Get it on Google Play
Download on the App Store

श्रीमध्वमुनीश्वराचें पद


शुकसनकादिक महिमा ज्याचा वर्णिती वेदपुराणींरे ।
गोकुळीं गोवळ होउनि गाई, चारी चक्रपाणीरे ।
जो हा पांडव घरिं हरि सारथि, पाजी तुरगा पाणीरे ।
तो हा सद्गुरु ज्ञानेश्वर हरि स्मरणें तारी प्राणी रे ॥१॥
ज्यानें केली भगवद्गीतेवरतीं सुंदर टीका रे ।
सादर परिसति होती त्यांची संसारांतुनि सुटकारे ।
प्राकृत भाषा रुचिकर रचिली करुनि सुधारस फिकारे ।
विरक्ति भक्ति ज्ञानाचाही पोषितो रस निकारे ॥२॥
दगडाची ही भिंति जयानें चालविली जड मातीरे ।
पैठणीं दिधली वेद परीक्षा वेडया रेडया हातींरे ।
सुवर्णाचा पिंपळ ज्याच्या द्वारी वैष्णव पहातीरे ।
अजान वृक्षाखालीं शांभव आसन घालुनि राहातीरे ॥३॥

मुक्तीपुरिहुनि श्रेष्‍ठ सनातन पाहतां क्षेत्र आळंदीरे ।
इंद्रायणीचें जळ जो सेवी, इंद्रपदासी निंदीरे ।
ज्याचे सन्निध सिद्धेश्वर तो सन्मुख शोभे नंदीरे ।
कार्तिक मासीं पंढरपुरपति, समाधि ज्याची वंदीरे ॥४॥

’ज्ञानेश्वर’ या नामाचा जो जप करि अनुदिनीं वाचेरे ।
त्याचे हृदयीं परमेश्वर तो, लक्ष्मी घेऊनि नाचेरे ॥
ज्याची टीका श्रवणीं पडतां, भवभय पर्वत कांचेरे ।
अगणित गुणागण मध्वमुनीश्वर वर्णीतो हे वाचेरे ॥५॥