संग्रह ३
५१
तांबडा मंदील गुंडावा माझ्या लाला
दृष्ट व्हईल, लावु काळं गाला
५२
तांबडा मंदील गुंडीतो तामनांत
माझ्या राघुबाची बैठक बामणांत
५३
तांबडा मंदील बांधतो फुलावाणी
दिसे राजाच्या मुलावाणी
५४
तांबडा मंदील देते फिरकी फिरकीला चांदु
तुला शोभेल तसा बांधु
५५
तांबडया मंदिलाला रुपै दिले साडेआठ
बाळा तुझी शेमल्याजोगी पाठ
५६
तांबडया मंदिलाला पैका पडेल त्यवढा देते
लाला गुजरा तुला घेते
५७
शिरी मंदील लेतो, बाळराज देखणा
शहराचा राह्यनार, खेडयांत झाकंना
५८
भजनात उभा माझा फुलाचा गजरा
बाळराज घाली सभेला मुजरा
५९
हातांत टाळवीणा उभा राहिला भजनाला
गळा राघुबा सजणाला
६०
पखजावरी हात टाकीतो नीटनीट
तुझी शीणली कवळी बोटं
६१
साद देणारापरीस गीत गानारा हरदासी
गळा बाळाचा चवरसी
६२
पानखातवन्या पानं खाशील त्यवढी देते
लाल गुजरासाठी पानमळ्याची खोती घेते
६३
पानखातवन्या, माझ्या मुठींत पानं ताजी
बाळराजाच्या डौलाला दृष्ट माझी
६४
पानंखातवन्या, तुला पानाला काय तोटा
तुझ्यासाठी बाळा पानमळयांत घेते वाटा
६५
सावळ्या सुरतींच किती करु कवतीक
बाळ माझा लव्हाळा लवचीक
६६
सावळी सुरत अशी पाहिली न्हवती कधी
माझा बाळराज सुरमा लेतो गंधामधी
६७
सावळ्या सुरतीवर नार टाकिते झगंझाप
माझ्या ग बाळाचं अजून बाळरूप
६८
सावळ्या सुरतीवरी मोडया उठल्या दोनतीन
बाळ सुरतीनं रावण
६९
गावाला गेला बाळ कंठीचा ताईत
न्हाई शहराची माहीत !
७०
गावाला गेला राघू गावक्या होऊं नगं
वाट बघया लावू नगं
७१
गावाला गेला लाल कंठीचा दिसं पदर
लोक पुशित्यात, वानी हाई का गुजर ?
७२
गावाला गेला बाळ, सुन्या दिसत्यात गल्ल्या
कुठं गेलाया बाळ, गलबल्या ?
७३
गावाला गेला बाळ माघारा येईल कवां ?
माझ्या सराचा गोफ नवा
७४
कुस्तीच्या फडावरी रणहलगीला जागा दावा
शीण बघुन कुस्ती लावा
७५
माझ्या वाडयावरनं गेल्या दुधाच्या घागरी
माझ्या पैलवानाच्या बिगारी