शेतकर्याचा असूड - पान १३
म्हणून अखेरीस मोठा उसासा टाकून रडतां रडतां झोपीं गेला. नंतर मी डोळे पुशीत घराबाहेर येऊन पहातों तों त्याचें घर एक मजला कौलारू आहे. घराचे पुढचे बाजूस घरालगत आढेमेढी टाकून बैल बांधण्याकरितां छपराचा गोठा केला आहे. त्यांत दोनतीन उठवणीस आलेले वैल बांधण्याकरिताम छपराचा गोठा केला आहे. त्यांत दोनतीन उठवणीस आसलेले बैल रवंथ करीत बसले आहेत व एक बाजूला खंडी सवाखंडीच्या दोनतीन रिकाम्या कणगी कोपर्यांत पडल्या आहेत बाहेर आंगणांत उजवे बाजूस एक आठ बैली जुना गाडा उभा केला आहे. त्यावर मोडकळीस आलेला तुराठयांचा कुरकुल पडला आहे. डावे बाजूस एक मोठा चौरस ओटा करून त्यावर एक तुळशीवृंदावन बांधलें आहे. व त्यालगत खापरी रांजणाच्या पाणईचा ओटा बांधला आहे. त्यावर पाण्यानें भरलेले दोनतीन मातीचे डेरे व घागरी ठेविल्या आहेत. पाणईशेजारीं तीन बाजूल छाट दिवालीं बांधून त्यांचे आंत आवडधोबड फरशा टाकून एक लहानशी न्हाणी केली आहे. तिच्या मोरीवाटे वाहून गेलेल्या पाण्याचें बाहेरचे बाजूस लहानसे डबकें सांचलें आहे, त्यामध्यें किडयांची बुचबुच झाली आहे. त्याचे पलीकडे पांढर्या चाफ्याखालीं, उघडीं नागडीं सर्व अंगावर पाण्याचे ओधळाचे डाग पडलेले असून; खर्जुलीं, डोक्यांत खवडे, नाकाखालीं शेंबडाच्या नाळी पडून घामट अशा मुलांचा जमाव जमला आहे. त्यांतून कितीएक मुलें आपल्या तळहातावर चिखलावे डोले घेऊन दुसर्या हातांनीं ऊर बडवून " हायदोस, हायदोस " शब्दांचा घोष करून नाचत आहेत; कोणी दारूपिठयाचें दुकान घालून कलालीन होऊन पायांत बाभळीच्या शेंगांचे तोडे घालून दुकानदारीण होऊन बसली आहे. तिला कित्येक मुलें चिंचोक्याचे पैसे देऊन पाळीपाळीनें लटकी पाण्याची दारू प्याल्यावर तिच्या अमलामध्यें एकमेकांच्या अंगावर होलपडून पडण्याचें हुबहब सोंग आणीत आहेत. त्याचप्रमाणें घराचे पिछाडीस घरालगत आढे-मेंढी टाकून छपरी गोठा केला आहे. त्यांत सकाळीं व्यालेली म्हैस, दोनतीन वासरें,एक नाळपडी घोडी बांधली आहे. भिंतीवर जिकडे तिकडे कोण्याकोपर्यांनीं घागरीं, तांबडीं गोचिडें चिकटलीं आहेत. त्यालगत बाहेर परसांत एके बाजूस कोंबडयांचें खुराडें केलें आहे. त्याशेजारीं एकदोन कैकाडी झांप पडलेले आहेत व दुसरे बाजूस हातपाय धुण्याकरितां व खरकटों मडकींभांडीं घासण्याकरितां गडगळ दगड बसवून एक उघडी न्हाणी केली आहे. तिच्या खुल्या दरजांनीं जागोजाग खरकटें जमा झाल्यामुळें त्यांवर माशा घोंघों करीत आहेत. पलीकडे एका बाजूला शेणखई केली आहे. त्यांत पोरासोरांनीं विष्ठा केल्यामुळें चहूंकडे हिरव्या माशा भणभण करीत आहेत. शेजारीं पलीकडे एका कोपर्यांत सरभड गवत व कडब्यांच्या गंजी संपून त्यांच्या जागीं त्या त्या वैरणींच्या पाचोळयांचे लहानमोठे ढीग पडली आहेत. शेजारीं गवाणोंतील चघळचिपाटांचा ढीग पडला आहे.