बेकीमो!
१९११ मध्ये स्वीडनच्या गॉथेनबर्ग बंदरातील लिंडहोम्स शिपयार्डमध्ये एक जहाज बांधण्यात आलं. या जहाजाचा सांगाडा संपूर्ण स्टीलचा बनवला होता. २३० फूट लांबीच्या या जहाजाला वाफेवर चालणारं इंजिन बसवलेलं होतं. १० नॉटच्या वेगाने जहाज मार्गक्रमणा करु शकत असे. १३२२ टनांच्या जहाजावर मोठ्या प्रमाणात माल साठवण्याची सोय होती. हॅम्बुर्गच्या बाल्टीश्च रीडरेल कंपनीची मालकी असलेल्या या जहाजाला नाव देण्यात आलं अॅन्गर्मानेल्व्ह्न!
१९१४ मध्ये पहिल्या महायुध्दाला सुरवात झाल्यावर जर्मन सरकारने हे जहाज ताब्यात घेतलं आणि युध्दकार्याला जुंपलं. महायुध्द संपल्यानंतर व्हर्सायच्या तहानुसार जर्मन नौदल बरखास्त करण्यात आलं. जर्मनीच्या ताब्यातील सर्व जहाजं दोस्त राष्ट्रांनी ताब्यात घेतली. १९२१ मध्ये अॅन्गर्मानेल्व्ह्नची मालकी ब्रिटनमधील हडसन बे कंपनीकडे आली. हडसन बे कंपनीने जहाजाचं अॅन्गर्मानेल्व्ह्न हे लांबलचक नाव बदलून त्याला सुटसुटीत नाव दिलं....
बेकीमो!
इंग्लंडमधील बंदरांतून कॅनडाच्या उत्तर किनार्यावर असलेल्या एस्कीमोंच्या वसाहतीला विविध वस्तूंचा पुरवठा करण्याचा हडसन बे कंपनीचा व्यवसाय होता. या वस्तूंच्या बदल्यात एस्कीमो शिकार्यांकडून सील आणि वॉलरसची मुबलक प्रमाणात कातडी मिळत असत! ही कातडी इंग्लंडमध्ये विकून कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदा होत असे.
कॅनडाच्या उत्तर किनार्याजवळचा आणि ग्रीनलंडच्या आसपासचा आर्क्टीक समुद्राचा भाग हा जहाजांच्या दृष्टीने तसा धोकादायकच आहे. कायम थंड (आणि हिवाळ्यात गोठणारं अतिथंडं!) हवामान आणि खवळलेला समुद्र तसंच जहाजाचे सुटे भाग मिळण्याची जवळपास शून्य असलेली शक्यता आणि कोणत्याही दुरुस्तीसाठी थेट इंग्लंड अथवा कॅनडातील चर्चील बंदर गाठावं लागत असल्याने, या भागात कोणतंही जहाज दोन-तीन वर्षांपेक्षा जास्तं टिकत नाही!
याला अपवाद ठरलं ते बेकीमो!
सतत नऊ वर्षे या जहाजाने कॅनडाच्या उत्तरेकडील आर्क्टीक सागरात यशस्वी संचार केला होता!
अगदी हेवा वाटावा असाच विक्रम!
ही पुढल्या पराक्रमाची नांदी तर नव्हती ना?
१९३१ सालच्या सप्टेंबर महिन्यात बेकीमो आपल्या नेहमीच्या सफरीवर आर्क्टीकमधून चाललं होतं. मधूनच समोर आलेल्या हिमखंडांना बगल देत. क्वचितप्रसंगी बर्फ फोडून मार्ग काढत किनार्या-किनार्याने जहाजाचा प्रवास सुरू होता. जहाजाच्या सफरीचं हे तब्बल दहावं वर्ष होतं! जहाजावर कॅप्टन जॉन क्रॉमवेलसह एकूण ३७ माणसं होती. जहाजावर सीलची मुबलक कातडी साठवण्यात आलेली होती.
