Get it on Google Play
Download on the App Store

तांत्रिक आणि राजकीय बाबी

हा कालवा बांधण्याची कल्पना जरी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मांडण्यात येत होती तरी तिला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. एरी सरोवरापासून अल्बनीपर्यंत ६०० फुटांचा उतार होता. मालवाहतुकीचे कालवे फारसे उतरते असत नाहीत कारण पाणी वाहून नेणे हा त्यांचा उद्देशच नसतो. त्यामुळे कालवा वाटेत उतरवण्यासाठी Locks बनवावी लागतात. त्या काळच्या बांधकाम साहित्याच्या व तांत्रिक प्रगतीच्या मर्यादांमुळे एका lock मध्ये फार तर १२-१३ फूट उतार ठेवता येत होता. त्यामुळे ५०-६० locks बांधावीं लागणार होतीं व खर्च खूप येणार होता, १७८४ पासून मांडले गेलेल्या या कालव्याचा जोरदार प्रचार जेसे हॉवले नावाच्या एका कर्जबाजारी होऊन तुरुंगात पडलेल्या व्यापार्याने दीर्घकाळ चालवला. मग जोसेफ हेलिकॉट नावाच्या जमिनी विकण्याचा व्यापार करणार्याने त्याचा पाठपुरावा चालवला कारण ॲपेलेशियन पर्वतापलीकडच्या मुलखातील त्याच्या जमिनीना भाव मिळत नव्हता! प्रेसिडेंट जेफरसनने कालव्याची कल्पना नाकारली होती पण न्यूयॉर्क राज्याचा गव्हर्नर क्लिंटन याला त्यातून न्यूयॉर्क राज्य व बंदर यांच्या विकासाचा मार्ग दिसत होता. त्याने कालव्याचा जोरदार पुरस्कार चालवला. मात्र केंद्र सरकारने या कालव्याचा खर्च करण्याला इतर राज्यांचा साहजिकच विरोध होता. अखेर न्यूयॉर्कमधील व्यापारी वगैरेंच्या दबावामुळे न्यूयॉर्क राज्याने १८१७ साली ७० लाख डॉलर खर्च करून हा कालवा स्वत:च बांधण्याचे ठरवले. विरोधकांनी या कालव्याचे नाव क्लिंटनचा खंदक असे ठेवले होते. ३६३ मैल लांबीचा हा कालवा बफेलो पासून अल्बनी पर्यंत जाणार होता. कालव्याला नावापुरताच उतार ठेवावयाचा होता. तरीहि काही पाणी सारखे वाहून जाणारच होते त्यासाठीच कालवा एरी सरोवरापासून सुरू व्हायचा होता. एरी सरोवराचे पाणी नायगारा नदीतून वाहत जाऊन नायगारा धबधब्यातून पडून पुढे नायगारा नदीतून पुढच्या ऑंटारिओ सरोवराकडे वाहत जाते हे आपणास माहीत असेल. त्यातलेच थोडे पाणी या कालव्यातून वाहणार होते. कालवा ४० फूट रुंद व चार फूट खोल करावयाचा होता. खोदलेली माती काठावर रचून बनणार्या बंधार्यावर रुंदशी पायवाट बनवायची होती. पाण्याखाली फक्त साडेतीन फूट जाणारी सपाट तळाची मोठी होडी घोड्यांच्या सहायाने या वाटेवरून ओढली जाणार होती. कालव्याच्या एकाच बाजूस अशी वाट असल्यामुळे दोन बोटी समोरासमोर आल्या तर एकमेकांना ओलांडून जाणे हे एक दिव्यच असे. कालव्याच्या बाजू दगडात बांधून काढल्या पण तळाला मात्र घट्ट चिखलाचेच आवरण होते. दगडी बांधकामावर