Get it on Google Play
Download on the App Store

महाभारतातील कर्णकथा - भाग ७

राजसूय यज्ञ आटपल्यावर काही काळ कॊरव इंद्रप्रस्थात राहून मग हस्तिनापुराला परत आले. पांडवांचा उत्कर्ष व वैभव सहन न होऊन, त्यांचा नाश करण्यासाठी दुर्योधनाने शकुनीच्या सल्ल्याने द्यूताचा बेत ठरवला व बर्‍याच प्रयत्नांनी व युक्तिवादाने तो धृतराष्ट्राच्या गळी उतरवला. हा बेत ठरवण्यात कर्णाचा काही सहभाग नव्हता. युधिष्ठिर पांडवांसह द्यूतासाठी हस्तिनापुराला आल्यावर ज्यांना भेटला त्यांच्या नामावळीत कर्णाचे नाव येते. द्यूतसभेत अर्थातच तो उपस्थित होताच. द्यूतामध्ये युधिष्ठिर सर्वस्व हरून भावांना व नंतर स्वत:लाही पणाला लावून हरला. नंतर शकुनीच्या चिथावणीने त्याने द्रौपदीला पणाला लावली. त्यावेळी दु:शासनाला व कर्णाला अपार आनंद झाला असा त्याचा प्रथम उल्लेख द्यूतप्रकरणात येतो. हाही पण युधिष्ठिर हरला. दुर्योधनाने प्रथम दूत प्रातिकामीला द्रौपदीला दरबारात घेऊन येण्यास पाठवले. तिने प्रश्न उभा केला कीं युधिष्ठिर प्रथम स्वत:ला पणाला लावून हरला व मग मला पणाला लावले काय? तिने प्रातिकामीला दाद दिली नाही तेव्हा दु:शासन स्वत:च गेला व त्याने तिला बळाने ओढून आणले. दरबारातहि तिने तोच प्रश्न पुन्हा विचारला. पांडव काहीच बोलूं वा करूं शकत नव्हते. दु:शासनाने तिला जोरात हिसडले व ’दासी’ असे संबोधिलें. तें ऐकून कर्ण आनंदाने बेहोष झाला! (शब्दयोजना माझी नव्हे, महाभारताची!) त्याने दु:शासनाला शाबासकी दिली. या प्रसंगी, येथपासून, कर्णाचे सर्व वर्तन अति अनुचित व बेतालपणाचे झाले.
द्रौपदीच्या प्रश्नावर भीष्मही काही उत्तर देऊ शकले नाहीत. ’शकुनीने आपली वंचना केली असे युधिष्ठिर म्हणत नाही’ एवढेच त्यानी दाखवून दिले. भीमाने युधिष्ठिराची कठोर निंदा केली व त्याचे हातच जाळून टाकण्याची इच्छा व्यक्त केली. अर्जुनाने त्याला आवरून धरले. द्रौपदीने पुन्हापुन्हा आपला प्रश्न विचारला. कोणीहि उत्तर देईना. अखेर विकर्णाने तिच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला, सर्व उपस्थितांची निंदा केली व युधिष्ठिर प्रथम स्वत:ला पणाला लावून हरला व नंतर शकुनीच्या चिथावणीने त्याने द्रौपदीला पणाला लावली. ती पांचांची पत्नी, तिला पणाला लावण्याचा युधिष्ठिराला काय अधिकार होता? त्यामुळे ती जिंकली गेलेली नाहीच असे स्पष्ट मत दिले. यावर इतर कोणी काही बोलण्याआधीच, कर्णाने क्रोधाने खवळून जाऊन, त्याचा प्रतिवाद केला. ’द्रौपदीने पुन्हापुन्हा डिंवचूनहि पांडव काहीच बोलत नाहीत. द्रौपदीला आम्ही धर्मानेच जिंकिले आहे. तूं लहान आहेस, तुला कळत नाही, युधिष्ठिर सर्वस्व हरला त्यात द्रौपदीचा समावेश नाही काय? द्रौपदी आम्ही जिंकली असे शकुनि ओरडून म्हणाला त्यालाहि पांडवांनी कसलाहि विरोध केला नाही मग ती जिंकली गेली नाही असे तुला कसे काय वाटते?’ अशी त्याची कर्णाने हेटाळणी केली. द्रौपदीला एकवस्त्रा असताना सभेत ओढून आणली याचेहि त्याने, निर्लज्जपणे समर्थन केले व ते करताना त्याच्या मनातील सर्व विखार बाहेर पडला. ’द्रौपदी ही पांचाची पत्नी तेव्हां ती वेश्येसमानच आहे व आतां तिला आम्ही जिंकले आहे तेव्हां ती एकवस्त्रा असली काय वा विवस्त्रा असली काय सारखेच,’ असे म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली. ’हा विकर्ण पोरकट आहे, त्याच्याकडे लक्ष देऊं नको, दु:शासना, तूं खुशाल पांडवांची व द्रौपदीची वस्त्रे हिसकावून घे’ अशी त्याने दु:शासनाला चिथावणी दिली. कर्णाबद्दल प्रेम वा आदर वाटणार्‍या लेखकांनाही त्याच्या या प्रसंगीच्या सर्वस्वी असभ्य व अनुचित वर्तनाचे समर्थन करणे शक्य नाही. वास्तविक हा कुरुकुळाचा अंतर्गत प्रश्न होता व पांचालांच्या कन्येच्या प्रतिष्ठेचाहि होता. याचे परिणाम फार दूरवर पोचू शकणार होते. दुर्योधनाचा मित्र व हितकर्ता या नात्यानेहि त्याला संयम बाळगण्यास सांगणे हे कर्णाला शोभून दिसले असते. पण त्याचा तोल पूर्णपणे सुटला. द्रौपदीचा प्रश्न भीष्माने व खुद्द दुर्योधनानेहि पांडवांवरच सोपवला व पांडव म्हणतील ते मी मान्य करीन असे त्याने म्हटले. दुर्योधन थोडातरी ताळ्यावर होता! कर्णाने पुन्हा, पांडवांच्या उत्तरासाठी न थांबतां, खुद्द द्रौपदीलाच ऐकवले की ’तूं दासी झालीस, आतां दुर्योधनाच्या अंत:पुरात जा व त्याच्या परिवाराची सेवा कर!’