१ ऑक्टोबर १९३१ या दिवशी अनपेक्षीतपणे आलेल्या वादळात बेकीमो बर्फात अडकलं!
अलास्कातील सर्वात उत्तरेला असलेलं बॅरो हे बंदर जवळच होतं. जहाजातील खलाशांनी गोठलेल्या बर्फावरुन वाटचाल करत बॅरो शहर गाठलं आणि तिथे आश्रय घेतला.
अलास्काच्या उत्तर किनार्यापासून जवळ बर्फात अडकलेलं बेकीमो
दोन दिवसांनी वादळाचा जोर ओसरल्यावर खलाशी जहाजाकडे परतले. जहाज बर्फातून मोकळं झाल्याचं त्यांना आढळून आलं. मात्रं ८ ऑक्टोबरला पूर्वीपेक्षाही जाड बर्फाच्या थरामध्ये जहाज पुन्हा अडकलं!
सुमारे एक आठवडा उलटल्यावरही जहाज बर्फातच अडकलेलं होतं. अखेर हडसन बे कंपनीच्या अधिकार्यांनी जहाजाचा नाद सोडला आणि खलाशांची सुटका करण्यासाठी एक विमान पाठवलं. जहाजावरील ३७ पैकी २२ खलाशी विमानाने इंग्लंडला परतले. परंतु कॅप्टन क्रॉमवेल आणि इतरांची इतक्या सहजासहजी जहाजाचा नाद सोडण्याची तयारी नव्हती!
क्रॉमवेल आणि १४ खलाशांनी जहाज बर्फातून मो़कळं होण्याची वाट पाहत थांबण्याचा निर्णय घेतला! परंतु जहाज आणखीन भरकटल्यास त्याबरोबर भरकटण्याची त्यांची तयारी नव्हती! जहाजावर मुक्काम न करता त्यांनी जवळच बर्फावर एक आटोपशीर लाकडी केबिन उभारली आणि जहाज बर्फातून मोकळं होण्याची वाट पाहत त्यांनी तिथे मुक्काम ठोकला!
हा निर्णय किती योग्य ठरणार होता?
कॅप्टन क्रॉमवेल आणि त्याच्या १४ सहकार्यांच्या केबिनमधील मुक्कामाला महिना उलटून गेला होता. गोठलेल्या बर्फात अडकलेलं जहाज मुक्तं होण्याची कोणतीही चिन्हं दिसत नव्हती! त्यातच २४ नोव्हेंबरला जोरदार हिमवादळ येऊन धडकलं! सतत घोंघावणारा वारा आणि कोसळणारं बर्फ यातून काही अंतरावरच असलेलं बर्फात अडकलेलं बेकीमो केबिनमधून दिसेनासं झालं होतं.
२५ नोव्हेंबरच्या सकाळी हिमवादळ अचानक आलं तसं अचानक गायब झालं. केबिनमधून बाहेर नजर टाकल्यावर क्रॉमवेल आणि त्याच्या सहकार्यांना आश्चर्याचा धक्का बसला...
बर्फात घट्ट रुतलेलं बेकीमो गायब झालं होतं!
हिमवादळात बेकीमोचा निकाल लागला असावा अशी कॅप्टन क्रॉम्वेल आणि त्याच्या सहाकार्यांची पक्की खात्री झाली. अलास्कातील मुक्काम आवरुन त्यांनी परतीचा निर्णय घेतला.
काही दिवसांनी एका सीलच्या शिकार्याची क्रॉम्वेलशी गाठ पडली. सुमारे ४५ मैलांवर बर्फाच्या तु़कड्यावर बेकीमो अडकलेलं त्याच्या दृष्टीस पडलं होतं. आधी क्रॉम्वेलचा त्याच्यावर विश्वास बसेना. मात्रं त्या शिकार्याने जहाजाचं तपशीलवार वर्णन केल्यावर ते बेकीमोच असल्याची क्रॉम्वेलची खात्री झाली. जहाजावर अद्यापही मुबलक प्रमाणात सीलची कातडी साठवलेली होती. आपल्या खलाशांसह चर्चा केल्यावर क्रॉम्वेलने बेकीमोचा शोध घेऊन ते ताब्यात घेण्याची योजना आखली.
