Get it on Google Play
Download on the App Store

भाग २


"पंगू लंघयते गिरीं" असे संस्कृत वाचन लहानपणी शुकाने घोकले होते. टाकीचे घाव पडून दगडातून सुद्धा देव निर्माण होतो हे संस्कार त्याच्यावर केले गेले होते पण प्रत्यक्षांत आपण सुद्धा काही अजब, अशक्य असे काही करू असे त्याला वाटले नव्हते. पण आज तो दिवस, नाही, ती रात्र प्रकट झाली होती. गुरु रक्तसंभवाच्या प्रति शुकाच्या मनात आज नेहमीपेक्षा जास्त आदर निर्माण झाला होता. "गुरु रक्तसंभवना तुझ्या आदराची गरज नाही" देवी विद्याने त्याला सांगितले होते. "सूर्य आकाशांत आहे म्हणून आम्ही जिवंत असलो तरी आमच्या आदर किंवा अर्घ्याची गरज किंवा/अपेक्षा सूर्याला नसते. हिमालयाला पाहून आमच्या सारखे तुच्छ प्राणी तोंडात बोटे घालतील पण हिमालयाला आमच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नसते." देवी विद्याने त्याला पहिल्याच दिवशी सांगितले होते. जसे जसे दिवस गेले तसे तसे शुकाला त्या शब्दांचा अर्थ सुद्धा समजत गेला.

गुरु रक्तसंभव सह्याद्रीच्या कुशीतील एका निर्जन आणि कालौघात विस्मृतीत गेलेल्या एका अत्यंतजुनाट आणि ओसाड गावांत आपली शिष्य विद्या सोबत राहत होते. तिथे जायचा रास्ता आपल्याला कसा सापडला हेच शुकाला आठवत नव्हते. आपण का आलो फक्त हेच त्याच्या मनावर कोरले गेले होते. शुक उपस्थित झाला आणि गुरुनी चेहेऱ्यावर काहीही भाव दाखवले नाहीत. विद्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या किंवा कदाचित ते भस्माचे पट्टेही असतील. शुक इतका घाबरून गेला होता कि त्याला नक्की सगळे आठवत सुद्धा नव्हते. जंगलांत कंदमुळे शोधणाऱ्या मुलाच्या हाती रत्नांनी भरलेला खजाना उत्पन्न व्हावा असेच काही घडले होते.

शुकाला तो दिवस आजही आठवत होता. वेळ संध्याकाळची होती, सूर्याचे लालसर किरण क्षितिजावर रांगोळी टाकत होते. एका भग्न घरांत गुरु रक्तसंभव उग्र मुद्रेत ध्यानस्त बसले होते. बाजूला त्यांची शिष्या श्वेत रंगाचे विद्या एकवस्त्र परिधान करून उभी होती. गुरु साक्षांत क्षितिजावरचे तप्त सूर्य वाटत होते तर त्याच्या बाजूला फुलाप्रमाणे कोमल आणि श्वेतवर्णीय विद्या चंद्रा प्रमाणे भासत होती. शुकाचा घास वाटचालीची दाटून आला होता. "गुरु देव" इतके शब्द तोंडातून येऊन त्याच्या डोळ्यापुढे अंधार दाटला.

जाग आली तेंव्हा के घुबड रडण्याचा आवाज येत होता. रात्र पडली होती. तो ओशाळुन उठला. गुरु मिळून सुद्धा आपण असे घाबरून बेशुद्ध पडलो ह्याची लाज वाटली.  गुरु रक्तसंभव आणि विद्या दोघेहीस तिथे नव्हते. त्याला घेरी अली होती तर दोघांनी त्याला मदत वगैरे करण्याचा जराही प्रयत्न केला नव्हता. सह्याद्रीच्या जंगलात रात्र घालवणे त्याला इतक्या दिवसांच्या पायपिटी नंतर सोपे झाले होते पण चंद्र प्रकाशांत तो ओसाड गाव म्हणजे जणू काही स्मशान भूमी वाटत होता. त्याला थोडी तरी भीती नक्कीच वाटली होती. तो पळत पळत गुरुदेवांना शोधू लागला. गुरुदेव कदाचित आणखीन कुठे गेले असतील तर त्यांना कसे शोधायचे ? पण गुरुदेव एका विहिरीच्या बाजूला उभे होते. विद्या विहिरीतून त्यांना पाणी काढून देत होती. वेड्याप्रमाणे शुक तिथे धावून गेला होता आणि गुरूच्या चरणी लोटांगण घातले.  

