Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय १०

(गीति)

गणपति म्हणे वरेण्या, दैवी असुरी तशीच राक्षसि ही ।

१.

प्रकृतिविषयीं सांगे, फलचिन्हें हीं तुलाच संप्रति हीं ॥१॥

दैवी प्रकृति आहे, मोक्षासाठीं सुसाधनीं योग्य ।

बाकीच्या दोनीही, बंधनकारक नरास त्या योग्य ॥२॥

दैवी प्रकृतिविषयीं, लक्षण सांगें नृपा तुला आतां ।

धैर्य दया आर्जव हीं, चापल्य नि तेज शौच ही क्षमता ॥३॥

अक्रोधन नी आणिक, अभय अहिंसा तशीच पैशून्य ।

२-३.

नसणें अभिमानहि कीं, आणखीशीं तीं सुयुक्‍त हीं अन्य ॥४॥

दैवी प्रकृतिचिन्हें, कथिली ऐकें द्वितीय तीं साचीं ।

४.

अभिमान वादभारी, ज्ञानीं संकोच दर्प असुरीचीं ॥५॥

मद मोह गर्व आणिक, निष्ठुरता नी तसा अहंकार ।

५.

राक्षसि प्रकृति ऐशी, कथुनी झाली नृपाल साचार ॥६॥

हिंसा द्वेष अदयता, उद्धटपण क्रोध विनय नसणेंच ।

परनाशाची बुद्धी, प्रीती क्रोधावरी असे साच ॥७॥

कर्म न करणें आणिक, अशुचित्वहि द्वेष वेद भक्‍तांचा ।

परनिंदा करणें ही, न धरीं विश्वास साधुवाक्यांचा ॥८॥

पापीजन मैत्री ती, पाखंडयावरी असेच विश्वास ।

स्मृतिवाक्य पुराणीं तो, मानव धरतो सदा अविश्वास ॥९॥

अग्नीहोत्री ब्राह्मण, आणिक मुनिंचा करीतसे द्वेष ।

दांभिकपणिं कर्म करी, परवस्तूंचा अतीच अभिलाष ॥१०॥

इच्छा अनेक करणें, असत्य भाषण सदैवसें करणें ।

दुसर्‍यांचा उत्कर्षहि, सहन न करणें विनाशही करणें ॥११॥

एणेपरी गुणांनीं, प्रकृती जाणें नृपाळ राक्षसि ती ।

हे गुण जगतीं स्वर्गीं, वस्ती करिती समस्त ते नृपती ॥१२॥

माझी भक्‍ति न करिती, आश्रय करिती तृतीय प्रकृतिचे ।

वर्णन केलें आहे, ध्यानीं आणी वरील ते साचे ॥१३॥

जे तामस प्रकृतिचा, आश्रय करितात नरक त्यां वास ।

वर्णन करुं नये तीं, भोगिति दुःखें कठीणशीं खास ॥१४॥

जरि दैवानें सुटती, तरि ते जगतीं पुन्हांच जन्मति ते ।

६-१३.

कुबडे पंगू होउन, जन्मा येती कनिष्ठ जातीं ते ॥१५॥

पुनरपि पापाचरनी, होऊन माझी न भक्ति ते करिती ।

१४-१५.

यास्तव खालीं पडती, निंदित योनीमधेंच ते येती ॥१६॥

परि माझी भक्ती जे, करिती ते तरति मात्र या जगतीं ।

यज्ञ करुनियां स्वर्गी, जाती ते सुलभशा श्रमाअंतीं ॥१७॥

परि माझी भक्ती जे, दुर्लभ आहे नृपा असें समज ।

आतां पुढती कथितों, श्रवणीं सादर असेंच हें तूज ॥१८॥

मोहित झालेले ते, झालेले बद्ध ते स्वकर्मानें ।

मीपण युक्तहि होऊन, कर्ता भोक्ता असेंच मीपणिंनें ॥१९॥

ज्ञाता सुखी नि शास्ता ईश्वर आहे जगांत मी थोर ।

१६-१७.

असली बुद्धी ज्याची, तो जातोची अधोगती थार ॥२०॥

यास्तव वरील गोष्टी, सोडुन देईं नृपा त्वरें खास ।

१८.

दैवी प्रकृति धरुनी, दृढतर भक्ती करुन मुक्तीस ॥२१॥

सात्त्विक राजस तामस, भक्तीचे हे प्रकार कीं तीन ।

देवांची भक्‍ती ती, सात्त्विक आहे नृपाल ती म्हणुन ॥२२॥

मान्य असे ती मजला, हितकर आहे प्रभूवरा भक्‍ती ।

१९-२०.

यक्ष नि राक्षस यांची, पूजा करणेंच राजसी भक्‍ती ॥२३॥

भूतादिक प्रेतांचें, पूजन करणें नि काम नी कर्म ।

वेदांनीं नच कथिलें, दंभ क्रौर्ये नि ताठरें कर्म ॥२४॥

ऐशीं कर्में करिती, तामस भक्‍ती नृपावरा समज ।

तीनी प्रकार कथिले, ध्यानीं आणीं सुबोध हा समज ॥२५॥

अंतःकरणीं मी हें, जाणत नाहीं उगीच देहास ।

कष्टवि याला म्हणती, तामस भक्‍तीहि नेत नरकास ॥२६॥

काम क्रोध नि आणिक, दंभ नि लोभास म्हणति नरकाचे ।

दरवाजे मोठे हे, त्यागुन मानव सुभक्‍त हे साचे ॥२७॥

दशम प्रसंग ऐसा, कथिला नृपतीस तो गणेशांनीं ।

गीतारुपें करुनी, शौनक यांना श्रवार्थ सूतांनीं ॥२८॥

दशमाध्यायीं कवनें, ओविलिं तीं रुचीरशीं पुष्पें ।

गणपति प्रभुवर यांनीं, प्रेमभरें तीं सुमाळ कंठापें ॥२९॥