शेकडो जर्मन गवंड्यांनी काम केले आनि नंतर त्यानीच न्यूयॉर्कमधील अनेक प्रसिद्ध इमारती बांधल्या. १८१७ मध्ये काम सुरू झाले पण दोन वर्षात फक्त १५ मैल काम झाले. या वेगाने काम पुरे होण्यास ३० वर्षे लागली असती! मुख्य अडचण वाटेत येणारी अनंत मोठी झाडे काढणे ही होती. मात्र कारागिरांनी नवनवीन युक्त्या योजल्या व झाडाचे बुधे उपटण्यासाठी साधी पण उपयुक्त यंत्रे बनवलीं. मग कामाचा वेग वाढला पण मजुरांचा तुटवडा, मार्गावरील बर्याच भागांतील रोगट हवामान या अडचणी होत्याच. मुख्य अडचण तज्ञ व्यक्तींची होती. कोणाही थोडेफार शिकलेल्या माणसाला मुकादम, सर्व्हेअर बनवावे लागे. अमेरिकेत तेव्हां तांत्रिक शिक्षणाची कोणतीहि सोय सुरू झालेली नव्हती त्यामुळे इंग्लंड वा युरोपमध्ये थोडाफार अनुभव घेतलेल्या माणसांवरच विसंबून रहावें लागे. याची मुख्य अडचण locks बांधण्यामध्ये येत होती. मात्र अनुभवातून शिकत अनेकांनी या सर्व अडचणींवर मात करीत प्रावीण्य मिळवले आणि मोठे नावहि कमावले. या सर्व अवघड कामांत दोन मुख्य गोष्टींचा उल्लेख करणार आहें. एक म्हणजे, अनेक ठिकाणी कालवा वाटेत आडव्या येणार्या नद्या, ओढे ओलांडून पलीकडे नेण्यासाठी मोठे पूल बांधावे लागले. अशा पुलावरून वाहने नव्हे तर कालव्याचे पाणी जावयाचे होते. पूर्वानुभव नसूनहि असे अनेक लहान मोठे पूल बांधले गेले. दुसरी गोष्ट म्हणजे एकेरी लॉक्स अनेक झालीं पण बफेलोपासून जवळच, ज्या कड्यावरून नायगारा धबधबा उडी मारतो त्याच कड्याच्या पूर्वेकडील भागावरून कालवा अल्बनीकडे नेण्यासाठी खाली उतरवावयाचा होता. त्यासाठी एकापुढे एक अशीं ५-६ Locks बांधणे आवश्यक होते. मोठ्या कष्टाने सुरुंगानी कडा फोडून काढून व अतिशय कौशल्याने दगडी बांधकाम करून तीं बांधलीं गेलीं. तेथे या कालव्यावरच्या मालवाहतुकीचे एक जमिनीवरचे बंदरच बनले व त्याचे नावच Lockport झाले. अजूनहि ते शहर त्याच नावाने अस्तित्वात आहे व त्याचे जवळच जुनी व मागाहून नव्याने बांधलेली लॉक्सहि आहेत. १८२० साली कालव्याचा मधला भाग पुरा झाला व लगेच उपयोगी ठरू लागला. सेप्टेंबर १८२३ मध्ये २५० मैलांचा अल्बनी येथे हडसन नदीला मिळणारा पूर्व भागहि समारंभपूर्वक खुला झाला. त्याच दिवशी अल्बनी पासून उत्तरेला जाणारा ६४ मैलाचा आणखी एक कालवाही सुरू झाला. १८२५ साली सर्व काम पुरे झाले. सर्व राज्यभर अनेक समारंभ झाले. मुख्य म्हणजे खुद्द गव्हर्नर क्लिंटन आणि पाहुणे, यानी १० दहा दिवस बोटीतून बफेलो पासून न्यूयॉर्कपर्यंत प्रवास केला आणि अशक्य वाटलेले स्वप्न प्रत्यक्षात आणले. एरी सरोवराचे पाणी समुद्रात आणि समुद्राचे पाणी सरोवरात टाकण्यात आले! काशीची गंगा रामेश्वरास पोचली!