थोडे अद्भुत थोडे गूढ
दुसर्या महायुद्धाला नऊ वर्ष उलटली होती.
अमेरीकेने केलेल्या हिरोशिमा आणि नागासाकी वरच्या अणुबाँबच्या हल्ल्यांमधून जपान अद्यापही सावरत होता. तीन लाखांवर माणसांचा बळी गेलेला दुसरा कोणताही देश कितीतरी वर्षे खचून गेला असता... पण जपान? अविश्रांत मेहनत आणि जिद्द याच्या जोरावर जपान पुन्हा उभा राहत होता.
युद्धानंतरही पाश्चात्य देशांशी उत्तम राजकीय आणि आर्थिक संबंध टिकवून ठेवण्यात जपान यशस्वी झाला होता. त्यामुळे जपानमध्ये विविध कामांसाठी येणार्या लोकांचा आणि पर्यटकांचा ओघही कायम असे. टोकीयो इथला आंतरराष्ट्रीय विमानतळ कायमच प्रचंड गर्दीने ओसंडून जात होता! अनेकदा तर मुंबईतील उपनगरीय स्थानकाला गर्दीच्या वेळेला येते तशी कळा हॅनेडा विमानतळाला येत असे!
१९५४ चा जुलै महीना.
सकाळपासूनच टोकीयोच्या हॅनेडा विमानतळावर नेहमीप्रमाणेच गर्दी होती. अनेक वेगवेगळी विमानं टोकीयो इथे येऊन पोहोचत होती. टोकीयोवरुन अनेक विमानं वेगवेगळ्या दिशांना उड्डाण करत होती. वेगवेगळ्या विमानांतून आलेले प्रवासी इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या अधिकार्यांसमोर तपासणीसाठी रांगा लावत होते. पासपोर्ट आणि व्हिसा तपासणी केल्याविना अर्थातच कोणालाही जपानमध्ये प्रवेश मिळू शकत नव्हता! कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसणारं हे नेहमीचंच दृष्यं होतं.
दुपारच्या सुमाराला पश्चिम युरोपातून येणारं एक विमान रनवेवर उतरुन नुकतंच थांबलं होतं. विमानातील प्रवासी आपापले पासपोर्ट आणि व्हिसा याच्यासह इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या अधिकार्यांसमोर रांगा लावत होते. एकेका प्रवाशाची तपासणी करुन अधिकारी त्याला जपानमध्ये प्रवेश देत होते.
एक माणूस असाच एका इमिग्रेशन अधिकार्यासमोर जाऊन उभा राहीला. आपला पासपोर्ट त्याने तपासणीसाठी त्या अधिकार्याच्या हवाली केला. अधिकार्याने तो पासपोर्ट पाहीला आणि तो चक्रावून गेला...
तो पासपोर्ट 'टॉर्ड' या देशाचा होता...
...परंतु अशा नावाचा कोणताही देश अस्तित्वातच नव्हता!
त्या माणसाकडे तो पासपोर्ट आला कुठून?
तो माणूस सुमारे साडेसहा फूट उंच आणि धिप्पाड होता. त्याने दाढी राखलेली होती. साधा कोट-शर्ट आणि पँट असा पोशाख त्याने घातलेला होता. वयाने तो साधारण चाळीशीचा असावा!
जपानी अधिकार्यांनी त्याला इमिग्रेशन काऊंटरवरुन वेगळ्या केबिनमध्ये आणलं आणि त्याच्याकडे चौकशीस प्रारंभ केला.
"तुझं नाव काय?"
त्याने आपलं नाव सांगीतलं खरं, पण ते इतकं विचित्रं होतं, की जपानी अधिकार्यांना ते नेमकं कोणत्या अक्षरांनी लिहावं हेच कळेना.
"तू कुठून आलास?"
"मी मूळचा टॉर्ड देशाचा रहिवासी आहे!" तो ठामपणे म्हणाला, "यापूर्वीही मी
अनेकदा जपानला आलेलो आहे. या वर्षीच माझी जपानला येण्याची ही तिसरी खेप
आहे!"