बाकी उरलेल्या एकंदर सर्व परसांत एक तरूण बाई घराकडे पाठ करून गोवर्या लावीत आहे. तिचे दोन्ही पाय शेण तुडघून तुडवून गुढग्यापावेतों भरले होते. पुढें एकंदर सर्व माजघरांत उंच खोल जमीन असून येथे पहावें. तर दळण पाखडल्याचा वैचा पडला आहे; तेथें पहावें, त निसलेल्या भाजाच्या काडया पडल्या आहेत. येथें खाल्लेल्या गोंधणीच्या बिया पडल्या आहेत, तेथें कुजक्या कांद्यांचा ढीग पडला आहे, त्यांतून एक तर्हेची उबट घाण चालली आहे. मध्यें खुल्या जमिनीवर एक जख्ख झालेली म्हातारी खालींवर पासोडी घालून कण्हत पडली होती. तिच्या उशाशीं थोडयाशा साळीच्या लाह्या व पितळीखालीं वाटींत वरणाच्या निवळींत जोंधळयाची भाकर बारीक कुसकरून केलेला काला व पाणी भरून ठेवलेला तांब्या होता. शेजारों पाळण्यांत तान्हें मूल टाहो फोडून रडत पडलें आहे. याशिवाय कोठें मुलाच्या मुताचा काळा ओघळ गेला आहे. कोठें पाराचा गू काढल्यामुळें लहानसा राखेचा पांढरा टवका पडला आहे. घरांतील कित्येक कोनेकोपरे चुनातंबाखू खाणार्यांनीं पिचकार्या मारून तांबडेलाल केले आहेत, एका कोपर्यांत तिधीचौघींचे भलें मोठें जातें रोविलें आहे. दुसर्या कोपर्यांत उखळाशेजारीं मुसळ उभें केलें आहे आणि दारादावळील कोंपर्यांत केरसुणीखालीं झाडून लावलेल्या कचर्याचा ढीग सांचला आहे; ज्यावर पोरांची गांड पुसलेली चिंधी लोळत पडली आहे. इकडे चुलीच्या भाणुशीवर खरकटा तबा उभा केला आहे, आवलावर दुधाचें खरकटें मडकें घोंगत पडलें आहे. खालीं चुलीच्या आळयांत एके बाजूला राखेचा ढीग जमला आहे, त्यामध्यें मनीमांजरीनें विष्ठा करवून तिचा मागमुद्दा नाहींसा केला आहे. चहुंकडे भितीवर ढेकूणपिसा मारल्याचे तांबूस रंगाचे पुसट डाग पडले आहेत.त्यांतून कोठें पोरांचा शेंबूड व कोठें तपकिरीच्या शेंबडाचें बोट पुसले आहे. एका देवळींत आंतले वाजूस खात्या तेलाचें गाडचें, खोवरेल तेलाचें मातीचें बुटकुलें दांतवणाची कळी, शिंगटाची फणी, तबलादी आरशी, काजळाची डबी आणि कुंकाचा करंडा एकेशेजेनीं मांडून ठेविले आहेत व बाहेरच्या बाजूस देवळीच्या किनार्यावर रात्नीं दिवा लावण्याकरितां एकावर एक तीनचार दगडांचें दिवे रचून उतरंड केली आहे. त्यांतून पाझरलेल्या तेलाचा ओधळ खालीं जमिनीपावेतों पसरला आहे. त्या सर्वाचें बर्षातून एकदां आषाढ वद्य अमावस्येस कीट निघाबयाचे. दुसरे देवळींत पिठाचे टोपल्याशेजारीं खालीं डाळीचा कणूरा व शिळया भाकरीचे तुकडे आहेत. तिसर्या देवळींत भाकरीच्या टोपल्याशेजारी थोडया हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, दुधाची शिंप आणि आंब्याच्या करंडया पडल्या आहेत, ज्यावर माशा व चिलटें बसून एकीकडून खातात व दुसरीकडून त्यांजवर विष्ठा करीत आहेत. आणि चौथ्या देवळींत सांधलेल्य जुन्या वाहाणांचा व जोडयांचा व जोडयांचा गंज पडला आहे. शेजारीं चकमकीचा सोकटा व गारेचे तुकडे पडले आहेत. दुसरीवर पांधरावयाच्या गोधडया व पासोडया ठेविल्या आहेत व तिसरीवर फाटके मांडचोळणे व बंडया ठेविल्या आहेत. नतंर माजघराचे खोलींत जाऊन पहातों, तों जागोजाग मधल्या भिंतीला लहानमोठया भंडार्या आहेत. त्यांतून एका भंडारीस मात्न साधें गांवठी कुलुप घातलें होतें. येथेंही जागोजाग खुंटयांबर पांधरुणांची बोवकीं व सुनाबाळांचे झोळणे टांगले आहेत.एका खुंटीला घोडीचा लगाम, खोगीर, वळी व रिकामी तेलाची बुधलि टांगली आहे. दुसरीला तेलाचा नळा टांगला आहे. शेवटीं एका बाजला भिंतीशीं लागून डेर्यावर डेरे व मडकीं रचून पांच उतरंडी एके शेजेनीं मांडल्या आहेत. शेजारीं तुळईला दोन मोळाचीं शिंकीं टांगलीं आहेत. त्यावर विजरणाचें व तुपाचें गाडगें झांकून ठेविलें आहे. अलीकडे भला मोठा एक कच्च्या बिटांच्या देव्हारा केला आहे. त्याच्या खालच्या कोनाडयांत लोखंडी कुर्हाडी, बिळे आणि विळी पडली आहे. वरतीं लहानसें खारवी वस्त्र अंथरून त्यावर रुप्याचे कुळस्वामीचे टांक एके शेजेनीं मांडले आहेत. त्यांच्या एके बाजूस दिवटी बुधली उभी केली आहे व दुसरे बाजूस दोम दोम शादावंलाची झोळी, फावडी उभी केली आहे. वरती मंडपिला उदाची पिशवी टांगली आहे. खालीं बुरणुसाबर शेतकर्यास गाढ झोंप लागून धोरत पडला आहे. एका कोपर्यांत जुनी बंदुकीची नळी व फाटक्या जेनासहित गादीची बळकुटी उभी केली आहे. दुसर्या कोपर्यांत नांगराचा फाळ, कुळबाच्या फाशी, कोळप्याच्या गोल्ह्या. तुरीचि गोधी व उलटी करून उभी केलेली ताक धुसळण्याची रवी आणि तिसर्या कोपर्यांत लबंगी काठी व पहार उभी केली आहे. सुमारें दोनतीन खणांत तुळयांवर बकाण व शेराचे सरळ नीट वांसे बसवून त्यावर आडव्यातिडव्या चिंचेच्या फोकाटयांच्या पटईवर चिखलमातीचा पेंड घालून मजबूत माळा केला आहे. ज्यावर राळा, राजगिरा, हुलगा. वाटाणा, पावटा, तीळ, चवळी वगैरे अनेक भाजीपाल्यांचें वीं जागोजाग डेर्यांतून व गाडग्यांतून भरून ठेविलें आहे. वरतीं कांभिर्याला वियाकरितां मक्याच्या कणसांची माळ लटकत असून पाखाडीला एके ठिकाणीं चारपांच बाळलेले दोडके टांगले आहेत. दुसर्या ठिकाणीं दुधाभोपळा टांगला असून तिसर्या ठिकाणीं शिंक्यावर काशीफळ भोपळा ठेविला आहे. चवथ्या ठिकाणीं नळपासुद्धां चाडें व पाभारीची वसू टांगली असून, कित्येक ठिकाणीं चिंध्याचांध्यांचीं बोचकी कोंबलीं आहेत