एड्सचा प्रतिबंध
एड्सवर सध्या कोणतेही औषध वा लस नाही. एच.आय.व्ही विषाणूची लागण झाली असल्याचे खूप लवकर लक्षात आले, तर काही 'अँटीरेट्रोव्हायरल' औषधे घ्यायला लागून एड्सच्या स्थितीचा वेग कमी करणे काही प्रमाणात शक्य आहे. परंतु ही औषधे अतिशय महाग असल्याने विकसनशील व अविकसित देशांतील बहुतांश लोकांना उपलब्ध नसतात. तसेच ह्या औषधांची परिणामकारकता मर्यादित असून एड्सला पूर्णपणे रोखणे सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून खालील प्रतिबंधात्मक गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
- एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध टाळा.
- लैंगिक संबंधाच्यावेळी निरोधचा वापर करा, असुरक्षित यौनसंबंध टाळा.
- तुम्हाला एड्स झाला असेल तर तुमच्या साथीदाराला त्याची कल्पना द्या. असुरक्षित संबंध ठेवू नका, त्यामुळे एड्स तुमचा साथीदार किंवा मुलांना होण्याची शक्यता असते.
- जर तुम्ही एच.आय.व्ही. ने संक्रमित असाल तर रक्तदान करू नका.
- रक्त चढवण्यापूर्वी ते एच.आय.व्ही.मुक्त आहे याची खात्री करून घ्या.
- इंजेक्शन घेताना प्रत्येक वेळी नवीन सुईचा वापर करा.