जपानी अधिकार्यांनी त्याचा पासपोर्ट नीट तपासला. पासपोर्ट तपासल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला...
तो माणूस नुकताच दोन वेळा जपानला येऊन गेल्याची पासपोर्टवरील शिक्क्यांवर नोंद होती! इतकंच नव्हे तर युरोपातील अनेक देशांमध्येही त्याने नियमीत प्रवास केल्याचे शिक्के पासपोर्टवर उमटलेले होते. अनेक देशांच्या व्हिसाचे स्टँप त्याच्या पासपोर्टवर आढळून आले होते. जपानचा व्हिसा अर्थात त्याला देण्यात आला होता!
जपानी अधिकार्यांनी त्याच्याजवळील पाकीटाची तपासणी केली. अनेक वेगवेगळ्या देशांच्या चलनी नोटा त्याच्या पाकीटात होत्या! जपानी येन अर्थातच होतेच!
"तुझी मूळ भाषा कोणती?"
"फ्रेंच! जगातील अनेक भाषा मी बोलू शकतो!" अस्खलीत जपानी भाषेत तो बोलत होता!
"जपानमध्ये कोणत्या कामासाठी आला आहेस?"
"अर्थात बिझनेसच्या! माझ्या कंपनीने मला एका बिझनेस मिटींगसाठी पाठवलं आहे!"
जपानी अधिकारी या विलक्षण प्रवाशाच्या उत्तरांनी चक्रावून गेले होते.
"तुझा हा जो देश आहे, टॉर्ड, तो नेमका कुठे आहे?" एका अधिकार्याने विचारलं.
"तुम्हाला टॉर्ड माहीत नाही?" त्याने आश्चर्याने आणि काहीशा रागीट स्वरात विचारलं.
जपानी अधिकार्यांनी नकारार्थी माना हलवल्या.
"स्पेन आणि फ्रान्सच्या सीमेवर माझा देश आहे! टॉर्ड! गेल्या हजार वर्षांपासून!"
जपानी अधिकार्यांनी युरोपचा नकाशा त्याच्यापुढे पसरला आणि त्याला त्याचा देश नकाशावर दाखवण्याची विनंती केली.
एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने एका ठिकाणी आपलं बोट ठेवलं.
"हे बघा! हाच माझा देश! टॉर्ड!"
त्याने दाखवलेल्या ठिकाणी जपानी अधिकारी पाहतच राहीले! त्याने स्पेन आणि फ्रान्सच्या दरम्यान असलेल्या आंडोरा या लहानशा देशावर बोट ठेवलं होतं.
"हा आंडोरा देश आहे!" जपानी अधिकारी म्हणाला, "टॉर्ड नाही!"
"याचं नाव तर नकाशात आंडोरा दिसतं आहे!" तो गोंधळून म्हणाला, "पण...पण हे
कसं शक्यं आहे? हा माझा टॉर्ड देशच आहे! तुमच्या नकाशात याचं नाव का बदललं
आहे?"
जपानी अधिकारी पार गोंधळून गेले होते! त्यांनी एक-दोन नाही तब्बल दहा नकाशे त्याच्यासमोर आणून ठेवले, पण प्रत्येक नकाशात तो आंडोरा देशावर बोट ठेवून हाच टॉर्ड देश आहे हे ठामपणे सांगत होता. त्या नकाशांत टॉर्ड देश नाही हे पाहून तो देखील चकीत झाला होता!
जपानी अधिकार्यांनी आता त्याची खोलवर चौकशी करण्यास सुरवात केली. त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या पाकीटातून टॉर्ड देशाचं ड्रायव्हींग लायसन्स आढळून आलं! त्याच्या जोडीला त्याच्या बँकेचे कागदपत्रं आणि चेकबुकही होतं.