मध्यें एका कांभिर्याला बाशिंगें बांधलीं आहेत. वरतीं पहावें, तर कौलांचा शेकर करण्यास तीनचार वर्षे फुरसत झाली नाहीं व त्याचे खालचें तुराठयाचें ओमण जागोजाग कुजल्यामुळें गतवर्षी चिपाडानें सांधलें होतें, म्हणून त्याणून त्यांतून कोठकोठें उंदरांनीं बिळें पाडलीं आहेत. एकंदर सर्व घरांत स्वच्छ हवा घेण्याकरितां खिडकी अथवा सवाना मुळींच कोठें ठेविला नाहीं.तुळया, कांभिरें, ओंमणासहित वांशांवर धुराचा डांबरी काळा रंग चढला आहे. बाकी एकंदर सर्व रिकाम्या जागेंत कांतिणीनीं मोठया चातुर्यानें, अति सुकुमार तंतूनीं गुंफलेलीं मच्छरदाणीवजा आपलीं जाळीं पसरलीं आहेत. त्यांवर हजारों कांतिणीचीं पिलें आपली खेळकसरत करीत आहेत. ओंमण, वांसे तुळयांवर जिकडे तिकडे मेलेल्या घुल्यांचीं व कांतिणीचीं विषारी टरफलें चिकटलीं आहेत,त्यांतून तुळया वगैरे लांकडाच्या ठेवणीवर कित्येक ठिकाणीं उंदीर व झुरळांच्या विषारी लेंडयांनीं मिश्र झालेल्या धुळीचे लहानलहान ढीग जमले आहेत, फुरसत नसल्यामुळें जेथें चारपांच वर्षांतून एकदांसुद्धां केरसुणी अथवा खराटा फिरविला नाहीं. इतक्यांत उन्हाळा असल्यामुळें फार तलखी होऊन वळवाचा फटकारा येण्याचे पूर्वी वादळाचे गर्दीमध्यें वार्याचे सपाटयानें कौलांच्या सापटीतून सर्व घरभर धुळीची गर्दी झाली, तेव्हां तोंडं वासून घोरत पडलेल्या कुणव्याच्या नाकातोंडांत विषारी धूळ गेल्याबरोबर त्यास ठसका लागून , तो एकाएकी दचकून जागा झाला. पुढें त्या विषारी खोकल्याच्या ठसक्यानें त्याला इतकें बेजार केलें कीं, अखेरीस थोडासा बेशुद्ध होऊन तो मोठमोठयानें विवळून कण्हू लागला. त्यावरून त्याच्या दुखणायीत म्हातारे," अरे भगवंतराया, मजकडे डोळे उघडून पहा. रामभटाच्या सांगण्यावरून तुला साडेसातीच्या शनीनें पीडा करूं नये, म्हणून म्यां, तुला चोरून, कणगींतले पल्लोगणती दाणे नकटया गुजरास विकून अनेक वेळां मारुतीपुढें ब्राह्यण जपास बसवून सबाष्ण ब्राह्यणांच्या पंक्ति कि रे उठविल्या ! कित्येक वेळीं बाळा, तुला चोरून परभारा गणभटाचे घरीं सत्यनारायणाला प्रसन्न करण्या निमित्त ब्राह्यणांचे सुखसोहळे पुरविण्याकरिताम पैसे खर्च केले आणि त्या मेल्या सत्यनारायणाची किरडी पाजळली. त्यानें आज सकाळीं कलेक्टरसाहेबाचे मुखीं उभें राहून तुला त्याजकडून सोयीसोयीनें पट्टी देण्याविषयीं मुदत कशी देवविली नाहीं ? अरे मेल्या ठकभटानों, तुमचा डोला मिरविला. तुम्ही नेहमीं मला शनि व सत्यनारायणाच्या थापा देऊन मजपासून तूपपोळयांचीं भोजनें अ दक्षिणा उपटल्या. अरे, तुम्ही मला माझ्या एकुलत्या एक भगवंतरायाच्या जन्मापासून आजदिनपावेतों नवग्रह वगैरेंचे धाक दाखवून शेंकडों रुपयांस