अर्जुनाने बोलावयास सुरवात केली कीं युधिष्ठिर स्वत:ला पणाला लावून हरल्यावर तो कोणाचा स्वामी उरला?
आता द्रौपदी जिंकली गेलेली नाही असे दुर्योधनाला मान्य करावे लागणार होते. पण एव्हाना धृतराष्ट्राला बहुधा, द्रौपदीच्या झालेल्या घोर अपमानाचे दुरगामी परिणाम ’दिसू’ लागले असावे. त्याने अधिक वाट न पाहतां द्रौपदीला वर माग म्हटले, तिने फक्त, सर्व पांडवाना त्यांच्या शस्त्रास्त्रांसह मुक्त करून घेतले पण स्वत:ला मुक्त करण्याची मागणी केलीच नाही! ती दासी झाली कीं नाही हा प्रश्न अनुत्तरितच राहिला व कर्णासकट कोणीच तो पुन्हा उपस्थित केला नाही! कर्णाने अखेर द्रौपदीची स्तुति केली कीं पांडवांना संकटसागरातून तारून नेणारी ती नौकाच ठरली!
युधिष्ठिराने इंद्रप्रस्थाला परत जाण्याची परवानगी मागितली तेव्हा मात्र धृतराष्ट्राने द्यूताचा सर्व व्यावहारिक परिणाम पुसून टाकून त्याला सर्व वैभवासह परत जाण्यास सांगितले. पांडव व द्रौपदी निघून गेल्यावर दुर्योधन, दु:शासन व कर्ण यांचे डोळे उघडले. पांडव आपला सूड उगवतील या भीतीने त्यांची गाळण उडाली! त्यांनी पुन्हा नवीन बेत ठरवून धृतराष्ट्राच्या तो गळीं उतरवला व वाटेतूनच पांडवाना परत बोलावले व पुन्हा एकच पण लावून द्यूत खेळण्यास बसवले.
वनवास-अद्न्यातवासाचा पण उच्चारताना आम्ही हरलो तर आम्ही वनात जाऊ असे शकुनि म्हणाला. कौरव हरते तर शकुनि व कर्ण दुर्योधनाबरोबर वनात जाणार होते काय? हरण्याची त्याना शंकाच नव्हती! जर हरले असते तर कर्ण वनात गेला असता काय याबद्दल मला मात्र शंका आहे. ’मी काही कौरव नाही, मी फक्त प्रेक्षक आहे.’ असेच तो बहुधा म्हणाला असता!
युधिष्ठिर हरलाच, त्यामुळे प्रश्नच सरला.
पांडव वनात जाताना त्यानी व्यक्त केलेला त्वेष, केलेल्या सूड उगवण्याच्या प्रतिद्न्या यामुळे कौरवांबरोबरच कर्णाचीहि घाबरगुंडी उडाली. कोणतेहि धैर्य वा स्वाभिमान न दाखवता वा दुर्योधनाला धीर न देता, तो, दुर्योधन व दु:शासनाबरोबर, ज्याची तो नित्य हेटाळणी वा कुचेष्टा करी, त्या द्रोणाला शरण गेला! द्रोणाने मी पूर्णत: तुमच्या पक्षाला राहीन असे आश्वासन दिले.
या सर्व प्रसंगात कर्णाचे वर्णन महाभारतकारानी खलपुरुष असेच केले आहे व ते नजरेआड करणे वा पुसून टाकणे वा त्याच्या वर्तनाचे समर्थन करणे अशक्य आहे.
यापुढील कर्णकथा पुढील भागात.