महाभारतातील शकुंतला - भाग २
दुष्यंत शिकारीसाठी ससैन्य व सेवक, मंत्री यांसह आला होता. आश्रमाशी पोचल्यावर सैन्य व सेनापति यांना बाहेर ठेवून अमात्य व पुरोहितासह तॊ आश्रमात शिरला. त्याच्या व शकुंतलेच्या प्रथम भेटीला त्यामुळे अनेक साक्षीदार होते. दुष्यंताची भेट झाल्यावर त्याचे स्वागत करून मग शकुंतलेने आपला सर्व पूर्ववृत्तान्त त्याला सांगितला. दुष्यंताला शकुंतलेचे आकर्षण वाटून त्याने तिला मागणी घातली व कण्वाच्या परत येण्याची वाट न पाहता तिला वश करून घेतली. यावेळी दुष्यंताने अनेक मतलबी युक्तिवाद केले पण ’आपणच आपले बंधु-आप्तेष्ट असतो व आपल्या आयुष्याचा मार्ग आपणच ठरवायचा असतो’ हे एक महान सत्यहि तिला सांगितले! कण्वाची वाट न बघता तुझा निर्णय तूच घे असे तिला सुचवले. शकुंतला अल्लड होती म्हणून ती दुष्यंताच्या शब्दजालात फसली अशी आपली समजूत असते पण महाभारत तसे म्हणत नाही! तिने गांधर्वविधीने दुष्यंताला वरण्याचा निर्णय विचारपूर्वकच घेतला. दुसरा कोणी आपल्या भेटीला साक्षी नाही याची तिने दुष्यंताला स्पष्टपणे जाणीव करून दिली. तुझा अंतरात्माच साक्ष आहे असे बजावून तिने आपली अट त्याला स्पष्टपणे सांगितली कीं ’मला होणारा पुत्र युवराज व तुझ्या पश्चात राजा झाला पाहिजे.’ दुष्यंताने ही अट कसलाही विचार न करता खुशाल मान्य केली व मी तुला नगरांत घेऊन जाईन असे स्पष्ट आश्वासनही दिले. कार्यभाग झाल्यावर मात्र, कण्व काय म्हणेल या भीतीने तो एकटाच आपल्या नगराला परत गेला. कण्वाने परत आल्यावर मात्र रागावण्याऐवजी शकुंतलेला दुष्यंत हा योग्यच वर आहे हे मान्य केले. शकुंतलेला, तिच्या इच्छेप्रमाणे, ’पुरुवंशातील राजे नित्य धर्मशील रहावे’ असा वर दिला.
भरताचा जन्म, दुष्यंताच्या (प्रथम) आश्रमभेटीनंतर तीन वर्षांनी झाला. कण्वाने हा दुष्यंताचा पुत्र आहे असे नि:शंकपणे मानले व त्याचे सर्व संस्कार केले त्याअर्थी या तीन वर्षांच्या काळात दुष्यंत वरचेवर आश्रमात येत-जात असला पाहिजे हे उघड आहे. प्रत्यक्ष पुत्रजन्मापूर्वी तो, काही कारणामुळे, यायचा थांबला असावा व त्याने भरताला पाहिले नसावे वा त्याच्या जन्माची त्याला कदाचित वार्ता नसावी. महाभारतात स्पष्टपणे सांगितलेले नाही. भरत सहा वर्षांचा झाला. कण्वाने त्याचे संस्कार केले. तो कांतिमान व सामर्थ्यवान झाला. अद्याप दुष्यंताकडून शकुंतलेला, कबूल केल्याप्रमाणे, बोलावणे आले नव्हते.दुष्यंत शांतपणे शकुंतलेला विसरून गेला होता! आतां या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे या कारणास्तव कण्वाने शकुंतलेला व भरताला दुष्यंताकडे पाठवून दिले! नित्याच्या परिचयाच्या वनातून शकुंतला जात होती. (अ.७४-श्लोक १४-१६). बहुधा, दुष्यंताबरोबर अनेकवार हिंडून हा परिचय झाला असणार. दुष्यंताच्या दरबारात शकुंतला व भरत उपस्थित झाल्यावर काय झाले? महाभारतातील या भेटीचे वर्णन खूपच सुंदर आहे. ते पुढील भागात पाहू.