शिकार्याने सांगितलेल्या ठिकाणी क्रॉम्वेलला बेकीमो नेमकं सापडलं! वादळात जहाजाचं थोडंफार नुकसान झाल्याचं आढळून आलं होतं. जहाजाचा बॉयलर आणि इतर सर्व यंत्रं उत्तम स्थितीत होती. मात्रं ते कितपत टिकाव धरु शकेल याबद्दल क्रॉम्वेलच्या मनात शंका होती. आपल्या सहकार्यांसह घेता येतील तितकी सीलची कातडी बरोबर घेऊन त्याने बेकीमो सोडलं. काही दिवसातच जहाज आर्क्टीकचा तळ गाठणार याबद्दल कोणाच्याच मनात शंका उरली नव्हती!
आर्क्टीक मधील बेकीमोच्या मुक्त भ्रमंतीला सुरवात झाली!
क्रॉम्वेल आणि सहकार्यांनी जहाज सोडल्यावर काही महिन्यांनी पूर्वेला सुमारे ३०० मैलांवर ते आढळून आलं!
१९३२ सालच्या मार्च महिन्यात कुत्र्यांच्या स्लेजवरुन एक शिकारी लेस्ली मेल्वीन अलास्कातील नोम शहराकडे निघाला होता. किनारपट्टीवरील भागातून जाताना त्याला एक जहाज पाण्यातून मार्गक्रमणा करताना आढळून आलं!
हे बेकीमो होतं हे वेगळं सांगायला नकोच!
लेस्ली मेल्वीनने बेकीमो पाहिल्यानंतर काही महिन्यांनी खनिज पदार्थांचा शोध घेणार्या संशोधकांनाही बेकीमोचं दर्शन झालं!
१९३३ च्या मार्च महिन्यात एस्कीमोंच्या एका तुकडीच्या दृष्टीस बेकीमो पडलं. आपल्या लहान-लहान कयाक बोटी जहाजामागे बांधून त्यांनी जहाजावर प्रवेश केला. जहाज उत्तम स्थितीत होतं. परंतु बॉयलर सुरू करुन ते हाकारण्याचं ज्ञान एस्कीमोंपाशी नव्हतं! जहाजावरील सीलची मुबलक कातडी पाहिल्यावर त्यांनी ती लुटण्यास प्रारंभ केला. एस्कीमोंच्या दुर्दैवाने ते जहाजावरुन उतरण्यापूर्वीच वादळाला सुरवात झाली! पुढचे दहा दिवस ते एस्कीमो जहाजावरच अडकून पडले होते. वादळाचा जोर ओसरताच एस्कीमोंनी सीलच्या कातड्यांचा नाद सोडला आणि आपल्या बोटीतून धूम ठोकली!
बेकीमोबद्दलच्या या सर्व बातम्यांची हडसन बे कंपनीने नोंद घेतली होती. परंतु जहाजाचा शोध घेऊन ते इंग्लंडला परत आणणं अव्यवहार्य असल्याचं कंपनीच्या अधिकार्यांचं मत होतं.
१९३४ च्या जुलै महिन्यात शिडांच्या जहाजातून सशोधनसफरीवर असलेल्या तुकडीच्या नजरेस बेकीमो पडलं. जहाजावरील काहीजण बेकीमोवर चढले. बेकीमोवरील सर्व यंत्रसामग्री अद्यापही सुस्थितीत असल्याचं त्यांना आढळून आलं! मात्रं बर्फात अडकण्याचा धोका पत्करुन ते जहाज ओढत आणण्याची त्यांची तयारी नव्हती. जहाजाचं नेमकं स्थान निश्चित करुन त्यांनी तशी नोंद घेतली आणि बेकीमोचा नाद सोडून ते आपल्या पुढील प्रवासाला निघून गेले!
