Get it on Google Play
Download on the App Store

अन्नप्राशन संस्कार (बोळवण)

बाळाला जेव्हा पेय पदार्थ, दूध यांच्या व्यतिरिक्त अन्न देण्यास प्रारंभ केला जातो, तेव्हा हा शुभारंभ यज्ञीय वातावरणात आणि धार्मिक स्वरुपात करण्यात येतो. या प्रक्रियेलाच अन्नप्राशन संस्कार असे म्हणतात. बाळाला दात येणे म्हणजे त्याला पेय व्यतिरिक्त खाद्य पदार्थ देता येण्याच्या पत्रातेचा संकेत आहे. त्याप्रमाणे हा संस्कार सहाव्या महिन्याच्या जवळपास करण्यात येतो. अन्नाचा शरीराशी अगदी जवळचा संबंध आहे. मनुष्य आणि प्राणी यांचा बहुतेकसा वेळ आहार व्यवस्थेतच जातो. त्याचे योग्य ते महत्त्व ओळखून त्याला सुसंस्कार युक्त बनवून घेण्याचा प्रयत्न करणे योग्यच आहे.

अन्नप्राशन संस्कारात देखील असेच होते. चांगली सुरुवात म्हणजेच अर्धी सफलता. तेव्हा बाळाच्या अन्नाहाराच्या क्रमाला श्रेष्ठात श्रेष्ठ संस्कारयुक्त वातावरणात करणेच अभिष्ट आहे. आपली परंपरा अशीच अही की भोजनाचे ताट समोर येताच अगोदर त्यातील मुंगी, पक्षी, कुत्रा इत्यादींचा भाग बाजूला काढून आहुती देण्यात येते. भोजन ईश्वराला मनोमन अर्पण करून किंवा अग्नीत आहुती देवून मगच ग्रहण केले जाते. होळीचे पर्व तर याच प्रयोजनासाठी आहे. नवीन पिकापैकी एकही दाणा मुखात घेण्या अगोदर आधी त्याची आहुती होलिका यज्ञात देण्यात येते. तेव्हाच ते खाण्याचा अधिकार प्राप्त होतो. शेतकरी जेव्हा कापणी, झोडपणी वगैरे उरकून धान्याची राशी तयार करतो, तेव्हा आधी त्यातील एक टोपलीभर धान्य धर्म कार्यासाठी बाहेर काढून मगच उरलेले धान्य घरी घेऊन जातो. त्यागाच्या संस्कारासोबत अन्नाचा प्रयोग करण्याच्या दृष्टीनेच धर्मघट-अन्नघट ठेवण्याची प्रथा प्रचलित आहे. भोजनाच्या पूर्वी बलिवैश्व देव प्रक्रिया देखील अन्नाला यज्ञीय संस्कार देण्यासाठी करण्यात येते.