कृष्ण-कर्ण संवाद - भाग ३
मुळात या तथाकथित कृष्ण-कर्ण संवादाचा उल्लेखहि महाभारतात सरळ निवेदन-रूपाने आलेला नाहीं. महाभारत म्हणते, कृष्णाने कर्णाला परत जाताना आपल्या रथावर घेतले होते वत्यांची दीर्घ चर्चा झाली हे कळल्यामुळे, (कदाचित काळजी वाटून), धृतराष्ट्राने 'त्यांचे काय बोलणे झाले?' असे संजयाला विचारले व मग संजयाने ते सर्व धृतराष्ट्राला सांगितले! हे अशक्यच वाटते! कुंतीने आयुष्यभर जपलेले गुपित तिने, नाइलाजाने, कृष्णाला आणि कृष्णाने ते कर्णाला सांगितले असे घटकाभर मानले तरी ते संजयाला कसे कळणार? आणि संजयाला कळून त्याने धृतराष्ट्राला सांगितले तर मग ते फुटलेच कीं व मग अर्थातच दुर्योधन-भीष्म-द्रोणापासून युयुत्सुपर्यंत सर्वच कौरवांना कळले म्हटले पाहिजे! एकट्या युधिष्ठिरापासूनच ते गुह्य राहिले? हे अतर्क्यच आहे. तेव्हां हा संजय-धृतराष्ट्र संवाद प्रक्षिप्त मानला पाहिजे. कृष्ण-कर्ण भेट होणे व कृष्णाने युद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न करणे त्याच्या शिष्टाईच्या भूमिकेशी सुसंगत आहे. मात्र हा प्रसंग (मागाहून केव्हा तरी, कदाचित कृष्ण माहात्म्य वाढवण्यासाठी) महाभारतात शिरला तेव्हा तो सरळ निवेदन रूपाने न येता, गफलतीने, संजय-धृतराष्ट्र संवाद रूपाने शिरला! (शिष्टाई संपवून परत जाण्यापूर्वी कृष्ण कुंतीला भेटला तेव्हां तिने त्याचेबरोबर आपल्या मुलांना ‘आतां सर्व शक्तीनिशी युद्ध करा, तेच क्षत्रिय या नात्याने तुमचे कर्तव्य आहे’ असा स्पष्ट आदेश दिला. हा विदुराघरी झालेला संवादहि धृतराष्ट्राला कळला व त्याने पुन्हा एकदा दुर्योधनाला उपदेश केला असा उल्लेख आहे! हे धृतराष्ट्राला कसे कळले याचा मात्र काही खुलासा केलेला नाही.) मग खरोखर काय घडले?