संग्रह ५
८१.
भाऊ शिवी चोळी पट्ट्यापट्ट्याला चवल
शिंपी करीतो नवल
८२.
शीव शिंप्या चोळी , मोती लाव कडणीला
चोळी जायाची गडणीला
८३.
अंगडा टोपड , शीव शीपींनी नकशाच
ताईत बंधुजीच बाळ लेनार मोकाशाच.
८४.
शीव शिंप्या चोळी उगीच टाक दोरा
मैना निघाली सासुर्या , जीव माझा झाला वारा
८५.
हातात सुई दोरा शिंपी वाटेला गाठला
झगा छातीला दाटला
८६.
अंगी शीव शिंप्या ,आकड्या काढ भुजेवरी
चांदसुर्व्या छातीवरी, गरुडपक्षी पाठीवरी
८७.
घडव घडव सोनारा,सरी बिंदुल्या वाघनख
माझ्या ताईत बंधुजीला झाला ल्योक.
८८.
घडीव घडीव सोनारा,घडीव वाघानखी
वाळं घुंगुराजोग्या लेकी.
८९.
सांगुन पाठवित्ये , सोनार सखियेला.
घोस साळूच्या वाकीयेला
९०.
सोनाराच्या शाळे पाच पेट्यांच गाठल
बंधुच माझ्या बाळ मला बघूस वाटल.
९१.
नंदाभावजयी , चला सोनारवाड्या जाऊ
रुपियाच्य करंडयाला मोत्याचा जाळ्या लाऊ.
९२.
सांगुन पाठवत्ये सांगली गांवीच्या सोनाराला
सोन्याची साखळी बंधुजीच्या आहेराला.
९३.
सोनाराच्या साळे उडत ठिण्ग्याजाळ
ताईत बंधुजी करतो ,रानीला मोहनमाळ
९४.
लाडके ग लेकी नको माझा जीव खाऊ
चाट्याच्या दुकानी उंचघडीला नको हात लावू
९५.
लुगड घेतल , दुही पदर खुतनीच
माझ्या बंधुजींच चाटी मितर अथनीच.``
९६
चाट्याच्या दुकानी बंधु दोघतिघ
बहिणा,पातळ तुझ्याजोगं
९७.
चाट्याच्या दुकानी बंधु बसे मोतीदाणा
हात मी टाकिते उंच खणा
९८.
चाट्याच्या दुकानी चंद्रकळाची लुगडी
बयाला देखुन चाटी दुकान उघडी
९९.
लुगड घेतल त्याचा पदर गोपयाचा
चाटी मितर बापयाचा
१००.
लुगड घेतल दुही पदराला जर
चाटी बंधुचा मैतर