Get it on Google Play
Download on the App Store

शापित श्वास!

पृथ्वीवरचा निसर्ग-बिंदू वेगाने आकाशात चालला होता. तो काळोख्या अनंत आकाशात एका अज्ञात ठिकाणी खूप दूरवर पोहोचल्यावर त्यापासून पाच बिंदू वेगळे झाले- पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी आणि आकाश! ही पंचमहाभूते एका महत्त्वाच्या चर्चेसाठी आणि निर्णय घेण्यासाठी एकत्र आले होते. ते पाचही बिंदू तरंगत होते.
अग्नी ने हसतच बोलायला सुरुवात केली, म्हणाला, "कमाल आहे माणसांची! पृथ्वी च्या अंताबद्दल त्यांनी चित्रपट बनवून देखील टाकला. २०१२. पण ते वर्ष उलटून गेले आणि त्याप्रमाणे झालेच नाही. बिचारी माणसे, त्यांना वाटत आहे की विज्ञानामुळे आपण निसर्गावर सुद्धा मात केली आणि निसर्ग आपला अंत कसा करेल हे सुद्धा आपण ठरवू. अनेक पुस्तके, चर्चा, व्हिडिओ वर तर्क वितर्कांना उधाण आले आहे नुसते! "
पृथ्वी पुढे म्हणाली, "हो ना! तो स्वत: बरोबरच निसर्गसुद्धा नष्ट होईल अशी कल्पना लढवत आहे, मूर्ख कुठला मानव! आणि काही विज्ञान-निष्ठ मानवांना असेही वाटत आहे की जगाचा अंत सुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विज्ञानाच्या एखाद्या समीकरणानुसार होणार! माणसांना गर्व झालाय, गर्व! इतर ग्रहांवरच्या मानव सदृश प्राण्यांनी अजूनतरी निसर्गाशी प्रतारणा केलेली नाही. त्यामुळे त्या ग्रहांवरील निसर्ग खरोखरीच भाग्यवान आहे."
वायू आणि पाणी म्हणाले, "आणि काही अध्यात्म-निष्ठ मानव आपापल्या श्रद्धेनुसार जगाचा अंत कल्पत आहेत!!"
आकाश म्हणाले, "पृथ्वीवरच्या मानवाला आता कळेलच लवकर! त्याने विचार केलेल्या एकाही पद्धतीने जगाचा अंत होणार नाही तर निसर्ग आपल्या अद्भुत आणि अभूतपूर्व पद्धतीने जगाला संपवेल. भूकंप, ज्वालामुखी, महापूर, यापैकी काहीच होणार नाही. मानवांचे मृत्यू होतील पण सगळे नैसर्गिकरीत्या..जसा मानवांनी निसर्गावर अत्याचार केला तसा आपण त्यांचेवर करणार नाही. आपण त्यांना नैसर्गिकच मरण देऊ.!!"
"मानव पण किती भोळा. सगळ्या पृथ्वीचा विनाश चिंततो आणि स्वत: मात्र जहाजांमध्ये सुखरूप जिवंत आहे असा कल्पनावाद करतो. मूर्ख कुठला!", सगळे एकसुरात म्हणाले. ते कुजबुजले आणि शेवटी त्यांचं ठरलं. होय. हाच उपाय!
"आकाश" हास्य करू लागले तेव्हा ढगांत गडगडाट होवून "पृथ्वी" वर "पाऊस" पडू लागला आणि "वारा" वाहू लागला, "विजा" चमकायला लागल्या. पृथ्वीवर मानवाला नेहमीपेक्षा वेगळी कसलीतरी अभद्र चाहूल लागली होती. पण नेमकी कोणती ते मात्र समजत नव्हते...
पाचही बिंदू एका सुरात म्हणाले, "मानवा, बस्स झाले तुझे निसर्गावरचे अत्याचार! बस्स झाला आता तुमचा एकमेकांवर, प्राण्यांवर आणि माणुसकीवर अत्याचार!" मग ते पाच बिंदू एकत्र आले. त्याचा पुन्हा निसर्ग बिंदू झाला आणि तो बिंदू पृथ्वीकडे वेगात झेपावला!! चर्चेत गुपितपणे ठरल्यानुसार "वायू" ने आपला गुणधर्म बदलला. आता उद्या सकाळी सगळे मानव श्वास घेतील आणि सुरू होईल जगाच्या अंताची सुरुवात. अंतारंभ.