"गुरुदेव, मला साहाय्य करा. मी वाट्टेल ते काम करण्यासाठी तयार आहे. मला दीक्षा द्या." म्हणून तो रडला होता. इतके दिवस बांधून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला होता.

त्या दिवसा पासून पासून आजच्या दिवस पर्यंत खूप काही घडले होते. कधी कधी शुकाला आपण स्वप्न पाहत आहोत आणि अचानक जग येईल तेंव्हा आपल्या घराच्या खाटीवर आपण असू असे सुद्धा त्याला अनेक वेळा वाटले.

आधी गुरुदेव तर किती तरी आठवडे त्याच्याशी बोलले सुद्धा नव्हते. विद्याने त्याच्याकडून हर प्रकारची कामे करून घेतली होती. पाणी विहिरीतून काढण्यापासून गुरु शिष्येचे मळलेले कपडे धुण्या पर्यंत आणि ध्यानखोलीतुन कोल्ह्याची विष्ठा साफ करण्यापासून जंगलातून लाकडे आणण्या पर्यंत सर्व काम त्याने मनोभावे आणि काहीही संकोच ना करता केले होते. हळू हळू जास्त जबाबदारीची कामे त्याला दिली गेली होती. गुरु सांगतात तिथे खणून जमिनीतून अस्थीपंजर काढणे. अनेक प्रकारच्या जडीबुटी पासून विविध प्रकारचे लेप करणे. हवना साठी यद्न्य भूमी तयार करणे. कधी कधी विद्या त्याला जमिनीवर काळ्या कोळशाने रांगोळी काढायला लावायची आणि नंतर त्याचेच रक्त काढून रांगोळीला मंत्रित केले जायचे.

गुरु रक्तसंभव इतर तंत्रिका प्रमाणे शिव किंवा देवीचे भक्त नव्हते ते महावराहाचे भक्त होते. विद्याच्या मते महावराह इतके जुने देवता आहेत कि पृथ्वी सुद्धा त्यांना विसरून गेली आहे. विष्णूच्या अवतारांत एक वराह अवतार काळाच्या पटलावरील छोटीशी खूण म्हणून आज लोकांना ठाऊक आहे पण प्रत्यक्षांत असं सुद्धा एक काळ होता कि महावराह स्वतः काळ होते.

अपरिचयातून परिचयाकडे त्याचा प्रवास २ वर्षांत झाला होता. जी विद्या साध्य करायची होती त्यासाठी २० वर्षे सुद्धा थांबण्याची त्याची तयारी होती. जो अग्नी हृदयांत ठेवून तो इथे आला होता तो अग्नी दिवस रात्र त्याने जागृत ठेवला होता. तंत्र साधने साठी गुरूकडून दीक्षा जरुरी असते त्याशिवाय पर्याय नव्हता आणि जी विद्या त्याला हवी होती ती गुरुदेव रक्तसंभव सोडून पृथ्वीतलावर आणखी कुणाकडेही नव्हती.

जसे जसे दिवस गेले तसे तसे शुकाला ज्ञान प्राप्त झाले. इतर साधनेत आपण ध्यान करावे लागते, गुरु काय सांगतात हे घोकावे लागते पण महावराही ज्ञान मार्ग सोपा आहे. आम्ही ज्या ज्ञानसागरांत आहोत तो प्रचंड आहे. समुद्रांत पोहून जायचे असेल तर तू कुठेही पोचणार नाहीस पण जर गलबत घेऊन निघाशील तर नवीन नवीन प्रदेश मिळतील. शुकाला अभ्यासाची गरज नव्हती ज्ञान आपोआप त्याच्या डोक्यांत येत होते. पण त्याच वेळी जुन्या आठवणी जुने ज्ञान मात्र डोक्यांतून जात आहे असे सुद्धा त्याला वाटू लागले होते. आपला आवडता रंग कोणता ? आपले लहान पणीचे मित्र कोण ? आपण कुठे शिकलो होतो ? काहीही त्याला आता आठवत नव्हते. फक्त आपले ध्येय सोडून. ती एकाच गोष्ट त्याच्या मनावर पकड घेऊत होती.