Get it on Google Play
Download on the App Store

१२) ती अद्वितीय सुंदरी

टीव्ही वर जाहीर होत होते: वॉटर डिमन्स आर बॅक! पण अजूनपर्यंत मिडीयाला या प्रकरणाचे मूळ सापडले नव्हते.
नाफ्ट चॅनेल ने सुद्धा अमेयच्या गायब होण्याचा आणि या उद्भवलेल्या जलजीवाचा संबंध आहे असा संशय व्यक्त करणारा एक कार्यक्रम बनवला होता...

अ‍ॅना ला कळून चुकले की त्या दिवशी घरात अमेय कशासाठी आला होता?

जलजीवांना कसे कंट्रोल करायचे ही सिडी चोरण्यासाठी....

त्या दिवशी बाथरुम मध्ये भास झाला असेल असे समजून ती तशीच पळत पळत बाथरुम च्या बाहेर गेली होती. मग घाबरत घाबरतच ओल्या अंगासहच तीने कपडे घातले.

ती फारच भेदरलेली होती. पटापट तयार होवून तीने एक ऑमलेट बनवले. ते खाल्ले कारण आदल्यादिवशी तीने काही खाल्लेले नव्हते.

आई जगातून तीला सोडून गेल्याचे आणि लगेचच अमेय अचानक गायब झाल्याचे दु:ख तीला सतावत होते.

हे सगळे रहस्य बाबांनी आईला सांगितले होते का?

जलजीवा उद्भवण्यास सुरुवात, आईचा मृत्यु, तसेच अमेयचे गायब होणे, तो जलजीवा होणे या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत का?

की सगळे ठरलेले होते आणि ठरलेले असते??

एकटेपण खायला उठेल म्हणून ती तयार होवून घराबाहेर पडली....

घराचा दरवाजा बंद होताच बाथरुमचा दरवाजा बर्फाने बनलेल्या हाताने हळूच उघडला गेला. दोन्ही हात आणि पाय बर्फाचे, शरीर पाण्याचे आणि चेहेरा गरम वाफेपासून बनलेला असा एकूण तो मानवी आकार होता. शरीराचा प्रत्येक भाग किंवा पूर्ण शरीर केव्हाही पाण्याच्या कोणत्याही रूपात म्हणजे वाफ, पाणी किंवा बर्फ यात बदलवण्याचे सामर्थ्य जलजीवांमध्ये होते.
त्या जलजीवा बनलेल्या अमेयने घरात शोधाशोध सुरु केली. ड्रॉवर, टेबल, कपाट यात सोयीस्कररीत्या वाफ, पाणी बनून त्याने सगळीकडे शोध घेतला. शोध घेता घेता त्याला आठवत होते:

....
त्या जलजीवा-स्त्रीने त्याला आदेश दिला होता त्या सगळ्या सिडींना नष्ट करायच्या ज्यात जलजीवांना कसे मारायचे, नष्ट करायचे हे लिहीलेले होते. ती सगळी पुस्तके, पुरावे नष्ट करायचे होते.

पहील्या महायुद्धाच्या काळात जन्माला आलेले ते सगळे जलजीवा दुसर्‍या महायुद्धात पुन्हा एकदा जागॄत झाले होते...
....
आणि त्यांना त्यावेळेस नष्ट करता आले नव्हते पण नियंत्रित केले गेले होते. रॉबर्ट गॉडमन या महा बुद्धीमान शास्त्रज्ञाने त्यांना नियंत्रित करण्याची पद्धत संशोधन करून सिद्ध केली होती. त्यांना नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असते हिरव्या मातीत उगवणारे ते झाड आणि त्यांची पाने....!!!
त्या झाडाचा एका भारतीयाने लावलेला शोध आणि ती माहीती त्या भारतीयाकडून मिळवणारा: अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो!! स्टेटस ऑफ द वॉटर: या पुस्तकाचा लेखक!!!

