का केला क्षत्रियांचा संहार?
कार्तवीर्य अर्जुनाच्या वधाचा बदल त्याच्या पुत्रांनी जमदग्नी मुनींचा वध करून घेतला. क्षत्रियांचे हे नीच कृत्य पाहून भगवान परशुराम प्रचंड क्रीधीत झाले आणि त्यांनी कार्तवीर्य अर्जुनाच्या सर्व पुत्रांचा वध केला. ज्या ज्या म्हणून क्षत्रिय राजांनी त्यांची साथ दिली होती, परशुरामाने त्यांचा देखील वध केला. अशा प्रकारे परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली होती.
का केला होता २१ वेळा क्षत्रियांचा संहार?
भगवान परशुरामांना भगवान विष्णूचा आठवा अवतार मानले जाते. भगवान परशुरामांच्या बाबतीत असे मानले जाते की त्यांनी तत्कालीन अन्यायी, अत्याचारी आणि निरंकुश क्षत्रियांचा २१ वेळा संपूर्ण संहार केला होता. पण आपणाला मीहिती आहे का की भगवान परशुरामांनी तसे का केले? याचे उत्तर देते एक रंजक पुराण कथा -
महिष्मती नगराचा राजा सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाच्या हैहय वंशाचा राजा कार्तवीर्य आणि राणी कौशिक यांचा पुत्र होता. सहस्त्रार्जुनाचे खरे नाव अर्जुन होते. त्याने दत्तात्रेयाला प्रसन्न करण्यासाठी घोर तपश्चर्या केली. दत्तात्रेय त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि त्याला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने १००० हातांचा आशीर्वाद प्राप्त केला. यानंतर त्याचे नाव अर्जुनावरून सहस्त्रार्जुन झाले. त्याला सहस्त्रबाहू आणि राजा कार्तविर्याचा पुत्र असल्याने कार्तेयवीर देखील म्हटले जाते.
असे म्हटले जाते की महिष्मती सम्राटाने आपल्या घमेंडीने चूर होऊन धर्माच्या सर्व सीमांचे उल्लंघन केले होते. त्याच्या अत्याचाराने आणि अनाचाराने जनता त्रस्त होऊन गेली होती. वेद - पुराण आणि धार्मिक ग्रंथाना खोटे ठरवून ब्राम्हणांचा अपमान करणे, ऋषींचे आश्रम नष्ट करणे, त्यांचा अकारण वध करणे, निर्दोष प्रजेवर निरंतर अत्याचार करणे, एवढेच नव्हे तर त्याने आपल्या मनोरंजनासाठी नशेत चूर होऊन अबला स्त्रियांचे सतीत्व भंग करण्यास देखील सुरुवात केली होती.
एकदा सहस्त्रार्जुन आपल्या संपूर्ण सेनेसह झाडे - झुडुपे जंगल तुडवत जमदग्नी ऋषींच्या आश्रमात विश्रांती घेण्यासाठी पोचला. महर्षी जमदग्नींनी त्याला आश्रमाचा अतिथी म्हणून स्वागत सत्कार करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. असे म्हणतात की जमदग्नींच्या आश्रमात देवराज इंद्राने दिलेली दिव्य गुणांची कामधेनु नावाची अद्भुत गाय होती. महर्षींनी त्या गायीच्या मदतीने काही क्षणातच बघता बघता संपूर्ण सैन्याच्या भोजनाची व्यवस्था केली. कामधेनूचे हे विलक्षण गुण बघून सहस्त्रार्जुनाला ऋषींसमोर आपले राजेशाही वैभव कमी वाटू लागले. त्याच्या मनात कामधेनु गाय मिळवण्याची लालसा उत्पन्न झाली. त्याने जमदग्निंकडे कामधेनूची मागणी केली. परंतु कामधेनु ही आश्रमाच्या पालन - पोषण यांचे एकमेव साधन आहे असे सांगून ऋषींनी ती देण्यास नकार दिला. त्यावर चिडून सहस्त्रार्जुनाने आश्रम उध्वस्त केला आणि तो कामधेनूला घेऊन जाऊ लागला. तेव्हा कामधेनु त्याच्या हातातून सुटून स्वर्गाच्या दिशेने निघून गेली.
जेव्हा परशुराम आश्रमात पोचले तेव्हा त्यांच्या मातेने त्यांना सारा वृत्तांत सविस्तर सांगितला. माता - पित्याचा अपमान आणि आश्रमाची अवस्था बघून परशुराम प्रचंड चिडले. पराक्रमी परशुरामाने त्याक्षणीच दुराचारी सहस्त्रार्जुन आणि त्याच्या संपूर्ण सैन्याचा नाश करण्याचा संकल्प केला. आपले परशू घेऊन परशुराम महिष्मती नगरात पोचले. तिथे सहस्त्रार्जुन आणि परशुराम यांच्यात युद्ध झाले. भगवान परशुरामांनी दुष्ट सहस्त्रार्जुनाचे १ हजार हात आणि शरीर परशूने कापून त्याचा वध केला.
ऋषि जमदग्नि आणि परशुराम
सहस्त्रार्जुनाच्या वधानंतर आपल्या पित्याच्या आज्ञेवरून या वधाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी परशुराम तीर्थयात्रेला निघून गेले. ही संधी साधून सहस्त्रार्जुनाच्या पुत्रांनी अपल्या सहयोगी क्षत्रियांची मदत घेतली आणि महर्षी जमदग्नी यांच्या आश्रमातच त्यांचे शीर कापून हत्या केली. त्यांनी आश्रमातील सर्व ऋषींची हत्या केली आणि आश्रम जाळून टाकला. माता रेणुकाने सहाय्यासाठी आपला पुत्र परशुरामाच्या नावाने विलाप केला. परशुराम मातेची हाक ऐकून आश्रमात पोचले, तेव्हा मातेला शोक करताना पहिले, मातेच्या जवळच जमदग्नी ऋषींचे शीर पडलेले होते. त्यांच्या शरीरावर २१ घाव होते.
हे पाहून परशुराम प्रचंड क्रोधीत झाले आणि त्यांनी शपथ घेतली की केवळ हैहय वंशच नव्हे तर त्यांना सहाय्य करणाऱ्या समस्त क्षत्रिय वंशांचा २१ वेळा संहार करून पृथ्वी निःक्षत्रिय करेन. पुराणांमध्ये उल्लेख आहे की परशुरामाने आपली ही शपथ पूर्ण देखील केली.
पुराणांमध्ये उल्लेख आहे की भगवान परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली आणि त्यांच्या रक्ताने समन्तपंचक क्षेत्रातील ५ सरोवाराना भरून आपला संकल्प पूर्ण केला. असे म्हटले जाते की महर्षी ऋचिक यांनी स्वतः प्रकट होऊन परशुरामाला असे घोर कृत्य करण्यापासून रोखले होते, तेव्हा कुठे कसातरी क्षत्रियांचा पृथ्वी वरचा हा संहार थांबला. त्यानंतर परशुरामाने आपल्या पितरांची श्राद्ध केली आणि त्यांच्या आज्ञेनुसार अश्वमेध आणि विश्वजीत यज्ञ केला.