बुडवून खाल्लें. आतां तुमचें तें सर्व पुण्य कोठें गेलें ? अरे, तुम्ही मला मला धर्ममिषें इतकें ठकविलें कीं, तेवढया पैशांत मी अशा प्रसंगीं माझ्या बच्याच्या कित्येक वेळां पट्टया वारून, माझ्या भगवंतरायाचा गळा मोकळा करून त्यास सुखी केलें असतें ! अरे, तुमच्यांतीलच राघूभरारीनें प्रथम इंग्रजांस उलटे दोन आणे लिहून देऊन त्यास तलेगांवास आणिलें. तुम्हीच या गोरे गैर माहितगार साहेबलोकांस लांडयालबाडया सांगून, आम्हां माळयाकुणाब्यांस भिकारी केलें आणि तुम्हीच आतां, आपल्या अंगांत एकीचें सोंग आणून इंग्रज लोकांचे नांवानें मनगटें तोडीत फिरतां. इतकेंच नव्हे, परंतु हल्लीं माळी कुणबी जसजसे भिकारी होत चालले, तसतसे तुम्हांस त्यांना पहिल्यासारख फसवून खातां येईना, म्हणून तुम्ही ब्राह्यण, टोपोवाल्यास बाटवून, पायांत बूट-पाटलोन व डोईवर सुतक्यासारखे पांढरे रुंमाल लावून, चोखामेळयापैकीं झालेल्या खिस्ती भाविकांच्या गोर्यागोमटया तरुण मुलीबरोबर लग्नें लावून, भर चावडीपुढें उभे राहून माळयाकुणब्यांस सांगत फिरतां कीं,--" आमच्या ब्राह्यण पूर्वजांनीं जेवढे म्हणून ग्रंथ केले आहेत, ते सर्व मतलबी असून बनावट आहेत. त्यांत त्यांनीं उपस्थित केलेल्या धातूंच्या किंवा दगडांच्या मूर्तीत कांहीं अर्थ नाहीं, हें सर्व त्यांनीं आपल्या पोटासाठीं पाखंड उभें केलें आहे. त्यांनीं नुकताच पलटणींतील परदेशी लोकांत सत्यनारायण उपस्थित करून, आतां इतके तुम्हां सर्व अज्ञानी भोळया भाविक माळया कुणब्यांत नाचवूं लागले आहेत. ही त्यांची ठकबाजी तुम्हांस कोठून कळणार ? यास्तव तुम्ही या गफलति ब्राह्यणांचें ऐकून धातूच्या व दगडांच्या देवाच्या पूजा करूं नका. तुम्ही सत्यनारायण करण्याकरितां कर्जबाजारी होऊन ब्राह्यणाचे नादों लागूं नका. तुम्ही निराकार परमात्म्याचा शोध करा, म्हणजे तुमचें तारण होईल." असा, परंतु तुम्ही आम्हा या भितर्या माळयाकुणब्यांस उपदेश करीत फिरण्यापेक्षां प्रथम आपल्या जातबांधवांचे आळयांनीं जाऊन त्यांस सांगावें कीं, " तुम्ही आपल्या सर्व बनावट पोथ्या जाळून टाका. माळी, कुणबी, धनगर वगैरे शेतकर्यांस खोटे उपदेश करून आपलीं पोटें जाळूं नका," असा त्यांस वारंवार उपदेश करून त्यांजकडून तसें आचरण करवूं लागल्याबरोबर शेतकर्यांची सहज खात्नी होणार आहे. दुसरें असें कीं, आम्ही जर तुम्हां पाद्रया ब्राह्यणांचें ऐकून आचरण करावें, तर तुमचेच जातवालें सरकारी कामगार येथील गोर्या कामगारांच्या नजरा चुकावून भलत्यासलत्या सबबी कटवून आम्हा शेतकर्यांच्या मुलांबाळांची दशा करून सोडतील-इतक्यांत शेतकरी शुद्धीवर येतांच आपल्या मातुश्रीच्या गळयास मिठी घालून रडू लागला.