कृष्णशिष्टाई - भाग ३
धृतराष्ट्राने संजयाला पांडवांकडे जाण्यापूर्वी स्वत;चे विचार ऐकवले. त्यामध्ये त्याने सर्व प्रमुख पांडववीरांची त्याला वाटणारी भीति व धाक व्यक्त केला. कृष्णाने पांडवांच्या हितासाठीच पूर्वी शिशुपालाचा वध केला असे म्हटले. खरे तर तो काही पांडवांचा वैरी नव्हता, कृष्णाचा वैरी. तो जिवंत असता तर कौरवांना मिळाला असता असा धृतराष्ट्राचा अभिप्राय दिसतो. युद्धापूर्वीच पांडवांचे राज्य त्याना द्यावे हेच मला योग्य वाटते. तेव्हा संजया तू पांडवांना व कृष्णाला भेट व धृतराष्ट्र पांडवांशी सख्य करू इच्छितो असेच त्याना सांग, जे पांडवांचा क्रोध वाढवणार नाही वा युद्धाला कारण होणार नाही असेच समयोचित भाषण सभेत तू कर, असे धृतराष्ट्राने त्याला सांगितले. पण हे सर्व खोटे व वरवरचे होते. त्याला स्पष्ट दिसत होते कीं दुर्योधन, दु:शासन, कर्ण व शकुनि पांडवांचे राज्य परत देण्यास मुळीच तयार नाहीत व युद्धाच्या भीतीने तर नक्कीच नाहीत. मग संजयाला पाठवण्य़ात व मवाळपणे बोल असे त्याला सांगण्यात त्याचा खरा हेतु काय होता? पांडवसभेतील संजयाच्या भाषणात तो उघड झाला!
पांडवानी आपला मुक्काम विराटाच्या राज्यातील उपप्लव्य गावी ठेवला होता व अनेक राजे सैन्यासह तेथे जमले होते. संजय पांडवाना भेटला. युधिष्ठिराने हस्तिनापुरातील सर्वांचे बारकाईने कुशल विचारले. त्यात अश्वत्थामा, कृप, द्रोण आमच्यावर दोषारोप तर करीत नाहीत ना असेहि विचारले. संजयाने सुरवातीलाच सर्वांच्या हितासाठी तूच सलोखा कर असे युधिष्ठिराला विनवले. दरबारात सर्वाना उद्देशून बोलताना धृतराष्ट्र सलोखा करू इच्छितो असेच पुन्हा म्हटले. मात्र खुलासेवार बोलताना, तुम्ही सर्व शत्रूना मारून जिवंत राहिलात तरी ज्ञातिवधाचे दु:ख भोगत रहाल पण खरे तर भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा, कर्ण, शल्य व इतर अनेक राजे यांचेविरुद्ध तुम्ही कसे जिंकाल असेहि म्हटले. युधिष्ठिराने जबाब दिला की युद्धाशिवाय आमचा हेतु साध्य झाला तर युद्ध कोणाला हवे आहे? पूर्वीचे सर्व विसरून मी सलोखा करीन पण इंद्रप्रस्थात माझे राज्य असूदे व हस्तिनापुरात दुर्योधनाचे! यावर बोलताना संजयाचा व पर्यायाने धृतराष्ट्राच्या मनातील खरा हेतु बाहेर पडला. संजय युधिष्ठिराला म्हणाला की युद्धाशिवाय जर दुर्योधन तुला राज्य देत नसेल तर तुम्ही वृष्णींच्या वा विराटाच्या राज्यात भीक मागून रहा पण राज्यासाठी युद्ध करू नका! जर तुम्ही राज्यासाठी ज्ञातिवधाला तयार होणार असाल तर दुर्योधनाने तुम्हाला वनात पाठवले हा धर्मच झाला म्हटले पाहिजे! तुम्हाला युद्धच पाहिजे होते तर द्यूत झाले तेव्हाच करणे योग्य होते. आता युद्ध केलेत तर भीष्मासह सर्वांच्या वधाचे पातक लागेल म्हणून युद्ध करू नको! युद्ध झाले तर त्याचा सर्व दोष पांडवाच्या माथी मारण्याचा धृतराष्ट्राचा कुटिल डाव स्पष्ट झाला!
युधिष्ठिराने व कृष्णानेहि जबाबात स्पष्ट सांगितले की राज्य देत असाल तरच युद्ध टळेल. अखेर कृष्णाने सामोपचाराचा अखेरचा प्रयत्न म्हणून स्वत: कौरवांकडे शिष्टाईसाठी जाण्याची तयारी दर्शवली. युधिष्टिराने संजयाला निरोप दिला, सर्वांचे कुशल पुन्हा विचारले व खुद्द दुर्योधनाला अखेरचा निरोप दिला की पांडव युद्धालाहि तयार आहेत व शांतीलाहि. व शांती रहावी यासाठी राज्याचा एक तुकडा, फक्त पांच गावे, आम्हाला दे व येथेच युद्धाचा शेवट होऊदे! मात्र तू जाणतोसच की मी शांतीला तयार असलो तरी युद्धालाहि समर्थ आहें! युधिष्ठिराचा सर्व सद्भाव, वडिलांचा मान राखण्याची वृत्ति त्याचबरोअर ठाम निश्चय हीं या निरोपातून स्पष्ट दिसून येतात. पांच गावांवर समाधान मानण्य़ाची तयारी दाखवून धृतराष्ट्राचा कुटिल डाव त्याने बरोबर उलटवला व युद्ध झाले तर कौरवच जबाबदार राहतील हे स्पष्ट केले. संजय परत गेल्यावर काय झाले ते पुढील भागात वाचा.