वायू मोठ्याने हूं हूं करत म्हणत होता, "मानवा! तुझा जेथे आरंभ होतो तेथूनच तुझ्या अंताची सुरुवात होणार आहे...!! मात्र इतर सगळे प्राणी पक्षी जीव याना काही होणार नाही...!!"
दुसऱ्या दिवशी सगळ्या मानवांनी श्वास घेतला. नवा श्वास!! वेगळा श्वास. निसर्गाने दिलेल्या शापाचा श्वास. माणसाने आपल्या बुद्धीचा वापर निसर्गावर अत्याचार करण्यासाठी वापर केल्याने निसर्गाने दिलेला शाप. आजची मध्यरात्री पर्यंत जन्मलेली बालके शेवटची असणार होती.
त्यानंतर कोणतेही बालक जन्माला येऊ शकणार नव्हते. हो! स्त्री पुरुषाच्या शरीरातील संतती जन्माला घालू शकणाऱ्या सगळ्या गोष्टी आतून नष्ट झाल्या. नव्या श्वासाद्वारे तो बदल "निसर्गाने" मानवात केला होता. त्या दिवशी ज्या महिला गरोदर होत्या तेवढ्याच फक्त बालके
जन्माला घालू शकणार होत्या. आता मनुष्य सेक्स नेहमी सारखा करू शकत होता पण फक्त त्यातून संतती जन्माला आता येऊच शकणार नव्हती. हे सगळ्या जगभर कळायला दोन तीन महिने लागले. डॉक्टरांकडे भरपूर अशा केसेस यायला लागल्या. त्या शापित श्वासा च्या दिवसानंतर जगभर बातम्या पसरल्या. १८ ऑगस्ट ला शेवटच्या बालकाच्या जन्माची नोंद झाली. त्यानंतर जगात कोणतेच बालक जन्माला आले नाही. जवळजवळ आता सगळ्यांना कळून चुकले होते की जेवढे मानव उरलेत तेच! आता नवीन बालके जन्मणार नाहीत.
अशा पद्धतीने जगाचा अंत होणार आहे. काहींना ही एक पर्वणी झाली. आता सेक्स मधून बालके जन्म होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे व्यभिचार वाढला. कोन्डोम चा खप संपला. सेक्स चा आनंद घेण्यातला "अडथळा" काहींसाठी संपला. लग्न प्रथा बंद झाली कारण वंश वृद्धी वगैरे हा प्रकार आता असणार नव्हता. याउलट, इतर काही आध्यात्मिक जणांनी एक गट स्थापन केला. जगभरातले लोक त्यात जमा झाले. त्यांनी अखंड देवाचा जप सुरू केला. आपापल्या धर्मानुसार सगळ्यांनी पूजा आणि प्रार्थना सुरू ठेवल्या. यज्ञ होम हवन सुरू केले. जगभरातल्या डॉक्टर्स लोकांनी आणि आयुर्वेदाच्या ऋषिमुनींनी एकत्रित रित्या एक संशोधन सुरू केले. अमरत्वाचे औषध. त्यांचे प्रयत्न सुरू झाले पण अजुन त्यात यश आले नव्हते. पण जाहिरात करून लोकांना आगाऊ बुकिंग करायला लावून पैसे जमा केले.
वेगवेगळ्या देशातल्या दहशतवाद्यांवर याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यांनी लोकांना मारणे सुरूच ठेवले. जग ढोबळमानाने दोन प्रकारच्या मानसिकतेत विभागले गेले. जेवढे दिवसा जगणार तेवढे दिवस आनंदात जगण्याचे ठरवू लागला आणि दुसरा गट जो इतरांना आणि स्वत: ला संपवू लागला. एकमेकांचे दुश्मन असलेले काही देशांचे संबंध सुधारले तर काही दुश्मन देश या स्थितीत सुद्धा एकमेकांवर आक्रमण करू लागले. जिंकणाऱ्या देशाला जग संपता संपता एकच समाधान की आपला दुश्मन देश आपण या जगातून संपवला. आपल्या आधी तो संपला, हेच एक समाधान. काही देशांनी व्हिसा, पासपोर्ट चे नियम एकमेकांसाठी शिथिल केले. मारायच्या आधी जग बघायचे म्हणून विना परवाना वेगवेगळे देश फिरायला मिळायला लागले. काही अरब देशांनी तेल फुकट वाटायला सुरुवात केली कारण आता वाहनांचा वापर पण कमी झाला होता. माणसेच नसतील तर गाड्या कोण चालवणार? गाड्या चालणार नसतील तर पेट्रोल चा काय उपयोग?
