येवू का जरा ? ये की रे दत्तू ! विचारायच काय त्यात. कोळीकाका वाड्यात आले ढाळजेत खाली मान घालून बसुन राहीले. आईने त्यांना पाणी दिले अन म्हणाली," जे झालं ते वाईट झाल दत्तू. आता मुलांकडे लक्ष द्यायला हवे. मन घट्ट कर."कोळीकाकांनी मान वर केली अन म्हणाले," ती आली होती राञी." कोण ? आईने सहज विचारले. तीच ! राधा !! कोळीकाका भयाण स्वरात म्हणाले. " राधा ? " "हो! रात्री मला अचानक जाग आली. वाटत होत कोणीतरी फिरतय आसपास. उठलो आणि कंदिलाच्या मंद प्रकाशात बघितलं तर कोप-यात कोणीतरी खाली मान घालून बसलं होतं. मोकळे केस, हिरवी साडी कोणतरी बाई बसली आहे हे जाणवत होतं, मला वाटल स्वप्न बघतोय, पुन्हा झोपणार एवढ्यात लक्षात आलं की तीची हलचाल होतीय.
तीची मान हळूहळू वर होत होती, राधा होती ती. खोल दरीतुन आवाज यावा तसा आवाज आला,' घाबरु नका धनी, मी काय नाय करणार, मुलांचा ओढीने आलेय मी.'
राञभर राधा मुलांच्या भोवती फिरत होती त्यांना थोपटत होती. नवल म्हणजे मुलंही शांत झोपली होती.
मी माञ राञभर जागाच होतो. पहाटे कधीतरी ती निघुन गेली. माझ्या आईला धक्काच बसला, ऐकलेल सर्व अविस्वासनीय वाटत होत.आई म्हणाली, घर बदल दत्तू, मी शब्द टाकते तुझ्यासाठी. दिस पुरे व्हायचेत तीचे. दिस घातल्याबीगर कसा घर सोडू मालकिणबाई ?
यावर आईला पण काही उपाय सुचला नाही. थोडा वेळ बसुन दत्तूकाका निघून गेले.
दहा दिवस झाले.
राधाकाकीच दहावं झालं आणि त्याच दिवशी दत्तूकाकांनी गाव सोडलं, जाताना घरी आले, म्हणाले, ' रोज राञी येत होती अन पहाटे जायची, आता इथे रहाणे शक्य नाही त्यामुळे गाव सोडतोय. एवढं बोलून ते निघून गेले
दोन दिवस असेच गेले. रोज राञी आम्ही अंगणात झोपायचो. दुसरे दिवशी राञी आम्ही सर्वजण झोपी गेलो. राञी मला अचानक जाग आली, कोणीतरी आईच्या नावाने हाक मारत होत. आई उठून बसली होती आणि भयचकित नजरेने दरवाजाकडे पहात होती.
पुन्हा आवाज आला, "काकी ओ काकी... जरा बाहेर या की." ( गावात बरेच जण माझ्या आईला काकी म्हणुन ओळखतात. )
मी आईला विचारले, कोण आहे ग ? आईने ओठावर बोट ठेवत हळु आवाजात सांगीतले, गप्प बैस ! राधा आहे ती. माझ्या अंगावर सरसरुन काटा आला. अन माझ्याही नकळत आई अरे अरे म्हणेपर्यंत मी दरवाज्याकडे झेपावलो. जुन्या काळच्या वाड्यात दरवाजाला कोण आलय हे बघण्यासाठी होल असायचे त्यातून मी बाहेर बघीतले.
बाहेर 'ती' होती. वाड्याच्या तीन पाय-यांच्या खाली ती इकडुन तीकडे फिरत होती. सरपटत, पाय ओढत घासत पुढे सरकत होती. पुटपुटत होती, कुठं गेली माझी मुल ? धनी बी दिसत नाहीत. मधुनच आवाज देत होती, काकी ओ काकी जरा बाहेर या हो. माझी मुलं दिसत नाहीत कुठच.
तीला कदाचीत माझी जाणीव झाली असावी, अचानक ती दरवाजासमोर थांबली अन गर्रकन वळुन माझ्याकडे पाहु लागली, थेट माझ्याकडेच पहात होती ती.
