महात्मा गौतम बुद्ध : || चार || 10
“त्याचप्रमाणे जे जे अनात्म आहे त्याचा त्याग करा. सा-या स्कंधांचा त्याग करा. आपल्या आसपास असणा-या वृक्षादिकांचा जसा आत्मरुपाशी संबंध नाही, त्याचप्रमाणे या स्कंधांचा, वासनाविकारांचा, भावना-विचारांचा, मनोबुद्धीचा आत्म्याशी संबंध नाही.” प्लॉटिनस म्हणाला होता, ‘माझे असे माझ्यात काही ठेवू नका.’ मनुष्यामध्ये काहीतरी चिरंतन, स्वयंभू, स्वत:सिद्ध आहे असे बुद्ध मानतात. त्या अविनाशी तत्त्वाचा नाशिवंत घटकांशी, नाशिवंत स्कंधांशी अनेक ठिकाणी विरोध दाखविण्यात आलेला आहे. बुद्ध जेव्हा प्रश्न करतात, ‘जे चंचल आहे, नाशिवंत आहे, ते आत्मा असू शकेल का?’ तेव्हा जे चंचल नाही, भंगूर नाही, असे आत्मतत्त्व त्यांच्या डोळ्यांसमोर आहे असे स्पष्ट दिसते. बुद्धधर्मातील पुढील महावाक्यात हीच दृष्टी आहे. ‘हे माझे नाही, मी हे नाही, हे मी नाही.’ ही सारी निषेधपर वाक्ये आत्म्याचा अनात्म वस्तूंपासून असणारा भेद स्पष्टपणे दाखवीत आहेत. आत्मा ही अशी वस्तू आहे, की या दृश्य जगातील सर्व निश्चित स्वरुपांपासून, दिक्कालाद्यनवच्छिन्न वस्तूंपासून ती संपूर्णपणे अलग आहे. बुद्ध जेव्हा ‘आत्मदीप व्हा, आत्मशरण व्हा’ असे सांगतात, त्या वेळेस त्यांच्या डोळ्यांसमोर हे भंगुर स्कंध नसून, आपल्यातील नाशिवंत अनात्म वस्तू नसून, आपल्यातील विश्वात्मा, परमात्मा त्यांच्या डोळ्यांसमोर असतो. या दृश्य जगातील संघातांहून अधिक असे काही आत्म्यात आहे की नाही? आत्मा म्हणजे का पाचांचा संघात? पाच स्कंधांचा मेळावा? या प्रश्नाला कायमचे उत्तर देण्यात आले आहे, की आत्म्याचा संबंध शब्दातीत आहे. आत्म्याशी असलेले नाते अनिर्वचनीय आहे. आत्मा या पाचांचा मेळावा की आत्मा या पाचांपासून अलग, हे काहीच सांगता येणे शक्य नाही, किंवा त्यांच्यापासून अलग आहे असेही नाही.” अनेक वचनांतून आत्म्याची शाश्वत धर्माशी एकरुपता वर्णिलेली आहे.
उपनिषदे म्हणतात, ‘आत्म्याचा, विश्वात्म्याचा शोध करणे हे मानवाचे कर्तव्य आहे.’ परंतु बुद्ध म्हणतात, ‘निर्दोष चारित्र्य मिळवा, नवीन व्यक्तित्व उत्क्रांत करा.’ कारण आपले सारे जीवनच बदलून टाकल्याशिवाय आपणातील सुप्तात्मा जागृत होणार नाही, प्रकट होणार नाही. जे वास्तविक आपले स्वरुप, जे आपण आहो ते होणे, हे मानवाचे ध्येय आहे. प्रत्येकाने आत्मरुपाकडे वाढत गेले पाहिजे. आपल्या आत्म्यात वाढत गेले पाहिजे. बुद्ध एक धोक्याची सूचना सदैव देतात, की जरी आपण सत्य दृष्टीने दैवी असलो, तरी प्रत्यक्ष जीवनात दिव्यता प्रकट करणे हे आपले ध्येय आहे. ‘याच जीवनात आपण शांत होतो, अवाक् होतो, निर्विकार होतो. आत्मा ब्रह्मीभूत होतो व त्या आनंदात आत्मा विहरतो.’