Get it on Google Play
Download on the App Store

नामस्मरण - सप्टेंबर ४

बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते , मग ती सुखाची , दुःखाची , अभिमानाची , कामाची , लोभाची , कसलीही असो , तिचे नाव वृत्ती . ही वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ होय . परमात्म्याकडे वृत्ती वळविणे म्हणजेच भक्ती करणे होय . भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूम नाहीसा होतो . भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे . ती प्रत्येकाला हवीच असते ; कारण भक्ती म्हणजे आवड ; आणि कसल्यातरी आवडीशिवाय मनुष्यच सापडणार नाही . मात्र अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही , आणि भक्तीविणे भगवंत नाहीच प्राप्त होणार . भगवंताचे प्रेम भगवंतावाचून इतर कुणाला देता येत नाही , तोच ते देऊ शकतो . भक्त आणि भगवंत हे दोन नाहीतच . म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे , तसा भक्तही सर्व ठिकाणी असतो . भक्त भगवंतमय होतो , म्हणून त्याला सर्व जगतात आनंद दिसतो . ‘ मी नाही आणि तू ( म्हणजे भगवंत ) आहेस , ’ किंवा ‘ मी तोच ( म्हणजे भगवंत ) आहे ’ असे जाणणे , आणि तसेच कृतीत घडणे , हेच परमार्थाच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे ; आणि हे साधायला भगवंताचे अनुसंधान हेच मुख्य साधन आहे .

आज आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे : भगवंताच्या नामात राहावे . नामाशिवाय दुसरा मार्ग नाही . वहात आलेले नाले तिच्यात मिसळले तरी गंगमाईचे पवित्रपण जसे कायम राहाते , त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचे गढूळपण मग कुठून राहील ? भगवंताचे स्मरण तर सर्व तीर्थांचा राजा आहे . नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही . भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सोडणे हे वैराग्य , आणि भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हा विवेक होय . रामरायाचे अंतःकरण खरोखर , कर्तव्याला जितके कठोर आहे तितकेच भक्ताला ते अत्यंत कोवळे आहे . कर्तव्यासाठी त्याने सीतमाईला अरण्यात सोडली , तर भक्तप्रेमापोटी त्याने भरताला सांभाळला . माझे सांगणे जितके आचरणात आणाल तेवढेच कामाला येईल . सगळ्यांनी नामस्मरण करा . नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही . जे सहज आपल्याजवळ आहे , अत्यंत उपाधिरहित असून कुणावर अवलंबून नाही , असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे . शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतःकरणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करील .

ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास

स्तोत्रे
Chapters
नामस्मरण - सप्टेंबर १ नामस्मरण - सप्टेंबर २ नामस्मरण - सप्टेंबर ३ नामस्मरण - सप्टेंबर ४ नामस्मरण - सप्टेंबर ५ नामस्मरण - सप्टेंबर ६ नामस्मरण - सप्टेंबर ७ नामस्मरण - सप्टेंबर ८ नामस्मरण - सप्टेंबर ९ नामस्मरण - सप्टेंबर १० नामस्मरण - सप्टेंबर ११ नामस्मरण - सप्टेंबर १२ नामस्मरण - सप्टेंबर १३ नामस्मरण - सप्टेंबर १४ नामस्मरण - सप्टेंबर १५ नामस्मरण - सप्टेंबर १६ नामस्मरण - सप्टेंबर १७ नामस्मरण - सप्टेंबर १८ नामस्मरण - सप्टेंबर १९ नामस्मरण - सप्टेंबर २० नामस्मरण - सप्टेंबर २१ नामस्मरण - सप्टेंबर २२ नामस्मरण - सप्टेंबर २३ नामस्मरण - सप्टेंबर २४ नामस्मरण - सप्टेंबर २५ नामस्मरण - सप्टेंबर २६ नामस्मरण - सप्टेंबर २७ नामस्मरण - सप्टेंबर २८ नामस्मरण - सप्टेंबर २९ नामस्मरण - सप्टेंबर ३०