ते अद्भुत झाड. काय आणि कसे होते ते झाड आणि त्याची पाने???

पुढे त्यांना भेटावयास आलेल्या ऑर्थर हॉफमन यांना ते रहस्य सांगितले होते. ऑर्थर हॉफमन यांनी ते रहस्य जास्त गवगवा होवू नये म्हणून कॉम्प्युटर आणि सिडींच्या स्वरुपात साठवून ठेवले होते.

त्या दिवशी जंगलात जलजीवांच्या तोंडून बेशुद्ध होण्यासाधी अमेयने त्यांच्या तोंडून ऑर्थर हॉफमन हाच शब्द ऐकला होता. भोवळ येता येता त्याने एक नांव त्या सगळ्या जलजीवांच्या तोंडून पुसटसे ऐकले. ते नांव त्याने या आधी नक्की ऐकले होते असे त्याला वाटत होते.. पण काही समजण्याच्या आतच तो कोसळला होता.

पण अंगात त्राण होते. तो उठून पळायला लागला. ते तळ्यातले पाणी जलजीवांच्या रुपाने आपोआप वर उडाले ओते आणि अमेयच्या मागे मागे येवू लागले. ते पाणी अमेयच्या शरीराला वेढा घालू लागले. तो जीवाच्या आकांताने पळू लागला. पाणी पायापासून त्याच्या शरीराला वेढा घालत घालत कमरेपर्यंत येत होते. ते पाणी गरम वाफ बनून त्याच्या नाकात गेले आणि तो बेशुद्ध झाला.

...
जाग आल्यावर तो एका स्त्रीसमोर उभा होता.

एक अतिशय सुंदर स्त्री. जलजीवा रुपातली. कमनीय बांधा. रसाळ ओठ, आकर्षक चेहेरा, सुडौल, सुंदर, आकर्षक आणि भरदार स्तन, घोटीव मांड्या आणि पाय. एकूणच एक आकर्षक शरीर!! कोण होती ही स्त्री??

पहील्या महायुद्धात हीच स्त्री जलजीवांच्या उद्भवण्यास कारणीभूत झाली होती आणि आता ती इतर अनेक जलजीवांसमोर आपली कहाणी सांगत होती. तीचे नाव होते: जेनिफर.
आणि आपली पहील्या महायुद्धातली कहाणी ती इतर जलजीवांसमोर अमेयला सांगत होती......
"
काय होते त्या झाडात? " अमेयने जेनिफरला त्यावेळेस विचारले होते आणि ती भेसूर हास्य हसली होती. आणि तीच्या तोंडून अमेयने त्याच्या एका पूर्वजाचे नाव घेतले होते......

.....
हा प्रसंग आठवता आठवता अ‍ॅनाच्या घरी अमेयच्या टणक बर्फाळ हाताला ती सीडी लागली. आता पूर्ण पाणी किंवा वाफ बनून बाहेर पडता येणार होते, पण ती सिडी घेवून नष्ट करण्या आधी जेनिफरला नेवून द्यायची होती. कारण ते झाड ज्या बीयांपासून बनते आणि त्या झाडाच्या ज्या पानांपासून जलजीवांना अद्भुत पद्धतीने नियंत्रीत करता येते त्या बीया जेथे जेथे ठेवल्या आहेत तेथून तेथून त्या नष्ट करायच्या होत्या. त्या जलजीवा नष्ट करू शकत नव्हते, तर त्यासाठी त्यांना गरज होती मानव असलेल्या पण जलजीवांत रूपांतरीत झालेल्या जलजीवांची...!!

सिडी घेवून अमेय लंडनच्या रस्त्यावरून चालला होता. सिडी धरण्यासाठी त्याला कडक बर्फाळ हाताची गरज होती.....तो सिडी घेवून निघाला होता. पकडायला आलेल्या पोलीसांच्या गाड्यांना तो बर्फाळ टणक हातापायांनी फोडत जात होता.

