फुला 3
फुला तो प्रयोग करू पाहात होता. त्याला बक्षिसाची इच्छा नव्हती. एक लाख रुपयांसाठी तो हपापला नव्हता. फुलांवर प्रयोग करण्यात तर त्याचा आनंद होता. नवीन प्रयोग करावयाला मिळणार म्हणून तो आनंदला होता. पुष्पसृष्टीची रहस्ये शोधणे हेच त्याचे जीवितकार्य होते.
फुलाच्या घराशेजारी एक गृहस्थ होता. त्याचे नाव गब्रू. गब्रूलाही फुलांचा नाद होता; परंतु फुलाजवळ ज्याप्रमाणे ज्ञान होत तसे त्याच्याजवळ नव्हते. तो जाहिर झालेला प्रयोग आपणही करावा असे त्याच्या मनात आले; परंतु कसा करावा प्रयोग ते त्याला सुचेना. त्याला एक लाख रुपयांचे ते बक्षीस रात्रंदिवस दिसत होते. शेवटी फुलाचा प्रयोग यशस्वी झाला तर तो आपणच चोरावा असे त्याने मनात ठरविले. फुला आपल्या काचेच्या घरात प्रयोग करीत बसे. गब्रू आपल्या घरातून ते सारे पाहात असे. तो म्हणे, हे नवीन प्रयोग काचेच्या घरात चालले आहेत, एक दिवस त्या काचेच्या घरात शिरावे व लांबवावा तेथील प्रयोग. फुलाच्या घराजवळ एक मोठे झाड होते. त्या झाडाच्या फांदीवरून गच्चीत उतरता आले असते व त्या काचेच्या प्रयोगालयात जाता आले असते.
एके दिवशी रात्री गब्रूने झाडावरून चढण्याचे ठरविले. बाहेर अंधार होता. गब्रू हळूच फुलाच्या बागेत आला. हळुहळू त्या घराकडे तो जाऊ लागला. इतक्यात दोन मांजरे गुरगुरत बागेत आली. ती भांडू लागली. फुलाने ते मांजरांचे भांडण ऐकले. ती मांजरे बागेत भांडतील व त्यांच्या भांडणात फुले कुस्करली जातील, लहान-लहान झाडांचे नुकसान होईल म्हणून हातात काठी व दिवा घेऊन फुला बाहेर आला. शुक् शुक् करीत बागेत आला. गब्रू घाबरला. तो भराभर पावले टाकीत पळून गेला. कोण गेले पळत, रानमांजर की काय? फुला सर्वत्र हिंडून पुन्हा घरात आला. तो निजला; परंतु गब्रुला झोप नव्हती. पळवीन, एक दिवस तुझा प्रयोग पळवीन, एक लाख रुपये मी मिळवीन असे मनात म्हणत ता अंथरुणात तडफडत होता.