....परंतु ज्या बँकेचं चेकबुक होतं, ती बँक अस्तित्वातच नव्हती!
एका मोठ्या कंपनीशी संलग्नं असलेल्या लहानशा कंपनीत आपण अधिकारी आहोत असं त्या माणसाने जपानी अधिकार्यांना सांगितलं. त्याच्या कामाविषयी अनेक कागदपत्रं त्याच्यापाशी उपलब्धं होते! जपानी कंपनीशी महत्वाच्या मिटींगसंदर्भात आपण टोकीयोला आल्याचा त्याने पुनरुच्चार केला! तसेच टोकीयोतील एका हॉटेलमध्ये आपण रुमचं रिझर्वेशन केल्याचंही त्याने जपानी अधिकार्यांना सांगितलं!
जपानी अधिकार्यांनी त्याच्या माहीतीची खातरजमा करण्यास सुरवात केली. त्याने सांगितलेल्या जपानी कंपनीत चौकशी केल्यावर त्यांना आणखीन एक धक्का बसला....
त्या कंपनीतील एकही माणूस त्याल ओळखत नव्हता!
त्याच्या कंपनीचं नावंही कोणाला माहीत नव्हतं..
इतकंच काय, त्याच्या टॉर्ड देशाचं नावही कोणीही ऐकलेलं नव्हतं!
हॉटेलमध्ये चौकशी केली असता त्याच्या नावाचं कोणतंही रिझर्वेशन आढळून आलं नाही!
या सर्व प्रकाराने तो माणूस मात्रं आता काहीसा वैतागला होता. आपली कोणीतरी मुद्दाम चेष्टा करण्यासाठी हा सगळा प्रकार चालवला आहे अशी त्याची ठाम समजूत झाली! हजार वर्षांची गौरवशाली परंपरा आणि वारसा असलेला आपला देश या लोकांना माहीत नाही याचंच त्याला आश्चर्यं वाटत होतं!
दुसरीकडे जपानी अधिकारी त्याच्यापेक्षाही जास्तं गोंधळून गेले होते. टॉर्ड देशाचा रहिवासी म्हणवणारा तो माणूस नेमका कोण होता आणि कुठून आला होता याचा काहीच पत्ता लागत नव्हता! अस्तित्वात नसलेल्या देशाचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि चक्कं पासपोर्ट त्याच्यापाशी होता. इतकंच नव्हे तर जपानसकट अनेक देशांत पूर्वी तो जाऊन आल्याचं सिद्ध होत होतं!
"हे बघा, तुमची चेष्टा आता पुरे झाली!" आठ तासांच्या उलटतपासणीनंतर रागावून तो जपानी अधिकार्यांना म्हणाला, "मला ताबडतोब तुमच्या वरिष्ठ अधिकार्यांना भेटायचं आहे!"
जपानी पोलीसांनी आणि कस्टम्स अधिकार्यांनी त्याला विमानतळाजवळच असलेल्या हॉटेलमध्ये हलवलं. हॉटेलमध्येच रात्रीचं जेवण आटपल्यावर १० व्या मजल्यावरील एका खोलीत त्याची रवानगी करण्यात आली. खोलीच्या बाहेर दोन पोलीस पाहर्यासाठी ठेवण्यात आले.
दुसर्या दिवशी सकाळी पोलीस आणि कस्टम अधिकारी त्याच्या चौकशीसाठी हॉटेलवर गेले. त्याच्या खोलीत प्रवेश केल्यावर सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला....
खोली पूर्णपणे रिकामी होती!
टॉर्ड देशाचा रहिवासी असलेला एकमेव नागरीक हवेत विरुन जावा तसा अदृष्यं झाला होता!