पोलिसाने गोळीबार केला. जलजीवा गोळीबाराने मरत नसतात. पण अजून जलजीवांचे सिडी नष्ट करण्याचे काम पूर्ण होईपर्यंत जगासमोर येण्याचे टाळावे असा जेनिफरने त्यांना सल्ला दिला होता.

शेवटी न्यूज चॅनेल ला कळल्याने आणि पोलीसाने हल्ला केल्याने अमेयने ती सिडी तोडून टाकली आणि तो वाफ बनून उडून गेला आणि ढगात रूपांतरीत होवून आपापल्या मार्गी लागला.

कारण बर्फ, पाणी या रुपात जास्त वेळ असलो तर जगाला कळून चुकेल आणि कुठेतरी असू शकलेल्या जलजीवांना नियंत्रीत करण्यासाठीच्या गोष्टी जगासमोर पुन्हा येण्याची शक्यता जास्त होती.

आणि लोकांनी पुन्हा जलजीवांना नियंत्रीत करणे सुरु करण्या आधी शक्यतो सगळ्या सिडी, पुस्तके, आणि त्यात लिहीलेल्या त्या बीया, झाडे हे सगळे जलजीवांना नष्ट करता येणार नव्हते पण मानव- जलजीवांच्या मदतीने ते नष्ट करता येणार होते. आता आणखी सिडी, पुस्तके दुसरीकडे असणार होत्या का??

जेनिफरला फक्त हवे होते ते रहस्य! जलजीवांना नियंत्रीत करणार्‍या बीया, झाड.

ते जेथे जेथे म्हणून लपवले असेल तेथून नष्ट करायचे होते तीला....

सिडी न आणता अमेय जेनिफरजवळ पोहोचला. आता सर्व जलजीवा आकाशात ढगांच्या रुपात जमले होते. त्या ढगात अमेय ढगरुपात आला. त्याने सिडी आणली नव्हती हे तीला तो वाफरुपात परत आल्यावर कळले होते....

त्यांचे पुढचे टार्गेट होते - "स्टेटस ऑफ द वॉटर: या पुस्तकाचे लखक अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो! हे पुस्तक वैज्ञानिक क्षेत्रात क्रांतीकारी ठरले होते.

वाफ, पाणी, बर्फ या व्यतिरिक्त आणखी चौथी पाण्याची स्टेट म्हणजे पाण्याचे चौथे रूप शोधून काढण्यात त्यांना यश आले होते.

आणि त्या शोधाच्या आधारेच मध्य प्रदेशातल्या जंगलातल्या सर्वप्रथम शोध लागलेया "त्या" अग्नीवृक्षाच्या पानांच्या मदतीने पाण्याला या चौथ्या रुपात रुपांतरीत करता येत होते. पण हा प्रयोग जलजीवांना नियंत्रीत करण्यासाठी वापरण्यात आला होता. एरवी रोजच्या जीवनात त्या चौथ्या रुपाचा काहीच उपयोग नव्हता. ते चौथे रूप म्हणजे वाफ आणि बर्फ या मधले रूप. म्हणजे वाफेचे रूपांतर पाण्यात न होवू देता सरळ बर्फात तयार केले असता हे चौथे रूप तयार होते....

इकडे अ‍ॅना आपल्या वडीलांच्या लॅपटॉप मधली साऊथ जॉर्जिया हून परत येत असतांना च्या अनुभवाची फाईल वाचत होती. आता वाचतांना ती एकटी नव्हती. सगळे होते. अमोल, जितीन, त्याचे वडील आणि इतर!

ऑर्थर हॉफमन यांनी पुढे लिहिले होते- "परतीच्या प्रवासात कॅप्टन कडून मला माहिती मिळाली की पहील्या महायुद्धात काही युद्धकैद्यांच्या खुप छळ केला गेला होता. त्यांना डेव्हील्स स्क्वेअर वरच्या बेटांवर ठेवण्यात आले होते..."