दुर्दैवी 60
''तुम्ही सारी माझी फजिती करण्यासाठी गोळा झाला आहात. वाढ त्यांना. उद्या मोलकरीण हो.'' असे म्हणून रंगराव तेथून रागारागाने निघून गेले. हेमाने त्या गडयांना नीट वाढले. आणि शेवटी ती आपल्या खोलीत जाऊन पडली. तिला रडू आले. तिला आईची आठवण झाली. आणि ते प्रेमळ जयंतही आठवले. ते माझे खरोखरीच जन्मदाते नसून कसे वागता; आणि हे माझे खरे जन्मदाते, परंतु कसे वागतात! असे कसे हे बाबा? कसे वागायचे तरी यांच्याशी? तिला काही सुचेना. ती दु:खाने म्हणाली, ''आई, तू एकटी का ग गेलीस? जाताना या हेमालाही का नाही बरोबर नेलेस? कशाला मला पाठीमागे ठेवलेस? का हे माझे धिंडवडे? ने ग मलाही!''
एके दिवशी हेमा सायंकाळी फिरायला म्हणून गेली होती. तिचा चेहरा दु:खी होता, म्लान होता. मोठया आनंदाने काही ती बाहेर पडली नव्हती. तिला एकांत हवा होता. कोठे तरी दूर दूर जावे, असे तिला वाटत होते. रस्त्यात तिला हेमंत दिसला. दोघांनी क्षणभर एकमेकांकडे पाहिले. परंतु लगेच आपल्या मार्गाने दोघे निघून गेले. रंगरावांनी निक्षून सांगितल्यापासून हेमा हेमंताशी कधी बोलली नाही. ती आपल्याला टाळते असे ध्यानात येऊन हेमंतही तिच्याजवळ कधी गेला नाही. परंतु आजची तिची खिन्न मुद्रा पाहून त्याला वाईट वाटले. तिच्याशी दोन शब्द बोलावे असे त्याच्या मनात आले. त्याने मागे वळून पाहिले. परंतु ती शांतपणे जात होती. त्याने मनातील भावना मनातच ठेवली. तिच्या पाठोपाठ तो गेला. हेमा आपल्या तंद्रीतच होती. आता अंधार पडू लागला. आमराई संपली होती. हेमा थबकली, थांबली. ती रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसली. शून्य दृष्टीने ती बघत होती. तिला एकाएकी हुंदका आला. ती अगतिकाप्रमाणे रडू लागली. ती स्फुंदत स्फुंदत म्हणाली, आई, तुझ्याबरोबर मलाही का नाही नेलेस? तू एकटीच का गेलीस?
इतक्यांत कोणाची तरी तिला चाहूल लागली. कोण आले होते तेथे? ती चपापून उभी राहिली. तिची का आई तेथे समोर उभी होती? हेमा बावरली.
''मुली, तू कोणाची कोण? येथे का अशी रडत बसली आहेस? तुझी का आई देवाघरी गेली?''
''हो, मी एकटी आहे.''
''तुझे वडील आहेत ना?''
''परंतु त्यांनाही मी आवडत नाही. ते माझ्यावर प्रेम करीत नाहीत. हिडीसफिडीस करतात.''