आपले नेहरू 11
चलेजाव
चीनमधून ते तत्काळ कलकत्त्याला आले. तेथें कार्यकारिणी भरली. सरकारनें युद्धहेतु जाहीर करावे अशी राष्ट्रसभेनें मागणी केली. पुढें ‘ राष्ट्रीय सरकार आज द्याल तर युद्धांत सशस्त्र मदत करूं ’ असाहि ठराव केला. परंतु सरकार रेसभर पुढें येईना. तेव्हां गांधीजींनीं वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. जवाहरलालना एका भाषणासाठीं आधींच अटक होऊन गोरखपूरच्या न्यायधीशानें “तुम्हांला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा देतों.” असें म्हणून चार वर्षांची सजा दिली. पंडितजी म्हणाले : “मी कितीदां नि किती वर्षें तुरुंगांत होतों याचा हिशेब करीत नसतों. माझ्या डोळ्यांसमोर दरिद्री जनता असते.”
परिस्थिति झपाट्यानें बदलत होती. जपान युद्धांत सामील होऊन भराभरा प्रदेश जिंकत ब्रम्हदेशापर्यंत आला. भारताचें काय ? काँग्रेसचे सारे सत्याग्रही सुटले. क्रिप्स वाटाघाटीसाठीं आले. परंतु कांहीं निष्पन्न न झाल्यामुळें परत गेले. आणि राष्ट्रपित्यानें तो ऐतिहासिक ‘ चले जाव ’ शब्द उच्चारला. त्यांनीं पंडितजींना आपला दृष्टीकोण पटविला. नेहरू म्हणाले : “गांधीजींच्या डोळ्यांत केवढी उत्कटता होती !” शेवटीं मुंबईस १९४२ मध्यें ऑगस्टच्या ८ तारखेस रात्रीं चलेजाव ठराव मंजूर झाला. ‘ करेंगे या मरेंगे ’ हा संदेश राष्ट्रपित्यानें दिला.
नेहरू रात्रीं १२ वाजतां दमून निजले होते. मोठ्या पहांटे पोलिस आले. ९ ऑगस्टला नगरच्या किल्ल्यांत ते बंदिस्त झाले. देशभर उग्र संग्राम चालला होता. सरकार आहे नाहीं असें झालें. तिकडे नेताजींची आझाद फौज लढत होती. ‘ चलो दिल्ली ’, ‘ जयहिंद ’ हे नवशब्द जन्मले. जवाहर भारताचा भूतकाळ अभ्यासीत होते, भविष्याचा नकाशा आंखीत होते. हें प्राचीन राष्ट्र कां टिकलें ? नानाधर्म, संस्कृति, जातीजमाती, यांच्या लाटा आल्या. परंतु भारत समन्वय करीत त्यांतून पुन:पुन्हां पुढें जाई. भारताचा नवनवोन्मेषशाली आत्मा त्यांना सांपडला.
हिटलरचा पाडाव झाला. अॅटमबाँबनें जपान शरण आला. नेताजी कोठें गेले ? प्रभूला माहीत. आझाद सेना गिरफदार झाली. महात्माजी सुटले व पुढें राष्ट्रनेते सुटले. निवडणुकी झाल्या. दिल्लीला काँग्रेस व मुस्लीम लीग यांचे संमिश्र मंत्रिमंडळ स्थापण्यांत आलें. परंतु जिनांना चिरफाडच हवी होती. त्यांनी १९४६ चा १६ ऑगस्ट हा कृतिदिन म्हणून घोषविला. योजनेनुसार कलकत्ता शहरांत कत्तली – जाळपोळी झाल्या. नौखालींत तर सीमा नव्हती. महात्माजी दीनांचे अश्रु पुसायला तिकडे गेले तों बिहारमध्यें सूड भडकला. जवाहरलाल तेथें धांवले व म्हणाले : “दुसरे पशु झाले तरी तुम्ही होऊं नका.”
थोडी शांति पुन्हा आली. परंतु जिनांना हवें होतें तें मिळालें. पाकिस्तान न मिळेल तर असें होत राहील – त्यांना दाखवायचें होतें. शेवटीं फाळणी होऊन स्वातंत्र्य आलें !
१५ ऑगस्ट
१९४७ मधील १५ ऑगस्ट उजाडला. ब्रिटिश गेले. युगानुयुगांचें ग्रहण सुटलें. लाल किल्ल्यावर अशोकचक्रांकित तिरंगी ध्वज फडकला. देशाचा कांहीं भाग गेला तरी उरलेला एवढा मोठा भाग एका सत्तेखालीं कधीं होता ? ती सत्ता पुन्हां ना एका राजाची, धर्माची, जातीची वा प्रान्ताची. सार्या जनतेची सत्ता. अपूर्व अशी ती वस्तु होती.