हा अकल्पीत प्रकार पाहून सगळेच बुचकळ्यात पडले. त्या खोलीतून बाहेर पडण्याची एकमेव वाट म्हणजे खोलीचा दरवाजा. परंतु दरवाज्यातून तो बाहेर पडलेला नाही हे पहार्यावर असलेल्या पोलीसांनी छातीठोकपणे सांगितलं. खोलीला एक खिडकी होती. परंतु त्या खिडकीतून बाहेर जाणं हे निव्वळ अशक्यं असल्याचं पोलीसांना तपासणीअंती आढळून आलं! खोलीची बारकाईने तपासणी करता त्याचं सर्व सामनही तिथून गायब झाल्याचं पोलीस आणि कस्टम्स अधिकार्यांच्या ध्यानात आलं!
स्वत:ला टॉर्डचा रहिवासी म्हणवणारा तो माणूस नेमका कुठून आला होता आणि हॉटेलच्या खोलीतून गायब कसा झाला याचा तपास घेण्याचा जपानी अधिकार्यांनी खूप प्रयत्नं केला, परंतु त्यांच्या हाती काहीही लागलं नाही!
त्याच्या पासपोर्टवर असलेल्या देशांकच्या इमिग्रेशन खात्याकडे चौकशी केली असता अशी कोणतीही व्यक्ती आपल्या देशात आल्याची त्यांच्याकडे नोंद नव्हती!
जपानी अधिकार्यांच्या मतानुसार टॉर्ड देशाचा रहिवासी असलेला तो माणूस निश्चीतच खरं बोलत होता! नकाशात आपला देश न दिसल्यावर तो खरोखरच आश्चर्यचकीत झाला होता. आपला देश नकाशावर कसा दिसून येत नाही याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याच्या पासपोर्टची काळजीपूर्वक तपासणी केली असता, तो पासपोर्ट नकली नसल्याचं जपानी अधिकार्यांना आढळून आलं! त्याचं ड्रायव्हींग लायसन्संही नकली नसल्याचं त्यांना आढळलं!
टॉर्डचा रहिवासी असलेला तो माणूस नेमका कुठून आला होता याविषयी अनेक तर्क मांडण्यात आले.
काही संशोधकांच्या मते, आपल्या जगाप्रमाणेच एक वेगळंच जग वेगळ्या मितीत आणि प्रतलावर अस्तित्वात आहे. त्या जगातील बरेचसे व्यवहार आपल्याप्रमाणेच होत असले, तरी काही बाबतीत फरक आहे. स्वत:ला टॉर्डचा रहिवासी म्हणवणारा हा माणूस त्या वेगळ्या समांतर जगतातून काही कारणाने आपल्या जगात आला असावा आणि परतीची वाट सापडतात अदृष्य झाला असावा!
दुसर्या एका तर्कानुसार टॉर्ड देशाचा रहिवासी म्हणवणारा हा माणूस एखाद्या गुप्त संघटनेचा सदस्यं असावा आणि कोणत्यातरी विशिष्ट कामगिरीवर त्याची जपानमध्ये पाठवणी करण्यात आली असावी! तो टॉर्डचा रहिवासी असल्याचं आणि आंडोरा देश हाच टॉर्ड असल्याचं त्याच्या मनावर ब्रेनवॉशिंग करुन बिंबवण्यात आलं असावं!
मात्रं तरीही अनेक प्रश्न अनुत्तारितच राहतात...
त्याच्याजवळचा पासपोर्ट अस्सल असल्याचं तांत्रिक तपासणीत निष्पन्ना झालं होतं. परंतु टॉर्डचा पासपोर्ट आला कुठून?
त्याच्या ड्रायव्हींग लायसन्सचं काय?
पासपोर्टवर असलेल्या इमिग्रेशनच्या शिक्क्यांचं काय?
इमिग्रेशनचे शिक्के आढळल्यावरही कोणत्याही देशात त्याच्या आगमनाचं रेकॉर्ड का नव्हतं?
हॉटेलच्या खोलीतून बाल्कनी नसताना आणि बाहेर दोन पोलीस पाहर्यावर असताना तो सामानासकट कसा गायब झाला?
टॉर्ड देशाचा रहिवासी म्हणवणारा तो माणूस होता तरी कोण?