बर्फात अडकलेल्या बेकीमोला भेट देताना संशोधक
१९३५ च्या सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा अलास्काच्या समुद्रकिनार्याजवळ बेकीमोचं दर्शन झालं!
१९३९ च्या नोव्हेंबर महिन्यात कॅप्टन ह्यू पोल्सनच्या नजरेस बेकीमो पडलं. पोल्सनने जहाजावर चढून पाहणी केली असता जहाज अद्यापही उत्कृष्ट स्थितीत असल्याचं त्याला आढळून आलं! त्याने जहाज ओढत अलास्कातीन बॅरो इथे नेण्याचा निर्णय घेतला. मात्रं काही अंतरावरच अनपेक्षीतरित्या समोर उभे ठाकलेल्या हिमखंडांमुळे त्याला आपला बेत बदलावा लागला. बेकीमोचा नाद सोडून तो बॅरो इथे परतला.
१९३९ नंतर अनेकदा अलास्कापासून कॅनडाच्या चर्चील बंदरापर्यंत कुठे ना कुठे तरी बेकीमो दृष्टीस पडत राहीलं! मात्रं जहाजावर पाय ठेवण्यात कोणालाही यश आलं नाही! हजारो मैलांच्या आपल्या भ्रमंतीत बेकीमोने कोणाचंही स्वामित्वं स्वीकारलं नाही!
१९६२ च्या मार्च महिन्यात एस्कीमोंच्या एका तुकडीला ते ब्यूफोर्ट समुद्राच्या किनार्यावर भरकटताना आढळलं होतं!
कॅप्टन क्रॉम्वेलने सोडल्यानंतर तब्बल ३८ वर्षांनी १९६९ मध्ये बेकीमोने पुन्हा एकदा दर्शन दिलं! बर्फात अडकलेलं बेकीमो एस्कीमोंच्या एका लहानशा तुकडीला आढळून आलं होतं.
नॅशनल जिऑग्राफीकने आपल्या १९६८ च्या अंकात 'बेकीमोचा अटकाव न करता येणारे जहाज' असाच उल्लेख केला होता!
१९६९ नंतर मात्रं आजतागायत बेकीमो कोणाच्याही दृष्टीस पडलेलं नाही!
२००६ मध्ये अलास्का सरकारने बेकीमोचं नेमकं काय झालं असावं याचा शोध घेण्यासाठी एक मोहीम आखली. बेकीमो अद्यापही पाण्यावर अथवा बर्फावर सफर करीत असावं की त्याने समुद्राचा तळ गाठला असावा याचा शोध घेण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली. मात्रं अद्याप या मोहीमेतून खात्रीलायक अशी कोणतीही माहीती हाती आलेली नाही!
बेकीमोचं नेमकं काय झालं असावं?
१९६९ मध्ये शेवटचं दर्शन दिल्यावर अखेरीस त्याने आर्क्टीकच्या तळाशी चिरविश्रांती घेतली असेल काय? की अद्यापही हजारो मैलांचा प्रवास करुन ते उत्तर धृवाच्या आसपास कुठेतरी भटकत असावं?
कुणी सांगावं...
कदाचित एखादवेळी धुक्यातून बाहेर पडून बेकीमो अचानकपणे दत्त म्हणूस समोर उभं राहील!
संदर्भ :-
The Devil's Sea - रिचर्ड वायनर
Ghost Ships - रिचर्ड वायनर
Aeronautics: Flights & Flyers - टाईम मॅग्झीन - १९३२
Baychimo - Arctic Ghost Ship - अँथनी डाल्टन, जेम्स डेल्गॅडो
Ghost Ship - Disappearance of Baychimo - केन हार्पर