भगवंत - डिसेंबर ३०
सकाळीं लवकर उठावें । भगवंताचें स्मरण करावें । हातपाय स्वच्छ धुवावे । मानसपूजा करावी ॥ ह्रदयांत ठेवावें रामाचें ठाण । षोडशोपचारें करावें पूजन ॥ गंध, फूल करावें अर्पण । नैवेद्य करावा अर्पण । मनानें प्रसाद घ्यावा जाण ॥ शेवटीं करावी प्रार्थना एक । ‘ रामा, तुला मी शरण देख ॥ जें जें म्हटलें मी माझें । तें तें रामा तुझें ॥ आतां न गुंतवा माझें मन । रामा, मी आलों तुला शरण । वासना न उठो दुजी कांहीं । नामामध्यें प्रेम भरपूर देईं ॥ सदा राखावें समाधान । जें तुझें कृपेवांचून नाहीं जाण ॥ नीतिधर्माचें आचरण । तुझे कृपेनें व्हावें जतन ॥ न मागणें आतां कांहीं । मी तुझ्यासाठीं जिवंत पाहीं । आतां द्या नामाचें अखंड स्मरण । देह केला तुला अर्पण ॥ रामा, जें जें कांहीं तूं करी । त्यांत समाधानाला द्यावें पुरी । आतां, रामा, एकच करीं । तुझा विसर न पडो अंतरीं ॥ तुझे नामाची आवडी । याहून दुजें मागणें नसावें उरी ॥ हेंचि द्यावें मला दान । दीन आलों तुज शरण ॥ रामा, मला एकच द्यावें । तुझें अनुसंधान टिकावें ॥ नको नको ब्रह्मज्ञान । काव्य-शास्त्र-व्युत्पत्तीचें ज्ञान ॥ कामक्रोधाचे विकार । जाळताती वारंवार ॥ आतां तारीं अथवा मारीं । तुझी कास कधीं न सोडीं ॥ आतां, रामा, तुझा झालों । कर्तेपणांतून मुक्त झालों ॥ माझें सर्व तें तुझें पाहीं । माझें मीपण हिरोनि जाई ॥ रामा, आतां एकचि करीं । वृत्ति सदा राहो तुझेवरी ॥ रामा, मीं कोठें जावें? । तुजवांचून कोठें राहावें? ॥ देहबुद्धीची नड फार । ती करावी रामा तुम्ही दूर ॥ आजवर विषय केला आपलासा । न ओळखतां पडलों त्याच्या फांसा ॥ रामा, सर्व सत्ता तुझ्या हातीं । समाधान राहील अशी करावी वृत्ति ॥ तुझेजवळ मागणें दुजें नाहीं । ह्रदयांत तुझा वास अखंड राही । आतां तुझ्यासाठीं माझें जीवन । तुला तनमन केलें अर्पण ॥ तुमचे चिंतनीं लागावें मन । कृपा करा रघुनंदन ॥ ’ ऐसें करावें रामाचें स्तवन । रक्षणकर्ता एक भगवंत मनीं आणून ॥ ऐसें व्हावें अनन्य दीन । तात्काळ भेटेल रघुनंदन ॥
नामापरतें न माना दुजें साधन । जैसें पतिव्रतेस पति प्रमाण ॥ नामापरतें न मानावें सत्य । ज्यानें राम होईल अंकित ॥ हेच सर्व साधुसंतांचे बोल । कोणीही न मानावे फोल ॥ नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण । मनीं असो, नसो, करावें नामस्मरण ॥ नामाविण दुजें काहीं । सत्य सत्य त्रिवाचा नाहीं ॥
नामापरतें न माना दुजें साधन । जैसें पतिव्रतेस पति प्रमाण ॥ नामापरतें न मानावें सत्य । ज्यानें राम होईल अंकित ॥ हेच सर्व साधुसंतांचे बोल । कोणीही न मानावे फोल ॥ नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण । मनीं असो, नसो, करावें नामस्मरण ॥ नामाविण दुजें काहीं । सत्य सत्य त्रिवाचा नाहीं ॥