Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ३

५१

काळी चंद्रकाळा माझ्या मनात घ्यावी होती

हौशा भरतारानं आणिली अंगमती

५२

हौस मला मोठी जरीच्या पातळाची

हौशा भरतारान पेठ धुंडली सातार्‍याची

५३

हौशा भरतार हौस करी मनामंदी

काळी चंद्रकळा घेतो बाळंतपनांमंदी

५४

मला हौस मोठी, हिरवं लुगडं पानाचं

मन बघते घेण्याचं

५५

माझ्या मनीची हौस, तुमच्या मनाची कल्पना

धनी बांधा दरवाज्यावर जिना

५६

हौस मला मोठी दीर जावांत नांदायाची

माडी कौलरू बांधायाची

५७

थोरलं माझं घर, अंगन झालं थोडं

धनी बांधा सदर सोप्यापुढं

५८

थोरलं माझं घर पडवी उतरली स्वैपाकाला

म्होर ढेलज बसायाला चांदसुर्व्या दिसायाला

५९

थोरलं माझ घर आठ खिडक्या नऊ दारं

धनी बैसले सोप्याला तालेवार

६०

थोरलं माझ घर शंभर पायर्‍याचं

आदरतिथ्य होतं येनाजानार्‍याचं

६१

थोरलं माझं घर, हाई चार चौकाचं

घरधनियांच एकल्या मालकांचं

६२

धाकुट माझ घर हंडयाभांडयाचा पसारा

धनी वाडा बांधावा दुसरा

६३

माडीवर माडी बांधली नकशाची

माझ्या राजसाची उंच हवेली मोकाशाची

६४

भरताराचं सुख सांगते गोतामंदी

अष्टीच्या धोतराची केली सावली शेतामंदी

६५

भरतारांच सुख, सुख सांगते बयाबाई

वाट पान्याची ठावी न्हाई

६६

भरताराच सुख, सांगते भावाला

तांब्याच्या घागरीन पानी घालते देवाला

६७

भरताराचं सुख, किती सांगु बयाबाई

मोट धुन्याची ठावी न्हाई

६८

भरतार म्हनु हाईती भरतार परकाराच

सुख माझ्या सरकाराच

६९

भरताराचं सुख दैवा लागलं सारीख

वळीवाचा पाउस कसापरास बारीक

७०

भरताराची सेवा करावी मनोभाव

राज बसुनी त्याचं खावं

७१

सम्रत मायबाप, माहेरी खजिन्याची उंट

चुडियाच्या राज्यामंदी सुखाची करीन लूट

७२

गावाला गावकूस पानमळ्याला बसती

चुडीयाच्या राज्यावरी दुनव्या भरली दीसती

७३

चारी माझी बाळं, पाचवा हाई कंथ

राज्याला न्हाई अंत

७४

भरतार शिरावर न्हाई कशाची दगदग

पान्याच्या झोकावर लहरी मारीता फुलबाग

७५

भरताराचं राज मखमली डेरा

लागंना ऊन वारा