जगभरातले शास्त्रज्ञ आपापले लावलेले शोध कवटाळून बसून रडू लागले. काही जणांनी ते नष्ट केले. काहींनी हार मानली नाही. ते शोध लावताच राहिले. अनेक लोक पृथ्वीवर हे बघत बसण्यापेक्षा नासातर्फे यानात बसून अंतराळात निघून गेले. चित्रपट क्षेत्र या कल्पनेवर चित्रपट बनवू लागले. पण लोकांच्या मनात रसास्वाद घेण्याची वृत्ती हळूहळू कमी होत गेली. चित्रकार, लेखक यांना काही विशेष सुचेनासे झाले. कारण सगळ्यांना आपला शेवट कळून चुकला होता. जितके लोक उरलेत आणि जे सकारात्मक विचारसरणीचे होते ते सेमिनार घेऊ लागले. लोकांना जगण्याची कला शिकवू लागले. कारखाने, कंपन्या बंद पडल्या. शिकून नोकरी मिळवून आता फारसा फायदा होणार नव्हता. नवा व्यवसाय काढून उपयोग नव्हता. ज्योतिषी मंडळी वेगवेगळे तर्क लढवू लागले. शेतकरी मात्र श्रीमंत झाला. धान्याला खूप भाव आला.
शाळांमध्ये सुरुवातीच्या इयत्ता ओस पडायला लागल्या. इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी.... क्रमाने बंद पडत चालल्या. लहान मुलेही हळूहळू त्या मानसिकतेत तयार होवू लागली. एक वर्ष असे आले की त्यानंतर जगात अठरा वर्षांच्या आतली मुले उरली नाहीत. सगळ्या जगात फक्त मोठी माणसं. लहानपण संपलं होतं. पृथ्वीवरच्या प्राण्यांची मात्र संख्या नेहमीसारखी होती. जशी वाढायची तशीच वाढत होती. काही वर्षानंतर जगात प्राण्यांची संख्या वाढली. साप, वाघ अधूनमधून रस्त्यावर दिसू लागले. ते माणसांची शिकार करू लागले. झाडे माणसांवर हसू लागली. हळूहळू लोकांच्या एक लक्षात यायला लागले की तो कोण असेल जो या जगात सगळ्यात लहान आहे? तो सगळ्यात शेवटचा असेल. सगळ्यात शेवटचा माणूस जो सगळ्यात शेवटी त्याचा शेवटचा शापित श्वास सोडेल?
शेवटी दोन जण उरले. एक पुरुष. एक स्त्री. एकमेकांमध्ये पाच वर्षांचे अंतर. ते कोणत्या देशाचे आणि वयाचे होते हे कळून आणि न कळून काय फायदा होणार होता? शेवटी जगाच्या सुरुवातीच्या स्थितीत पुन्हा मानव जात येऊन पोहोचली. एक स्त्री. एक पुरुष. दोघांनी ठरवले निसर्गाची माफी मागायची का? आम्हाला आता अपत्य जन्माला घालू दे. हे निसर्ग देवता! आम्ही वचन देतो की आम्ही निसर्गावर अत्याचार करणार नाही. प्लीज! प्लीज! त्यांनी प्रार्थना करायला डोळे मिटले. युगे युगे लोटली. अगदी मनापासून ते दोघे प्रार्थना करत होते. त्यांनी डोळे उघडले. ते तरुण झाले होते, त्या समोरच्या झाडावर एक सफरचंद दिसत होते. ते अचानक खाली पडले. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि ते हसले. त्यांना ठरवायचे होते - फळ खायचे की नाही? आपल्याला हे जे दिसले ते भविष्याचा भास होता की ते खरेच होते? असा विचार ते फळ खाण्यापूर्वी करत राहिले...
(समाप्त)

शापित श्वास!

Nimish Navneet Sonar
Chapters
शापित श्वास!