शिरीष व हेमा 2
‘तिकडे माझे मित्र आहेत. प्रेमानंद आहे. आणि...’
‘आणि कोण?’
‘असे पुष्कळ मित्र आहेत. नको विचारू’
‘मी विचारीन हो बाबांना.’
‘विचार.’
‘दोघे परतली. गाडीत बसून आपल्या निवासस्थानी आली, भोजन झाले आणि हेमा रात्री माहेरी गेली.’
‘बाबा, शिरीष दुःखी आहेत.’
‘कोणते दुःख?’
‘ही प्रधानकी नको असे त्यांना वाटते. त्यांना खेड्यात जाऊन राहावे असे वाटते. त्यांचे वृद्ध आईबाप तिकडे आहेत.’
‘त्यांना इकडे का नाही आणीत?’
‘काही अडचणी आहेत.’
‘कोणत्या?’
‘त्या ते सांगत नाहीत.’
‘हेमा तुलासुद्धा येथून जावे असे वाटते का?’
‘शिरीषचे सुख ते माझे. येथून जाण्याने त्यांना सुख होत असेल, तर मीही जाईन. मी गेलेच पाहिजे.’
‘मला सोडून जाणार?’
‘बाबा, नदी पर्वताला व सागराला दोघांना कशी सुखवू शकेल? नदी सागराकडेच जायची. त्यातच तिची पूर्णता. ती डोंगराजवळ राहील तर तिचे जीवन होईल का विशाल?’
‘हेमा, तुझ्या पित्याने इतकी वर्षे तुला वाढवले, ते का फुकट? तुझा पती तुला काल परवा मिळाला. त्याचे सुख ते एकदम तुझे सुख झाले! आणी मी? हेमा, तू नेहमी भेटावीस, दिसावीस म्हणून मी अधीर असतो. तू गेलीस तर मी दुःखी होईन.’