तीच्या चेह-यावर चंद्राचा प्रकाश पडला होता. अर्धवट जळालेला चेहरा, जळालेले केस, कपडे आणि पाढंरीशुभ्र नजर. मनाला आरपार भेदून जाणारी, पकड घेणारी नजर.
धाकले मालक मला आत घ्या की ! ये म्हणा मला. माझ्या डोक्यात घणाचे घाव घालावेत तसे पुन्हा पुन्हा शब्द कोसळत होते, मनात घुमत होते. माझा हात माझ्या मनाविरुद्ध कडीकडे तसूतसूनी सरकत होता, मनावर भितीचा अंधार अधिकच गडद होत होता.
माझी ही अवस्था कदाचीत आईच्या लक्षात आली असावी, तीने खसकन मला मागे ओढले, अन एक धपाटा मारला. मी भानावर आलो. पुन्हा अंथरुणावर जावून बसलो. अंगात चांगलेच कापरे भरले होते, मी आईला सांगीतले ती मला घरात बोलवा म्हणत होती. आई म्हणाली, ' मग बोलवायच की, ये म्हणायच ! आणि ती आली असती तर ? आई हसली, म्हणाली " अरे महेश आपल्या घरात स्वयंभू गणेशाची 300 वर्षापुर्वीची मुर्ती आहे ढाळजेत, त्याचे अधिष्ठान आहे आपल्या घरात. दर वर्षी आपल्या घरात भागवत सप्ताह होतो, ज्या जागेत भागवत सप्ता होतो त्या जागेत 12 वर्षे अमानवी काहीही येवू शकत नाही.
मुख्य म्हणजे आपले कुलदैवत जगदंबा माता आहे. येईल का ती घरात ?
माझी मान नकारार्थी हलत होती. आईने मला झोपायला सांगीतले. ती राञ अशीच घालमेलीत गेली.
त्यानंतर एक दोन राञी असेच आवाज यायचे, आम्ही दुर्लक्ष करायला लागलो नंतर आवाज येणे बंद झाले.
लहान मुलांच मन पाण्यासारख असतं, काहीही मनात रहात नाही. मी ही घटना विसरुन गेलो.
...
दोन वर्षानंतर...
एका संध्याकाळी...
एकदा विटिदांडू खेळताना मी मारलेली विटी राधाकाकीच्या घरात जावून पडली. त्या घरात कोणीच जात नसे, त्यामुळे मीच विटी आणायला गेलो. घर अर्धवट पडलेले. छत, भिंती ढासळलेल्या, दरवाजा उखडलेला.
मी घरात शिरलो. समोरच पडलेली विटी उचलली अन मागे वळलो. थांबलो. दरवाजाच्या कोप-यात ती बसलेली दिसत होती. हिरवी साडी, हातभर बांगड्या, मळवट भरलेला जळका चेहरा आणि आरपार जाणारी नजर. तीची पाढंरीशुभ्र नजर माझा वेध घेत होती, मान कलली होती, ती उठत होती अन माझ्याकडे झेपावत होती. क्षणात ती कोप-यात होती, क्षणात तीचा चेहरा माझ्यापासून 1 फुटावर होता.
तीच्या अंगातुन काळे धुराचे लोट बाहेर पडत होते, मला वेढुन टाकत होते, मला श्वास घ्यायला ञास होवू लागला कोणीतरी आपला जीव खेचुन बाहेर काढतय याची जाणिव होवू लागली, त्याच वेळेस मला एक भयानक, जिवघेणी किंकाळी ऐकू आली. माझ्याभोवतीचे धुराचे पडदे नाहीसे झाले, तीच्या अमानवी शरीरातुन आगीच्या ज्वाळा निघत होत्या, जळत होती ती. माझ्या मानेभोवती आग जाणवतेय अस वाटल्यामुळे मी माझ्या गळ्यात पाहिले तर माझ्या गळ्यात असलेली तुळजाभवानीची माळ लखलखत होती, तीचा प्रकाश तीला वेढुन टाकत होता. ती क्षणभरातच नाहीशी झाली. मी कसाबसा घराबाहेर आलो आणि बेशुद्ध पडलो.
!! समाप्त !!